Home गडचिरोली उच्च रक्तदाबाचे वेळेत निदान अत्यावश्यक!

उच्च रक्तदाबाचे वेळेत निदान अत्यावश्यक!

106

फक्त एक हजार आठशे शब्दांचा लेख शक्य झाल्यास एकाच भागात

[रक्तदाब- ब्लडप्रेशर- बिपी. विशेष]

रक्तदाब हा अभिसरण होत असलेल्या रक्ताद्वारे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर पडणारा दबाव होय. धमन्या या हृदयातून शरीरातल्या सर्व उती आणि अवयवांना रक्तपुरवठा करतात. हृदयातून धमन्यांमधे रक्त ढकलले जाण्यामुळं आणि धमन्यांद्वारे या रक्ताच्या प्रवाहाला दिला जाणारा प्रतिसाद यांच्या परिणामाने रक्तदाब निर्माण होतो. परंपरेनुसार, एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब हा सिस्टॉलीक/ डायस्टॉलीक असा व्यक्त केला जातो, उदाहरणार्थ- १२०/८०. हृदयाचे स्नायू आकुंचन पावून धमन्यांमधे रक्त ढकलले जाते तेव्हा धमन्यांच्या आतल्या भिंतीवर निर्माण झालेला दाब म्हणजे सिस्टॉलीक रक्तदाब होय. आकुंचनानंतर हृदयाचे स्नायू शिथील होतात त्यावेळेला धमन्यांमधील दाब म्हणजे डायस्टॉलीक रक्तदाब होय. हृदय जेव्हा रक्त पंप करत असतं त्यावेळेला रक्तदाब हा उच्च असतो, ते शिथिल असतं तेव्हा नाही. बहुतांश सुदृढ प्रौढांसाठी सिस्टॉलीक रक्तदाब हा पा-याच्या ९० आणि १२० मिलीमीटर्स दरम्यान असतो. सामान्य डायस्टॉलीक रक्तदाब हा ६० आणी ८० दरम्यान असतो. विद्यमान मार्गदर्शक सूचनांनुसार सामान्य रक्तदाब हा १२०/८० पेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते. आपण डाॅक्टर नाही, परंतु समाजात बिपीमुळे अनेकांची होत असलेली जीवीत हानी बघवत नाही, म्हणून हा जागरूकतेसंबंधी लेख प्रपंच! असा हा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या शब्दशैलीतील मार्गदर्शक लेख आपल्या सेवेत…. 

कमी रक्तदाब- हायपोटेन्शन: हा एक इतका कमी असलेला दाब असतो की त्यामुळं धमन्या आणि शिरांमधून वाहणा-या कमी रक्तप्रवाहामुळं लक्षणं आणि चिन्हं दिसतात. हा कमी रक्तप्रवाह मेंदू, हृदय आणि मूत्रपिंड यासारख्या महत्वाच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्वं पुरवण्यास इतका कमी पडतो की, हे अवयव सामान्यपणे काम करू शकत नाहीत आणि त्यांचं कायमचे नुकसान होऊ शकतं. उच्च रक्तदाबाच्या तुलनेत, कमी रक्तदाब हा कमी रक्तप्रवाहाच्या चिन्हं आणि लक्षणांनी प्रामुख्यानं व्यक्त केला जातो, विशिष्ट रक्तदाब संख्येनं नाही. काही व्यक्तींना ९० /५० असा कमी रक्तदाब असू शकतो आणि त्यांना कमी रक्तदाबाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत आणि त्यामुळं त्यांना कमी रक्तदाब दिसत नाही. तथापि, ज्यांना सामान्यतः उच्च रक्तदाब असतो, त्यांचा रक्तदाब १००/ ६०च्या खाली गेल्यास त्यांना कमी रक्तदाबाची लक्षणं दिसू शकतात. कमी रक्तदाबामुळं डोकं हलकं वाटणे, चक्कर येणे, किंवा उभे राहिल्यानंतर मूर्च्छा येणे अशी लक्षणं निर्माण झाल्यास, त्याला ऑर्थोस्टॅटीक हायपोटेन्शन म्हणतात. सामान्य व्यक्ती उभं राहण्यामुळं निर्माण झालेला कमीदाब हा जलदगतीनं भरुन काढू शकतात. हृदय रोहिणींना- हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या रक्त पुरविण्यास जेव्हा रक्तदाब हा अपुरा पडतो तेव्हा, त्या व्यक्तीला छातीत वेदना किंवा हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. मूत्रपिंडांना जेव्हा अपुरं रक्त पुरवलं जातं, तेव्हा मूत्रपिंडही शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर काढू शकत नाहीत, उदाहरणार्थ- युरिया, क्रिएटीनाईन आणि त्यांची रक्तातील पातळी वाढते. झटका बसणे ही जीवाला घातक अशी स्थिती असून सातत्यानं कमी रक्तदाब राहिल्यानं मूत्रपिंडं, यकृत, हृदय, फुफ्फुसं, आणि मेंदूचं कार्य झपाट्यानं खालावतं.

