Home अमरावती जननायक वा. मो. उपाख्य स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या संपूर्ण जीवनपटाचे दर्शन घडविणारा...

जननायक वा. मो. उपाख्य स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या संपूर्ण जीवनपटाचे दर्शन घडविणारा “दादा ” हा गौरवग्रंथ

143

” दादा ” हा जननायक वा. मो. उपाख्य दादासाहेब काळमेघ हा गौरवग्रंथ दि.२९जुलै २०२२ ला दादांच्या पंचविसाव्या स्मृतिदिनानिमित्त अमरावती येथे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात प्रकाशित झाला. हा गौरवग्रंथ माझ्या वाचण्यात आला कारण स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे सचिव मा. श्री हेमंतजी कळमेघ यांनी या गौरवग्रंथातील प्रत्येक लेखकाच्या घरी जाऊन हा गौरवग्रंथ भेट देण्याची व्यवस्था केली आणि सोबतच लेखाबद्दल आभारपत्रही प्रत्येक लेखकाला दिले.माझा सुद्धा या गौरवग्रंथात ” परिवर्तन घडविणारी दादासाहेबांची काव्यसंपदा ” हा काव्यमय लेख असल्यामुळे मला सुद्धा हा ६०० पृष्ठसंख्या असलेला गौरवग्रंथ घरपोच सस्नेह भेट मिळाला.१२६ लेखकांपर्यंत हा गौरवग्रंथ पोहोचविण्याची व्यवस्था करणाऱ्या विशाल हृदयाच्या मा.श्री.हेमंतजी काळमेघ यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो.

प्रा.मनीष चोपडे तयार केलेल्या यांनी सुंदर, अर्थपूर्ण, योग्य रंगसंगतीचे आकर्षक मुखपृष्ठ व मलपृष्ठ असलेल्या ” दादा ” या गौरव ग्रंथाचा ओनामा छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व जननायक वा. मो. उपाख्य स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या रंगीत तैलेचित्रांनी होतो.त्यानंतर केंद्रीय मंत्री मा.श्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस,माजी मुख्यमंत्रीश्री अशोकजी चव्हाण, निवृत्त आय. ए. एस. अधिकारीश्रीनिवास पाटील, रामटेक मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने, माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलाताई गवई, डॉ.विजय भटकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष आर. चौधरी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू स्व. प्रा. डॉ.दिलीप ना. मालखेडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे या गौरवग्रंथाला लाभलेले शुभेच्छा संदेश म्हणजे दादासाहेबांवर त्यांच्या कार्यकर्तृत्वांवर ते करीत असलेले प्रेमच होय,असेच म्हणावे लागेल.
कारण या प्रत्येक शुभेच्छा संदेशातून प्रज्ञावंत ज्ञानयोगी, लोकसंत, जन प्रबोधनकार, प्रज्ञावंत प्रशासक असा दादासाहेबांचा गौरव केलेला आहे.

” दादा ” या गौरवग्रंथाचे संपादक सुप्रसिद्ध साहित्यिक, कथाकार प्रा.डॉ.सतीश तराळ यांनी आपल्या संपादकीयमध्ये या गौरवग्रंथांचे अंतरंग उलगडण्याचा उत्तम प्रयास केलेला आहे.१२६ लेखकांच्या सिद्धहस्थ लेखणीतून दादासाहेबांच्या जीवनपटातील विविध क्षेत्रातील कार्याचे आणि त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणारा ” दादा ” हा गौरवग्रंथ दादासाहेबांच्या रंगीत सूवर्णस्मृतिचित्रांनी अधिकच आकर्षक झालेला आहे.

” दादा ” या गौरवग्रंथाचे संपादक प्रा. डॉ. सतीश तराळ संपादक मंडळातील हेमंतजी काळमेघ, प्रा. डॉ. मंदा नांदूरकर, प्रा.मनीष चोपडे डॉ. मंजूषा चौखंडे -काळमेघ, प्रा.सुधर्मा हांडे यांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेऊन ” दादा ” या गौरवग्रंथाला सर्वांगसुंदर मूर्त रूप दिलेले आहे. याशिवाय श्री शरदजी काळमेघ, दादासाहेबांच्या संपूर्ण जीवनपटावरील ” विदर्भाचा वारकरी ” हा ग्रंथ लिहिणारे प्राचार्य भा.वा. चौखंडे, प्रा.गजानन रामकृष्णजी भारसाकळे (अध्यक्ष ,संत गाडगेबाबा मंडळ, दर्यापूर ), प्राची मेंढे, प्रा. डॉ.अनघा अमित गावंडे, सरिता खोबरे, मंदार देशमुख, संदीप पुंडकर, राजेश गायगोले, लक्ष्मीनारायण जयस्वाल यांनी सुद्धा या गौरवग्रंथासाठी भरपूर परिश्रम घेतले.या सर्वांच्या परिश्रमाचे सुंदर फळ म्हणजे ” दादा ” हा गौरवग्रंथ होय.

