Home नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांना पदावरून हटविले-राजकीय पक्षात बौद्ध पुढाऱ्यांवरील अन्यायाची परंपरा...

भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांना पदावरून हटविले-राजकीय पक्षात बौद्ध पुढाऱ्यांवरील अन्यायाची परंपरा कायम

166

✒️नागपुर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 नागपूर(दि.28जुलै):-गेल्या अनेक वर्षांपासून बौद्ध अधिकारी आणि पुढाऱ्यांवर अन्याय करण्याची परंपरा भाजप पक्षानेही कायम ठेवली आहे. बौद्ध पुढाऱ्यांकडून संघटनेचे काम करून ऐनवेळी त्यांना पदावरून हटवून राजकीय पोळी शेकण्याचा गोरखधंदा राजकीय पक्षाचा होता. तोच कित्ता भाजपनेही गिरवला आहे. साडेतीन वर्षे नागपूर जिल्‍ह्यात घरोघरी फिरून पक्ष संघटन मजबूत केले. त्याचे बक्षीस म्हणून अरविंद गजभिये यांना पदावरून हटविण्यात आले. भाजपच्या या कृतीचा बौद्ध समाजातून निषेध करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या ७० वर्षाच्या कार्यकाळात बौद्ध समाजावरील अन्यायात कुठेही बदल करण्याचा प्रयत्न झाला नसल्याने अलीकडच्या काळात भाजपविषयी सहानुभूती निर्माण झाली होती.परंतु,

अरविंद गजभिये सारख्या कार्यकर्त्याला तो बौद्ध आहे म्हणून त्यांच्यावर अन्याय करण्याचे जघन्य पाप भाजपच्या काळात झाले असल्याने बौद्ध समाजात असंतोष दिसत आहे. कॉंग्रेस कितीही पुरोगामी असल्याचा ढोल बडवत असली तरी सर्वाधिक अन्याय त्यांच्या कार्यकाळात बौद्ध पुढारी आणि अधिकाऱ्यांवर झाला आहे. तर गेल्या काही वर्षांत तोच कित्ता भाजप,राष्ट्रवादी,शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांनी गिरवला आहे. अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या जाचाला कंटाळून नोकरीचा राजीनामा दिला किंवा त्यांना महत्त्वाच्या पदावरून डावलण्यात आले. तरीही बौद्ध समाजाचे पुढाऱ्यांनी स्वतःचे पक्ष काढून स्वतःचा स्वाभीमान जागृत ठेवला आहे. भाजपमध्ये बौद्ध समाजाला स्थान मिळत नाही म्हणून अनेक पुढारी या पक्षाकडे जात नाही.

मात्र जे काही नेते आहेत त्यांच्यावरही अन्याय होत असल्याचे दिसून येते. नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष अरविंद गजभिये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे पदाधिकारी आहे. अनेक वर्षे त्यांनी महामंत्री म्हणून पक्षसंघटन मजबूत केले. साडेतीन वर्षांपूर्वी त्यांना जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भाजपचे संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न केले. उमरेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असतानाही त्यांनी उमेदवारी देण्यात आली नाही. एकदा नव्हे तर दोनदा त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. सुधीर पारवे यांना दोनदा संधी दिल्यानंतरही जनतेचा रोष असतानाही त्यांना पुन्हा संधी देण्यात आली तर अरविंद गजभिये हे बौद्ध समाजाचे असल्यामुळे त्यांना भाजपने संधी नाकारली. परिणामी उमरेडमधून भाजपचे सुधीर पारवे यांचा दारुण पराभव झाला.अरविंद गजभिये यांनी नाराज न होता पक्षाला मजबूत करण्याचा विडा उचलला.

गावागावात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी भर दिला. कार्यकर्ते जोडले. बौद्ध समाजाचे अनेक तरुण त्यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये सहभागी झाले. मात्र,त्यांच्या कार्याची दखल न घेता त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम भाजपने केले आहे. तोच प्रकार शिरीष मेश्राम, संजय मेश्राम यांच्यावर कॉंग्रेसने केला. खासदार मुकुल वासनिक हे बौद्ध समाजाचे असल्यामुळे त्यांना पाडण्याचे कामही भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी केले. शेवटी त्यांना राज्यसभेवर राजस्थानमधून जावे लागले. महाराष्ट्रात कॉंग्रेसकडून जाण्याची संधी असतानाही बौद्ध समाजाचा नेता म्हणून दगाफटका होऊ शकतो, याची जाणीव त्यांना असल्याने ते राजस्थानमधून विजय झाले. त्याप्रमाणे चंद्रकांत हांडोरे यांच्यासोबतही तोच प्रकार केला.
—–
*अरविंद गजभिये यांच्यावरील अन्यायाचा बौद्ध समाजाकडून निषेध*

भाजपमध्ये अरविंद गजभिये यांच्यावर अन्याय झाला आहे. बौद्ध समाजाचा नेता म्हणून त्यांना पदावरून हटविण्यात आले. याचा निषेध बौद्ध समाजातून सर्वस्तरातून होत आहे. अनेक नेत्यांनी अन्यायाची दखल घेतली आहे. भाजपला मतदान करताना येत्या निवडणुकीत विचार करावा लागेल, अशा भावनाही व्यक्त करण्यात आल्या आहेत.
—-
*अधिकाऱ्यांवरही अन्याय*

राजकीय पुढाऱ्यांवर अन्याय करण्यात येत आहे. मात्र, यातून अधिकारी सुटले नाही. श्याम तागडे, डॉ. प्रशांत नगरारे, किशोर गजभिये, देवयानी खोब्रागडे, राजेश ढाबरे, धम्मज्योती गजभिये, डॉ. चौधरी यांच्यावरही फक्त बौद्ध असल्याचा ठपका ठेऊन अन्याय करण्यात आला आहे. लायक असतानाही त्यांना महत्त्वाची पदे देण्यात येत नाही. बार्टी येथे तर बौद्ध अधिकारी आला तर त्यांच्यावर विविध आरोप करून त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे. राजेश ढाबरे, धम्मज्योती गजभिये या अधिकाऱ्यांना बार्टीमधील त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांच्यावर विविध आरोप करून पदावरून हटविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here