उच्च रक्तदाब: रक्तदाब नियंत्रित असणे हे केव्हाही चांगले; पण उच्च रक्तदाब असलाच तर तो नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा. उच्च रक्तदाब सतत राहिला तर त्याचा विविध अवयवांवर दुष्परिणाम होतो. आपला रक्तदाब म्हणजे काय? तो किती असावा? आणि कसा मोजावा? आज आपण उच्च रक्तदाब म्हणजे काय, तो कसा ओळखायचा आणि त्याला कसे हाताळायचे हेही बघूया. आपला रक्तदाब सामान्यापेक्षा जास्त असेल आणि नेहमीच जास्त असेल तर त्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो. सामान्य रक्तदाब हा १२० सिस्टोलिक आणि ८० डायस्टोलिक (१२०/८०) एवढा किंवा यापेक्षा कमी असतो. जर आपला रक्तदाब सतत १४० /९० यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो. यासाठी डॉक्टर कमीत कमी दोन-तीन वेळा आपला रक्तदाब तपासून बघतात आणि आपल्या उच्च रक्तदाबाचे निदान करतात. रक्तदाब खूप जास्त वाढला असेल, तर लवकरसुद्धा निदान करता येते. रक्तदाबाचे निदान कसे करायचे, हे आपण याआधी बघितलेच आहे. उच्च रक्तदाब असेल तर आपण कसे हाताळायचे, ते आज आपण बघूया. उच्च रक्तदाब ओळखायचा कसा? लक्षणांवरून उच्च रक्तदाब ओळखणे फारच कठीण आहे. उच्च रक्तदाबाची वेगळी अशी लक्षणे बरेचदा दिसत नाहीत. काही लोकांमध्ये छातीत जड वाटणे, डोके दुखणे अशी काही लक्षणे दिसू शकतात; पण ही लक्षणे फक्त उच्च रक्तदाबाची नसतात. इतर आजारांमध्येसुद्धा अशी लक्षणे दिसतात, त्यामुळे फक्त लक्षणांवरून आपण उच्च रक्तदाबाचे निदान करू शकत नाही.