“दादा ” हा गौरवग्रंथ आशय – अभिव्यक्ती पासून तर मुखपृष्ठ, मलपृष्ठ, आकर्षक बांधणी, कागद अशा सर्वच अंगांनी परिपूर्ण आणि अप्रतिम झालेला आहे. हेमंतजी काळमेघ यांचे परिश्रम, सर्वदूर असलेले त्यांचे संबंध, सकारात्मक दृष्टिकोन, दादासाहेबांसारखाच मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभाव यामुळे एका मागे एक लेख मिळत जाऊन लेखांची संख्या १२६ वर कधी पोहोचली त्यांना सुद्धा कळले नाही आणि त्यामुळे या गौरवग्रंथाची पृष्ठसंख्या सूवर्ण स्मृतिचित्रांसह सहाशे झाली.
श्री क्षेत्र अंजनगाव सूर्जी मधील श्रीनाथ श्री देवनाथ मठ येथील पूज्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या “आदरणीय दादासाहेब ” या लेखाने ” दादा ” या गौरवग्रंथाचा ओनामा झालेला आहे. पूज्य जितेंद्रनाथ महाराजांनी दादांच्या गोड स्मृतीचे स्मरण करून देतानाच दादा एक चालते बोलते समाज कल्याणाचे विद्यापीठ, संतसदृश्य निरागस भाव व निस्पृहता असलेले, मानवीय परोपकार, मातृहृदय, संतवृत्ती आणि सामाजिक संवेदना कोणत्याही पदावर असताना कधी ढळू न देणारे, डॉ. पंजाबराव देशमुख यांचा वैचारिक व धोरणात्मक वारसा चालविणारे पुरुषार्थी उत्तराधिकारी अशा मोजक्या शब्दात दादासाहेबांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्यांनी घडविले आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष मा.श्री हर्षवर्धन प्र.देशमुख यांनी “असामान्य सामाजिक व्यक्तिमत्त्व “या मथळ्याखाली दादासाहेबांचा खडतर शैक्षणिक प्रवास,कुलगुरू ते श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंतचा जीवनपट प्रासादिक शब्दात रेखाटलेला आहे. कुलगुरू असताना त्यांचे विद्यार्थी केंद्री निर्णय, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे, ग्रामातील लोकांना आधार वाटणारे कुलगुरू त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत.

श्री संत अच्युत महाराजांचे परमशिष्य श्री सचिन देव महाराज यांनी ” संत सेवक भूदेव ” या लेखामध्ये अनेक गोरगरिबांच्या उच्चशिक्षित मुलामुलींना नोकरीला लावून त्यांचे कल्याण करणारे भूदेव म्हणजे दादासाहेब काळमेघ ही त्यांनी करून दिलेली ओळख सार्थ वाटते. “जनउद्धारक ज्ञानसागर दादासाहेब ” हा सुरेश हावरे यांनी लिहिलेल्या लेखात स्व.दादासाहेबांच्या आदर्शमय जीवनातून बोध घेऊन देशाची तथा समाजाची सेवा करणारी सुसंस्कृत पिढी निर्माण होईल.त्या दृष्टीने दादासाहेबांच्या या गौरव ग्रंथाचे मोल अनमोल आहे हा महत्त्वपूर्ण विचार मांडलेला आहे.

” दादांचे कीर्तन ।
प्रबोधन सत्र ॥
जीवनाचे सूत्र ।
सांगतसे ॥ 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे माजी कुलगुरू डॉ .शरद निंबाळकर यांनी “विदर्भ गुरुकुलाचे कुलगुरू दादासाहेब ” या लेखांमध्ये अनेक वर्षापासून सर्वांसाठी शिक्षण या ध्येयासाठी झटणाऱ्या अनेक धुरिणांपैकी एक दादासाहेब आहेत,त्यांनी अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्हयासोबतच अनेक जिल्ह्यात शिक्षणाचा प्रसार व प्रचार केलेला आहे. दादांच्या या शैक्षणिक कार्याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे.दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी दादासाहेब हे अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व होते. निर्मळमनाचे सर्वांशी पारदर्शक व्यवहार ठेवणारे दूरदृष्टी असलेले,राजकीय विरोधकांनाही सन्मान देणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कोषाध्यक्ष दिलीप भ. इंगोले यांनी दादासाहेब एक तपस्वी, तेजोमय व्यक्तिमत्त्व, एक अभ्यासू आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व, कडक प्रशासक, काम करण्याची आगळीवेगळी शैली आणि सर्वांसाठी आपलेपणा या गुणांमुळे दादासाहेबांविषयी मला खूप आदर होता असा त्यांनी आपल्या लेखात दादासाहेबांचा उल्लेख केलेला आहे.

