Home सामाजिक  चिमूर जिल्ह्याची घोषणा लवकरच !

चिमूर जिल्ह्याची घोषणा लवकरच !

234

🔸चिमुरकरांना लागले जिल्ह्याचे डोहाळे ?

16 ऑगष्ट जवळ येत आहे. या दिवसावर केवळ आणि केवळ चिमूरकरांचेच वर्चस्व राहिले आहे. कुणी कितीही जीव आपटून जिल्ह्याची मागणी करा. धरणे, आंदोलने करा, निवेदने द्या, मात्र जिल्हा चिमूरच होईल ! हे सूर्य प्रकाशा इतके सत्य असून काळ्या दगडावरील पांढरी रेषा आहे. हे नाकारता येणार नाही. होय, हे खरंच आहे. चिमूर जिल्हा घोषणे बाबत अनेक जी. आर. शासनाकडून काढण्यात येत असून दिनांक 16 ऑगष्ट रोजी चिमूर क्रांती जिल्हा घोषित होत आहे. ज्या नेत्यांच्या अथक परिश्रमाने उबडे उताने पडून चिमूर जिल्ह्याची घोषणा होत आहे, अशा नेत्यांचे आता पासूनच त्यांच्या बगलबच्छा कडून अगदी अंतःकरनापासुन अभिनंदन करणे सुरु झाले आहे. कानामागून आलेल्या नेत्याने जिल्ह्याचे श्रेय घेणे किंवा अशा नेत्यांना श्रेय देणे यामुळे खऱ्या अर्थाने ज्या नेत्यांनी, संघटनांनी, पक्षांनी आंदोलने मोर्चे करून व निवेदने देऊन चिमूर जिल्ह्या करिता प्रयत्न केले.

त्यांनी नाराज होण्याचे काही कारण नाही. त्याच प्रमाणे नागभीडकर, वरोरावासीय, ब्रम्हपुरीकर, सिंदेवाहीकर, व तळोधीकर (बा) यांच्या जिल्हा निर्मितीच्या प्रयत्नांना त्यांना जरी यश आले नाही तरी त्यांनी खचून न जाता जिल्ह्याची मागणी सतत करित राहिले पाहिजे. ज्या प्रमाणे चिमूरकर 16 ऑगष्ट येताच चिमूर जिल्ह्याची मागणी लावून धरतात. दोन तीन लोकांनी मिळून निवेदने देतात. त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी शासनाला चिमूर जिल्हा घोषित करणे भाग पडले आहे. येत्या 16 ऑगष्ट ला चिमूर जिल्हा घोषणेचा एक भाग म्हणून प्रथम चरणात अप्पर जिल्हाधिकाऱ्याचा आदेश निघत आहे असे व्हाट्सअप ग्रुप मधील संदेशा वरून विश्वसनिय कळते.

आता या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला कोणते अधिकार असतात? चिमूरला अप्पर जिल्हाधिकाऱ्याची किती वेळा नियुक्ती आजपर्यंत झाली? 16 तारखेला नियुक्ती झाल्यानंतर 17 तारखे पासून हे अप्पर जिल्हाधिकारी महाशय कुठे गायब होतात? यांची नियुक्ती 16 ऑगष्ट फक्त एक दिवसाकरिता क्रांतीदिनीच असते काय ? एका दिवसाच्या अपर जिल्हाधिकाऱ्यासाठी काही चिमूरकर एवढे आनंदित होतात की त्यांचा आनंद गगनातही मावेनासा होतो. आणि बिचाऱ्या ठकबाज नेत्यांची नाही तशी खोटी नाटी स्तुती करणे सुरु करतात.

असो,याद्वारे चिमूर व चिमूर जिल्ह्यात समाविष्ट असलेल्या संपूर्ण तालुक्यातील जनतेने त्यांचे जिल्हा कार्यालयातील कोणतेही काम दिनांक 16 ऑगष्ट ला चिमूर जिल्हा कार्यालयात घेऊन यावे. व एका दिवसात जेव्हढी कामे अप्पर जिल्हाधिकारी यांचे कडून करवून घेता येईल ती कामे करून घ्यावी. या दिवसाला न झालेली अपूर्ण कामे दुसऱ्या दिवशी म्हणजे 17, 18 ऑगस्ट या तारखेला होईल अशी अपेक्षा ठेवू नये. वा स्वप्नही पाहू नये. कारण सालाबादा प्रमाणे फक्त दिनांक 16 ऑगष्ट ला चिमूर जिल्हा असतो नंतर कोणत्या छिद्रात जाऊन घुसतो तेच कळत नाही. त्यामुळेच आमची चिमूरकरांची जिल्ह्याची मागणी एक दिवसाची असते. 16 ऑगष्ट हा एक दिवस सोडून वर्षातील उर्वरित काळाकरिता इतर कोणीही जिल्हा मागणी करीत असेल तर त्यांना आमचा चिमूरकरांचा सुद्धा पाठींबा राहील.

जर चिमूरकर एक दिवसाच्या चिमूर जिल्हा घोषणेत आनंदी राहून वर्षातील तीनशे चौसष्ट दिवसांचा त्याग करून जिल्हा मागणी करणाऱ्याना इतरांना पाठींबा देत असेल तर इतरांनी सुद्धा 16 ऑगष्ट या दिवसाचा त्याग करून जिल्हाची मागणी केली पाहिजे.

16 ऑगष्ट ही तारीख जवळ येत असल्याने चिमूरकरांना चिमूर जिल्ह्याचे डोहाळे लागले असल्याचे सध्यातरी दिसत आहे.
मेहनत वरोरा, नागभीडकरांची आणि लाभ चिमूरला? समाजसेवेचा खानदानी वारसा नाही. कधीही बाप आजोबाने समाजकार्य केले नाही. जेमतेम दहावी नापास असला तरी एक दिवसाचा कां होईना परंतु जिल्हा करून दाखवितो अशा ठकबाज कर्तबगार, समाजसेवी सातारा लुटून पुण्याला दान करणाऱ्या नेत्यांना वरोरा, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही येथील जनतेनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यास ते सर्व तालुके रातोरात जिल्हा झाल्यााशिवाय राहणार नाही.

*चिमूरला क्रांती जिल्हा घोषित करा. अप्पर जिल्हाधिकाऱ्याच बुजगावणं नियुक्त करून चिमूरकरांची चेष्टा करू नये. घोडा मैदान जवळ आहे. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. हे ध्यानात ठेवा. ‘मस्ती करोगे तो ना संभलेगी बिमारी”*

✒️सारंग दाभेकर(समन्वयक,चिमूर विधानसभा क्षेत्र,भारत राष्ट्र समिती)मो:-9422913090

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here