काही लोकांचा रक्तदाब खूप वाढला तरीही त्यांच्यामध्ये लक्षणे मुळीच दिसत नाहीत. काही रुग्णांना तर अगदी हृदयविकाराचा झटका आल्यावर किंवा अर्धांगवायूचा झटका आल्यावर दवाखान्यात भरती केले जाते आणि तेव्हा त्यांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान होते. कुठलेही लक्षण दिसत नसल्यामुळे या आजाराला सायलेंट किलर असे म्हटले जाते. अशा सायलेंट किलर आजाराचे निदान रक्तदाब मोजल्यावर होते. म्हणून नियमितपणे रक्‍तदाब मोजणे हे फार आवश्यक आहे. दरवर्षी एकदा तरी आपला रक्तदाब मोजायला हवा. जास्त धोका कोणाला? तर, ज्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाइकांना म्हणजेच आई-वडील, भाऊ-बहीण इत्यादींना उच्च रक्तदाब आहे, त्यांनी जास्त काळजी घ्यावी. ज्यांच्या पोटाचा घेर वाढलेला आहे, ज्यांची ढेरी दिसते किंवा वजन वाढलेले आहे, अशा व्यक्तींनीसुद्धा जास्त काळजी घ्यावी. आपली जीवनशैली बैठी असेल, आपण नियमित व्यायाम करत नसू, आपल्याला धूम्रपान किंवा नियमित मद्यपान अशा सवयी असतील, तर आपल्याला उच्च रक्तदाब होण्याचा धोका जास्त आहे, असे समजावे. अशा व्यक्तींनी आपल्या रक्तदाबाकडे दुर्लक्ष करू नये. काही लोकांचे उच्च रक्तदाबाचे निदान झालेले असते, त्यांचा रक्तदाब वाढलेला असूनही काही त्रास होत नाही म्हणून ते याकडे दुर्लक्ष करतात. असे करू नये. कारण आपला रक्तदाब खूप काळासाठी वाढलेला राहिला, तर त्याचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो.

रक्तदाबाच्या लक्षणांवर भर न देता रक्तदाबाच्या आकड्याकडे आपण लक्ष देणे आवश्यक ठरते. उच्च रक्तदाब धोकादायक का? तर, उच्च रक्तदाबामुळे आपल्याला शारीरिक त्रास होताना दिसत नाही. कुठेही दुखत नाही. पण, सतत रक्तदाब जास्त राहिला तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या सगळ्याच रक्तवाहिन्यांवर होतो. शिवाय, हृदयावरसुद्धा याचा विपरीत परिणाम होतो. काही वर्षांच्या कालावधीनंतर आपल्याला हे दुष्परिणाम त्रासाच्या स्वरूपात जाणवायला लागतात. रक्तवाहिन्या आपल्या शरीरभर असतात, त्यामुळे हे त्रास आपल्याला शरीरभर जाणवायला लागतात. आपल्या हृदयावर सतत उच्च रक्तदाबाचा ताण असेल तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदय निकामी होऊ शकते. याला इंग्रजीमध्ये हार्ट फेल्युअर असे म्हणतात. सतत उच्च रक्तदाब जास्त असेल, तर हृदयाच्या रक्तवाहिन्यासुद्धा निकामी होतात आणि असे झाले, की आपल्याला हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. मेंदूच्या रक्तवाहिन्या जर निकामी झाल्या, तर त्यामुळे अर्धांगवायूचा अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब असेल तर हृदयाच्या रक्तवाहिन्या फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याचीसुद्धा शक्यता असते, त्यामुळे सतत रक्तदाब वाढलेला असेल तर आपल्या मेंदूचे आरोग्यसुद्धा धोक्यात येते. रक्तवाहिन्यांवर दाब येऊन त्या खराब झाल्या तर आपल्याला मूत्रपिंडाचे आजारसुद्धा उद्‍भवतात. किडनी फेल्युअर किंवा मूत्रपिंड निकामी होणे असा गंभीर आजारसुद्धा होऊ शकतो. आपल्या डोळ्यांमध्ये ज्या बारीक रक्तवाहिन्या असतात, त्यांच्यावर रक्तदाबाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतो, त्यामुळे सतत रक्तदाब वाढलेला असेल, तर डोळेसुद्धा निकामी होऊ शकतात.