” विनम्र नम्रता ।
मार्ग यशस्विता ॥
सूर्य तेजस्विता ।
चर्येवर ॥ “

डॉ.एकनाथ गावंडे यांनी दादा तसे धार्मिक पण धर्मभोळे नव्हते. संत मंडळी सोबत त्यांचा सत्संग होता. धार्मिक कार्यक्रमांना प्रबोधनात्मक
स्वरूप दिले जावे ही त्यांची इच्छा, म्हणून ते कोणत्याही महात्म्यांपेक्षा कमी नव्हते, असे दादासाहेबांचे व्यक्तित्व शब्दातून साकार केले आहे. मा.प्राचार्य श्री केशवराव गावंडे यांनी सहृदयी दादासाहेब रेखाटून दादासाहेबांच्या कृती आणि उक्तीमध्ये कुठलाही फरक नव्हता. त्यांनी कीर्तनातून वैचारिक क्रांती केली. त्यांचे वृत्ती लोकसंग्रह करण्याची होती हे अवर्जून सांगितले आहे.

” कीर्तनाने केली ।
सामाजिक क्रांती ॥
वैचारिक क्रांती ।
दादांनीच ।।

कविवर्य मा.विठ्ठल वाघ यांची दादांवरील ” दृष्टा” ही कविता मनाला स्पर्शून जाते. ते म्हणतात की ,

” कुलगुरू तू नव्हता केवळ
लोक विद्यापीठ खरेखुरे
वैचारिक जी दिली शिदोरी
पुरून वर्तमानास उरे “

