मोर्शी तालुका प्रतिनिधी /
संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या अटकेची मागणी केली.
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. एक प्रकारे संभाजी भिडे यांनी अशा प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्य करून या महापुरुषांचा अपमानच केलेला आहे, असं मत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केलं संभाजी भिडे यांच्या विषयासंदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. संभाजी भिडे यांच्या पाठीमागे कोण आहे, ते एवढं धारिष्ट का करत आहे याचा शोध घेऊन सरकारने कारवाई केली पाहिजे असंही यावेळी आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.
राष्ट्र पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी संभाजी भिडे हे काही बेताल वक्तव्य करत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, साईबाबा, महात्मा फुले यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करून त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. अशा या माणसाला तातडीने अटक करून कडक शिक्षा करावी अशी मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे भारताची जगात ओळख झाली आहे. लोकशाहीला ताकद देणाऱ्या पुरोगामी विचारांचे असणाऱ्या गांधीजींनी सातत्याने देशाच्या एकात्मतेसाठी काम केले असून पुढील पिढ्यांना विचार दिला आहे. त्यांच्याच विचारावर देशाची वाटचाल सुरू असून काही विकृत प्रवृत्तींकडून होणाऱ्या या अवमानकारक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.