अशा पद्धतीने आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांवर उच्च रक्तदाबाचा परिणाम होतो. जेव्हा हा परिणाम होतो आणि त्याची लक्षणे दिसायला लागतात, तेव्हा बराच उशीर झालेला असतो, हे आजार बरेचदा ठीक करण्यासारखे नसतात किंवा पूर्णपणे ठीक होत नाहीत, त्यामुळे आपण उच्च रक्तदाब याचे वेळेत निदान करून त्याला नियंत्रणात ठेवणे हे फार आवश्यक असते. आपल्याला उच्च रक्तदाब असेल तरीही आपला रक्तदाब हा जास्तीत जास्त काळ सामान्य राहील, यासाठी आपण प्रयत्न करावा. हे बरेच कठीण असले तरीही रक्तदाब कमी राहिला, तर त्रास टाळता येतात. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाचा रक्तदाब १४०/९० यापेक्षा कमी ठेवणे हे आपले लक्ष्य असते. ज्या व्यक्तीला रक्तदाबासोबत मधुमेहसुद्धा आहे त्यांचा रक्तदाब यापेक्षासुद्धा कमी म्हणजे १३०/ ८० ठेवण्याचा आपला प्रयत्न असतो. काही लोकांना हृदयविकाराचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो, अशा व्यक्तींमध्येसुद्धा बीपी सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करतो. अशा व्यक्तींमध्येही आपले लक्ष्य १३०/८० असे असते. उच्च रक्तदाब का होतो? तर, आपला रक्तदाब बऱ्याच घटकांवर अवलंबून असतो आणि हे घटक जसे बदलतात, तसा आपला रक्तदाब बदलतो. पण, सतत रक्तदाब वाढलेला राहण्याची काही विशिष्ट कारणे असतात. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या काही आजारांमध्ये कधीकधी रक्तदाब वाढतो, त्याखेरीजही काही लोकांमध्ये शारीरिक आजार असतात आणि या आजारांमुळे आपल्या रक्तदाबावर परिणाम होतो व आपला रक्तदाब सतत वाढलेला राहतो.

मूत्रसंस्थेचे आजार: मूत्रपिंडामध्ये जर काही बिघाड झालेला असेल तर त्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास अडचण येते आणि रक्तदाब वाढायला लागतो. मूत्रपिंडाच्या आजाराशिवाय मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांचेसुद्धा आजार असतात. मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर काही खराबी असेल किंवा त्या बंद पडल्या, तर त्यामुळेही रक्तदाब वाढू शकतो. रक्तदाब सतत वाढलेला असेल तर मूत्रपिंडाचे आजार होतात आणि मूत्रपिंडाचा आजार असेल, तर त्यानेसुद्धा रक्तदाब वाढतो हे असे दुहेरी समीकरण आहे.

हार्मोन्सचे आजार: आपल्या शरीरामध्ये रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी बऱ्याच हार्मोन्सचा (संप्रेरक) सहभाग असतो. हे हार्मोन्स वेगवेगळ्या ग्रंथींमधून तयार होत असतात. या हार्मोन्समध्ये जर काही बिघाड झाला तर त्यामुळेसुद्धा आपल्याला उच्च रक्तदाबाचा आजार होऊ शकतो. थायरॉईड ग्रंथीचे आजार, कॉर्तीसोल या हार्मोन्सचे आजार या सगळ्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब होऊ शकतो.औषधे: काही रुग्णांमध्ये एखाद्या वेगळ्या आजारासाठी काही औषधे दिली जातात; पण त्यांचा रक्तदाबावर विपरीत परिणाम होतो आणि रक्तदाब वाढू शकतो. इतर आजारांशिवाय होणारा रक्तदाब: आपल्या शरीरामध्ये कुठलाही आजार नसताना आपला रक्‍तदाब वाढू शकतो, याला आपण प्रायमरी हायपर टेन्शन किंवा इसेन्शियल हायपरटेंशन असे म्हणतो. बऱ्याच तपासण्या करूनसुद्धा आपल्या शरीरामध्ये कुठलाही आजार दिसत नाही; पण रक्‍तदाब वाढलेला असतो. असे होण्याची काय कारणे आहेत? हे बरेचदा आपल्याला शोधूनसुद्धा सापडत नाहीत. याला आपण इसेन्शिअल हायपरटेन्शन म्हणतो. यामागे आनुवंशिकता व आपली शारीरिक ठेवण याचा थोडा वाटा असतो.
जीवनशैलीमुळे होणारा उच्च रक्तदाब: काही वेळेस आपल्या आनुवंशिकतेपेक्षा आपल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या रक्तदाबावर जास्त होतो.

