Home पुणे सुंदर नाते मैत्रीचे

सुंदर नाते मैत्रीचे

119

( मैत्री दिनानिमित्त विशेष लेख )

मैत्री पाहायला गेलं तर अगदी दोन अक्षरी शब्द पण या दोन अक्षरी शब्दात जगातील सर्वात पवित्र अशी भावना लपली आहे. जगातील सर्वात सुंदर नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं नातं, कारण या नात्यात कोणताही स्वार्थ नसतो. मैत्री कधीही ठरवून होत नाही. मैत्री कशी, कधी, कोणाशी होईल हे कोणीच सांगू शकत नाही. मैत्रीला काळाची, वेळेची, वयाची बंधने नसतात. मैत्रीत जात, धर्म, वर्ण, लिंग असा कोणताही भेदभाव नसतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणाशीही मैत्री होऊ शकते. समान छंद, समान आवडी, समान विचारधारा आणि परस्परांचे स्वभाव जुळले की मैत्री जमते. रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते महत्वाचे आहे. जगात मित्र नाही असा कोणताच व्यक्ती नाही. भारतात तर पौराणिक काळापासून मैत्रीला महत्व आहे. श्रीकृष्ण सुदामा यांची तर मैत्री अजरामर आहे. काळ बदलला तरी मैत्रितील पवित्र भावना आजही तीच आहे. मैत्रीही प्रामाणिक आणि तरळ भावना आहे. मित्रा समोरच आपण आपलं मन मोकळं करू शकतो. मानवी जीवनात क्षणाक्षणाला काहीना काही घडत असते. काही चांगले काही वाईट घडत असते.

या बऱ्या वाईट घटनांच्या अपरिहार्यतेचा विचार करता मैत्री आणि मित्र आवश्यक असतातच. मंदिरातील देवासमोर जसे आपण आपले मन मोकळे करतो तसेच आपण आपल्या खऱ्या मित्रजवळही आपले मन मोकळे करतो. आजकाल मैत्रीतही हिशोबीपणा आला आहे. मैत्रीतही स्वार्थ आला आहे. त्यामुळे मैत्रिची पवित्र भावना काळवंडू लागली आहे. स्वार्थाच्या अंधारात मैत्री चाचपडू लागली आहे त्यामुळे मैत्रीतून मिळणारा आनंदही कमी होऊ लागला आहे. स्वार्थी मित्र आपण सहज ओळखू शकतो. स्वतःच्या स्वार्थासाठी जवळ येणारे मित्र आपल्याला संकटकाळात मदत करत नाहीत. जो आपल्याला संकटकाळात मदत करतो तोच खरा मित्र असतो. जीवनाच्या प्रवासात अनेक मित्र भेटतात, निघून जातात पण मनाने जुळलेले मित्र मात्र कायम राहतात. मित्रांमुळे आपल्याला व्यवहार कळतो. अडचणी सुटतात, संकटावर मात करण्याचे धाडस निर्माण होते. मैत्रीमुळे आपली निर्णय क्षमता वाढते. इतकेच काय तर मैत्रीमुळेच माणूसकी जिवंत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केवळ सहवास म्हणजे मैत्री नव्हे, सहवास आणि मैत्री यात फरक आहे.

सहवासाने मैत्री फुलत जाते हे जरी खरे असले तरी मैत्रीसाठी मित्र दररोज जवळ असावाच असे काही नाही. अनेकदा जिवलग मित्र जवळ नसतात. कित्येक दिवस त्यांच्यात बातचीत होत नाही तरीही त्यांची मैत्री कायम असते अगदी श्रीकृष्ण सुदाम्या सारखी. पु .ल. देशपांडे यांनी मैत्री विषयी एक फार सुंदर कविता लिहिली आहे. ते लिहितात रोज आठवण व्हावी असे काही नाही. इतकंच काय रोज बोलणं व्हावं असंही काही नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणे ही झाली मैत्री. अशी सरळ सोपी पण घट्ट मैत्री टिकवणं, निर्माण करणं फार कठीण नाही आणि फार सोपंही नाही. मनाचा एवढा हळवेपणा नवरा बायकोच्या नात्यामध्ये नाही हो येत, तिथे मित्रच असावा लागतो.

कारण इतर कोणत्याही नात्याला आपण नाव दिले की, त्याबरोबर कौटुंबिक, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक बंधने येतात. या नात्याला मात्र कसले नाव नाही त्यामुळे कसली बंधनंही नाहीत किंबहुना ती तशी नसावीतही. मित्रांशी वाट्टेल त्या विषयावर आपण गप्पा मारू शकतो, मोकळे होऊ शकतो, तिथे स्त्री – पुरुष, जात – पात, वय काही आडवे येत नाही. मनसुबा बनून जातो आणि मन आनंदी होतं. शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं. पु ल नी मैत्री विषयी किती छान शब्दात लिहिलंय. मैत्री अशीच असते अगदी सुंदर. ज्याने मैत्रीचे सुंदर नाते जपले त्याचे जीवन आनंदाने फुलून गेले. मैत्रीसारखे सुंदर नाते या जगात दुसरे कोणतेही नाही, ज्याला मैत्री समजली त्याला जीवन समजले.

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here