” दादा ” या गौरवग्रंथात याशिवाय अनेक मान्यवरांचे लेख आणि दादासाहेबांवरील कविता सुद्धा आहेत. प्राचार्य भा.वा. चौखंडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू कमल सिंग, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, रा.तु .म. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंकज चांदे, सं.गा.बा. अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जी. व्ही.पाटील, माजी आमदार तथा उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे नरेशचंद्र ठाकरे, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे माजी उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी कोषाध्यक्ष हरिहर बापूराव ठाकरे, रातुम विद्यापीठ नागपूरचे माजी कुलसचिव डॉ.नारायण भावे, डॉ. वि.गो.भांबुरकर, प्रा.डॉ.वंदन मोहोड, रातुम नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाष बेलसरे, प्राचार्य डॉ.रमेश अंधारे, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख, डॉ.भी.र.वाघमारे,
रातुम नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ.पुराणचंद्र मेश्राम, डॉ.वसंतराव घुरडे, इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख, बी.के. देशमुख, प्रा. टी. व्ही.वऱ्हेकर,डॉ.आर.एल. काळे, महादेवराव कृष्णाजी कानफाडे, माणिकराव पोटे, प्रा.बाबासाहेब राणे, विनायकराव मोडसे मा.खान मोहंमद अजहर हुसेन,डॉ. वसंतराव पु.टाले, मा.अण्णासाहेब रेचे, मा.जगदेवराव बाहेकर, प्राचार्य श्री नानासाहेब राऊत,श्रीमती उषा चौधरी, मा.सुभाष कोल्हे, प्रा.एकनाथ उपाध्ये, डॉ. के.एन.खांडेकर, डॉ. पी.जी. तराळे, डॉ. मनोरमा हरिभाऊ पुंडकर, डॉ.पुरुषोत्तम तायडे, प्रा. डॉ. पी. एस. वाटाणे, डॉ.के.एम.टाले,डॉ.पंजाबराव म्हाला, मा.सहदेव बिसनजी पंचभाई, डॉ.जयदेवराव ना.साबळे, प्रा.प्रभाकर कोलखेडे मा.एकनाथ बंड,प्राचार्य मा. सुधाकर देशपांडे, मा.प्रभाकर फुसे, मा.केशव मेटकर,डॉ.दिनकर गायगोले, अँड.श्रीरंग पाटील अरबट, डॉ.बबन मा,चौधरी, प्रा.डॉ. सतीश तराळ, डॉ. नरेशचंद्र काठोळे, प्राचार्या डॉ. अनुप्रीता म. देशमुख, डॉ.मंजूषा सुशील काळमेघ, सौ.आशा प्र. फुसे,सौ. अर्पणा शिरीष धोत्रे,श्रीमती मंदाताई बाळासाहेब गावंडे, प्रा.डॉ.अनघा सोनखासकर, डॉ. ललिता अशोकराव देशमुख, प्रा.डॉ.अनघा अमित गावंडे, प्रा.डॉ.अमित बाळासाहेब गावंडे, प्राचार्य मा.दिलीपसिंह खांबरे, डॉ. विजय दरणे, मा.विष्णू सोळंके, प्रा. सुभाष त्र्या. बारब्दे, मा.रामचंद्र माकोडे,सुबोध दादाराव सोनवणे, प्राचार्य मा.प्रभाकर सरदार, प्रा.भैय्यासाहेब देशमुख,डॉ.महेंद्र विनायकराव मेटे, मा.संजय देशमुख, प्रा.राजेंद्र नानाजी कदम डॉ.शिवाजी झोंबाडे.प्राचार्य गजानन चोपडे,प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे, मा.दिनेश मा. देशमुख, प्रा.डॉ.संतोष वि.आंबेकर, प्रा. डॉ.अंबादास मोहिते, मा. नरेंशचंद्र मधुकरराव पाटील,प्राचार्य डॉ.पी.आर. राजपूत,प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले, मा.प्राचार्य डॉ. म.मो. कंकाळे, मा.प्राचार्य डॉ. के . आर. जाधव, प्रा. राजेंद्र विठ्ठलराव रिठे,प्राचार्य डॉ.रामेश्वर मा.भिसे, मा.दिवाकर कोठिकर,प्रा.सुधर्मा हांडे,प्रा.कु.सरिता सुभाषराव पन्नासे,प्रा.गजानन भारसाकळे, प्राचार्य रामदासपंत मोतीरामजी काळमेघ,अँड.अशोक गावंडे,मा.राजेंद्र भीमराव काळे,डॉ.बी. एच. बंड, डॉ. अशोक राऊत,मा.बाबासाहेब भोंडे, डॉ.एस.के. ठाकरे, प्रा.के.जी. देशमुख, मा.पुंडलिकराव आ.ढोरे,मा.नानासाहेब टाले,मा.हरिभाऊ पांडे,मा.बी.ए. कडू ,मा,ओमप्रकाश देशमुख, मा.नरेंद्र जुगलकिशोरजी लढ्ढा, डी. पी. ठाकरे, मा.कृष्णा श्री_ देशमुख, हिंमत सपकाळ, रामचंद्र माकोडे,मा.अशोक म्हात्रे, मा.सुबोध सोनोने,मा.संजय देशमुख या मान्यवरांचे दादासाहेबांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावरील लेख आणि निळकंठ बोंद्रे,कवीवर्य मा.विठ्ठल वाघ, मा.पुरुषोत्तमराव केशवराव सोमवंशी, प्रा.डॉ.मंदा माणिकराव नांदुरकर यांचे दादांवरील कविता व अभंगामुळे ” दादा ” हा गौरवग्रंथ संग्राह्य झालेला आहे. लेख मोठा होण्याच्या भयास्तव अनेक लेखकांच्या फक्त नावाचा उल्लेख केलेला आहे.

” दादा ” या गौरवग्रंथातील १२६ लेखकांनी लेखातून शब्दबद्ध केलेला दादासाहेबांचा जीवनपट प्रत्यक्ष गौरवग्रंथातून वाचला तर
तर वाचकाला दादासाहेबांचे प्रत्यक्ष दर्शन घडेल यात शंका नाही. करण दादासाहेबांच्या विविधांगी सत्कर्माचा ,जनप्रबोधनाचा, प्रज्ञावंत प्रशासनाचा अनमोल ठेवा म्हणजे ” दादा ” हा गौरवग्रंथ होय.

“गौरवाचा ग्रंथ ।
दादासाहेबांचा ॥
कार्य कर्तुत्वाचा ।
स्नेहबंध ॥”

जननायक वा.मो.उपाध्यक्ष स्व.दादासाहेब काळमेघ यांच्या आज दिनांक२९ जुलै २०२३ ला असलेल्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली अर्पण करतो.

“दादासाहेबांचा ।
आज स्मृतिदिन ॥
करांनी वंदन ।
कोटी कोटी ॥”

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(माजी पर्यवेक्षक,नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,नांदगाव खंडेश्वर,जि.अमरावती . भ्रमणध्वनी : ८०८७७४८६०९)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here