आपले वजन वाढले किंवा शरीरातील चरबी वाढली तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊनसुद्धा रक्तदाब वाढतो. * आपली बैठी जीवनशैली असेल * व्यायामाचा अभाव असेल * वजन वाढलेले असेल * झोप पुरेशी होत नसेल * व्यसने असतील, या कारणांमुळेही उच्च रक्तदाब होतो. याला जीवनशैलीशी निगडित रक्तदाब असे आपण म्हणू शकतो. अशाप्रकारे आजारांशी संबंधित उच्च रक्तदाब, जीवनशैलीशी संबंधित उच्च रक्तदाब आणि कुठलेही कारण न सापडता असणारा उच्च रक्तदाब असे आपण ढोबळमानाने विभाजन करू शकतो. निदान झाल्यावर काय करावे? तर, उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यावर डॉक्टर काही तपासण्या सांगतात. यामध्ये रक्ताच्या तपासण्या आणि लघवीच्या तपासण्या असतात- ० आपल्या साखरेची पातळी कशी आहे? ० कोलेस्टेरॉलची पातळी कशी आहे? ० लघवीमध्ये काही दोष आहे का? ० हृदयाचा आलेख कसा आहे? कधी कधी हार्मोन्सच्या तपासण्या, हृदयाची एको तपासणी करावी लागू शकते. या तपासण्या आपले आरोग्य कसे आहे? आपल्याला हृदयविकाराचा धोका किती आहे? किंवा उच्च रक्तदाबामुळे कितपत धोका आहे? याची अधिक माहिती देतात. यावरून डॉक्टर उपचार सुचवतात. इतर आजारांमुळे आपल्याला उच्च रक्तदाब झालेला असेल, तर अशा वेळी मूळ आजारावर उपचार करणे आवश्‍यक असते. अशा आजारावर उपचार झाला तर रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. उदाहरणार्थ- जर एखाद्या हार्मोनच्या ट्यूमरमुळे रक्तदाब वाढलेला असेल, तो काढल्यावर रक्तदाब नियंत्रणात येतो. पण बहुतांशी व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब हा कुठल्याही आजाराशिवाय झालेला असतो. त्याचा उपचार हा जीवनशैलीतील बदल आणि औषधोपचार अशा दोन मार्गांनी करावा लागतो.

जीवनशैलीचे उपचार: जीवनशैलीचा उपचार हा रक्तदाबासाठी पहिला आणि खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला औषधे सुरू असोत किंवा नसोत, जीवनशैलीतील बदल हे फार महत्त्वाचे ठरतात. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे आपली शारीरिक हालचाल वाढवणे. बहुतांशी लोकांच्या शारीरिक हालचाली खूपच कमी असतात. यांत्रिकीकरणामुळे आपल्याला आजकाल शारीरिक कष्ट फार कमी करावे लागतात. आज जवळपास सगळ्यांची जीवनशैली ही बैठी जीवनशैली झाली आहे. शारीरिक हालचाल वाढली, तर आपला रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. ●आपण सतत अर्ध्या तासापेक्षा जास्त बसू नये. थोडा वेळ उठून पाय मोकळे करावेत किंवा थोडी शारीरिक हालचाल करावी. ● अर्धा तास बसून आणि अर्धा तास उभे राहून काम केलेले सगळ्यात उत्तम. ● जिथे जिथे आपल्याला पायी चालण्याची संधी मिळते, तिथे पायी चालावे. ● लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करावा. ● जास्तीत जास्त घरकामे स्वतः करावीत. ● बरेचदा एवढे करूनही आपली शारीरिक हालचाल पुरेशी वाढत नाही, यासाठी आपल्याला व्यायाम करण्याची गरज पडते. व्यायाम म्हणजे थोड्या वेळात केलेली जास्त शारीरिक हालचाल. व्यायाम केल्याने आपल्याला दोन प्रकारचे फायदे होतात. एक म्हणजे, आपले स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते. दुसरे म्हणजे हृदय आणि फुफ्फुसे बळकट होण्यासाठी मदत होते. आपण हे दोन्ही प्रकारचे व्यायाम करावेत. आपण दिवसभरात एकदाच व्यायाम केला आणि दिवसभर बसून असलो तर त्याचा फारसा फायदा होत नाही. म्हणून आपण व्यायाम करावा व दिवसभर शारीरिक हालचाल सुरू ठेवावी. सकाळी काही वेळ आणि संध्याकाळी काही वेळ विभागून व्यायाम केल्याससुद्धा फायदा होतो. जर आपण जलद गतीचा व्यायाम केला, तर आपल्याला जास्त फायदा होतो.

