Home महाराष्ट्र शब्दगंध संमेलनास सहकार्य करावे – प्राचार्य डॉ.अशोक ढगे

शब्दगंध संमेलनास सहकार्य करावे – प्राचार्य डॉ.अशोक ढगे

57

✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नेवासा /अहमदनगर(दि.13ऑगस्ट):-बदलत्या सामाजिक परिस्थितीचा साहित्यामध्ये समावेश होण्यासाठी त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक असून शब्दगंध च्या पंधराव्या साहित्य संमेलनात या वरती प्रकाश टाकण्यात यावा, परिसरातील सर्व साहित्यिकांनी या संमेलनात सहभागी व्हावे असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ.अशोकराव ढगे यांनी केले.

शब्दगंध साहित्यिक परिषद, नेवासा तालुका शाखेच्या वतीने ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या हॉल मध्ये पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित बैठकीच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. यावेळी शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, मार्गदर्शक ॲड. बन्सी सातपुते, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अशोक कानडे,साहित्यिक भाऊसाहेब सावंत, खजिनदार भगवान राऊत, नेवासा तालुका शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ.किशोर धनवटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, सामाजिक बदल घडविण्याची क्षमता साहित्यामध्ये असून छोट्या छोट्या संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नवीन लिहिणाऱ्यांना प्रेरणा मिळू शकेल. त्यासाठी या संमेलनाला सर्वांनी सहकार्य करावे. भाऊसाहेब सावंत बोलताना म्हणाले की, अस्सल साहित्य हे ग्रामीण भागातच असून नवोदितांना जास्तीत जास्त संधी या संमेलनातून दिली पाहिजे. ॲड. बन्सी सातपुते म्हणाले की, प्रबोधनाचे विषय,सध्याची सामाजिक परिस्थिती,राज्यघटना, सत्यशोधक आणि पुरोगामी चळवळ याचा लेखाजोखा या संमेलनाच्या माध्यमातून मांडला पाहिजे. दिगंबर गोंधळी यांनी संमेलनामध्ये लोक कलावंताचा सहभाग घेऊन त्यांना विचारपीठावर कला सादर करण्याची संधी द्यावी असे मत व्यक्त केले.

भगवान राऊत व सुनील गोसावी यांनी संमेलनाची रुपरेखा सांगितली.ज्येष्ठ साहित्यिक ना.धो. महानोर,विचारवंत हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रा.अमोल जाधव यांच्या सुमधुर गीतानंतर सभेला सुरुवात झाली.पांडूरंग रोडगे, देविदास अंगरख, अनिल चिंधे यांनी चर्चेत सहभाग नोंदवला. मा. खा. यशवंतराव गडाख साहेब यांची पुस्तक मान्यवरांना भेट देण्यात आली.या सभेचे संयोजन शब्दगंध च्या नेवासा तालुका शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ. किशोर धनवटे यांनी केले. तर शेवटी दिगंबर गोंधळी यांनी आभार मानले. परिसरातील अनेक साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here