आ.डॉ.गुटृटे आक्रमक : रस्ते, पाणी, ग्रा.पं.कार्यालयसाठी निधीची मागणी
अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.25जुलै):-२०१४ मधील भाजप-शिवसेना सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या निधीतून मंजूर झालेले ४० किलोमीटरचे रस्ते तब्बल ८ वर्ष झाली तरी अजूनही पूर्ण का नाहीत? असा संतप्त सवाल करून गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना आक्रमक पवित्रा घेतला.
गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रातील ६५ गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर असूनही सुरू का होत नाही? ग्रामीण भागातल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच शेकडो गावांना ग्रामपंचायत कार्यालय नाही? त्यासाठी भरघोस निधी मिळावा. तसेच धान्य अधिकोष संस्थांचा कारभार उद्देश आणि हेतूस धरून नसल्याने त्या बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, काही कारणाने त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे त्या संस्था तात्काळ बंद कराव्यात, अशीही मागणी आ.डॉ.गुट्टे यांनी लावून धरली.
लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचे रस्ते, पाणी आणि ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम विषय मांडून कर्तव्यदक्ष आ.डॉ.गुट्टे यांनी आपले वेगळेपण जपले आहे. त्यामुळे गंगाखेडचा बुलंद आवाज विधानसभेत घुमला, अशी भावना लोक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, सर्वसामान्य लोकांनी मला मोठ्या विश्वासाने विधानसभेत पाठवले आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी मांडणे माझे कर्तव्य आहे. गेल्या आठवड्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला होता. आता रस्ते, पाणी, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम तसेच इतर काही मागण्या केल्या आहेत. पुढेही तळमळीने प्रश्न मांडून निधीच्या माध्यमातून चौफेर विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया आ.डॉ.गुट्टे यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली आहे.