वजन कमी करणे- आपली शारीरिक वाढ पूर्ण झाल्यावर जे आपले वजन वाढते ते मुख्यत्वे चरबीच्या स्वरूपात वाढलेले असते. हे वजन आपण कमी केल्यास आपल्या आरोग्यावर खूप चांगले परिणाम होतात. वजन कमी केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी खूप मोठी मदत होते, म्हणून डॉक्टर आपल्याला वजन कमी करण्याचा सल्ला देतात. आहारामध्ये आपण पुरेसे बदल केले तर वजन कमी करणे सोपे होते. प्रक्रिया केलेले पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी खूप वाईट असतात. त्यामध्ये उष्मांक म्हणजेच कॅलरी यांचे प्रमाण खूप जास्त असते. शिवाय, अशा पदार्थांमध्ये लपलेले मीठ आणि लपलेले साखर यांचे प्रमाणसुद्धा खूप जास्त असते. हे पदार्थ टाळल्याने वजन कमी व्हायला मदत तर होतेच, शिवाय रक्तदाब कमी होण्यासाठीसुद्धा मदत होते. आहारामध्ये आपण फळे आणि भाज्या यांचा भरपूर वापर करावा. आपले अर्धे जेवण हे कच्चे, हिरवे, सलाद किंवा कोशिंबिरी असलेले असे असले, तर त्याचा आपल्याला फायदा होतो.

आहारामध्ये भाज्या आणि फळे भरपूर असतील तर त्यातून आपल्याला आवश्यक अशी जीवनसत्त्वे तर मिळतातच, सोबत आवश्यक अशी खनिजेसुद्धा मिळतात. आपल्याला पोटॅशियम हे खनिज फळांमधून आणि भाज्यांमधून मिळते. हे आपल्याला बीपी नियंत्रणात आणायला मदत करते. याशिवाय रक्तदाब नियंत्रणात आणणारी काही द्रव्ये हिरव्या पालेभाज्यांमध्ये असतात. आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजेच सूज येण्याची प्रक्रिया हलक्‍या प्रमाणात सुरू असते, ती कमी करण्यासाठी पालेभाज्या व फळे यांची खूप मदत होते. आपल्या पोटातील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी आपल्याला पालेभाज्या, फळे आणि त्यातील फायबर याचा खूप मोठा फायदा होतो. आपल्या आहारामध्ये मीठ खूप जास्त प्रमाणात असेल, तर रक्तदाब वाढण्याचा धोका असतो; पण मीठ कमी केल्यास रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते. आपल्याला साधारणपणे एका दिवसात सहा ग्रॅमपेक्षा जास्त मीठ म्हणजे एक छोट्या चमचापेक्षा जास्त मीठ आहारात नको, असे तज्ज्ञ सांगतात. आपण मिठाचे प्रमाण जर एक-दोन आठवडेसुद्धा कमी ठेवले, तर आपल्या जिभेवरील स्वाद इंद्रिये बदलून जातात आणि आपल्याला जास्त मिठाची गरज वाटेनाशी होते.

आपल्याला कमी मिठामध्येसुद्धा चव जाणवायला लागते. धूम्रपान- मद्यपान टाळा- आपल्याला धूम्रपान किंवा नियमित मद्यपानाची सवय असेल, तर ते कमी करणे फार आवश्यक आहे. धूम्रपान आणि मद्यपान यामुळे आपल्या रक्तवाहिन्या, हृदय आणि रक्तदाबावर खूप मोठा फरक पडतो. सिगारेट पिल्यावर लगेच रक्तदाब वाढतो, असे दिसते. दारूमुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते. जर या सवयी बंद झाल्या, तर आपला रक्तदाब औषधांशिवायसुद्धा कमी होऊ शकतो, असे बऱ्याच रुग्णांमध्ये दिसून येते. ताणतणावाचासुद्धा आपल्या रक्तदाबावर खूप मोठा परिणाम होतो. जर सतत ताणतणाव असेल, तर आपल्या शरीरातील हार्मोन्ससुद्धा बदलून जातात. ताणतणाव हा काही काळासाठी असेल, तर तो उपयुक्त असू शकतो; पण सतत झाला तर तो आजारासाठी निमंत्रण ठरतो. म्हणून आपण ताणतणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ध्यानधारणा, योगासने व नियमित व्यायाम हे ताणतणाव निवारण करण्यासाठी चांगले उपाय आहेत. ज्यांचे बीपी थोडेफार वाढले आहे म्हणजेच प्री-हायपर टेंशन आहे, अशा लोकांचे बीपी जीवनशैलीत पुरेसे बदल केले तर बरेचदा औषधांशिवायसुद्धा नियंत्रणात येते. काही लोकांचे बीपी जीवनशैलीतील बदल करूनसुद्धा पुरेसे नियंत्रणात येत नाही, सतत वाढलेले राहते, अशा वेळी आपल्याला औषधोपचार सुरू करावा लागतो. उच्च रक्तदाबाच्या औषधोपचारामध्ये मूत्रपिंडामधील अन्जीयोटेनसीन कन्वर्तींग इन्झाईम नावाच्या रसायनाच्या कामांमध्ये बदल करणारी औषधे बरेचदा वापरली जातात. याशिवाय लघवीमार्फत क्षार बाहेर टाकणारी औषधे यांना आपण डाययुरेटिक म्हणतो, अशी औषधे रक्तदाब कमी करण्यासाठी वापरण्यात येतात.

क्लोरथालीडॉनसारखी औषधे या गटात येतात. बीटा ब्लॉकर नावाची काही औषधे रक्‍तदाब कमी करण्यासाठी वापरण्यात येतात. कॅल्शियम चांनेल ब्लॉकर या गटातील औषधेसुद्धा रक्तवाहिन्यांना शिथिल करण्यात मदत करतात आणि रक्तदाब कमी करतात. रक्तदाब नियंत्रणात आणणारी औषधे घेतल्यावर काही लोकांना कोरडा खोकला येऊ शकतो. तसेच, कॅल्शियम चांनेल ब्लॉकर औषधे घेतल्यावर काही लोकांना पायावर सूज येऊ शकते. बीपी कमी करणारी औषधे सुरू केल्यानंतर काही लोकांना थोडे चक्कर आल्यासारखेसुद्धा वाटू शकते. औषधांचे हे दुष्परिणाम दिसल्यास डॉक्टर औषधे बदलून देऊ शकतात. बरेचदा औषधांचे कुठलेही दुष्परिणाम दिसत नाहीत. औषध उपचारांचा फायदा जेव्हा दुष्परिणामापेक्षा मोठा असतो, तेव्हाच डॉक्टर औषध देतात, त्यामुळे आपल्या औषधांविषयी काही शंका असल्यास डॉक्टरांना भेटावे. आपणास स्वस्थ आणि तंदुरुस्त राहिलात तर मलाही सुखाची झोप घेता येईल, आपण सदैव सुखी रहावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.द्वारा- प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास,रामनगर, गडचिरोली. फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here