Home पुणे महिलांवर हक्क दाखविण्यातून हिंसा-प्रसिद्ध विधिज्ञ रमा सरोदे यांचे प्रतिपादन

महिलांवर हक्क दाखविण्यातून हिंसा-प्रसिद्ध विधिज्ञ रमा सरोदे यांचे प्रतिपादन

81

🔸प्रेम आणि हिंसा या विषयावरील युवा संवाद परिषद संपन्न

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.10जुलै):- प्रेमातील नकार स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. महिलांवर सत्ता गाजण्याच्या, मालकीहक्क सांगण्याच्या प्रवृतीतून हिंसा घडत आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ रमा सरोदे यांनी व्यक्त केले.

पुणे विद्यार्थी गृहाच्या सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभाग, युवा सहभाग विभाग व जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या पुढाकाराने महा. अंनिस, पुणे जिल्हा यांनी ‘प्रेम आणि हिंसा ‘ या विषयावर आयोजित केलेल्या युवा संवाद परिषदेत त्या बोलत होत्या. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महा. अंनिसचे प्रधानसचिव संजय बनसोडे होते. पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी परिषदेचे उदघाटन केले. महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी बीजभाषण केले. ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. अनिल डोंगरे, महा. अंनिसच्या महिला विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक, युवासाथी लेशपाल जवळगे यांनी परिषदेत मांडणी केली. हर्षल जाधव यांनी प्रास्ताविक केले. विशाल विमल यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. शाम येणगे यांनी समारोप केला.

परिषदेत ‘प्रेम आणि बरेच काही..’ या विषयावर बोलताना सरोदे म्हणाल्या की, ‘ कोणत्याही स्त्री-पुरुषांच्या नात्यांमध्ये स्पेस असावा. त्या नात्यांमध्ये स्पष्टता असली पाहिजे, दोघांनीही कोणत्याही क्षणी नाही म्हणण्याचा अधिकार मान्य केला पाहिजे, नात्यांमध्ये नाही म्हणण्याचा कायदेशीर अधिकार आहे, हे समजून घेतले पाहिजे. महिलांच्या बाबतीत जास्त शंका घेतल्या जातात, त्यांनाच दोषी ठरवले जाते, ही समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण करणारे कायदे आहेत, मात्र त्याबाबत व्यापक प्रबोधन होण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

संजय बनसोडे म्हणाले की, ‘प्रेमाचा व्यापक आणि वैश्विक दृष्टिकोन जाणून घेतला पाहिजे. अहिंसा हा प्रेमाचा मूलाधार आहे. जीवापाड प्रेम करतो म्हणायचे आणि जीवावर उठायचे ही विकृत मनोवृत्ती संपवली पाहिजे. प्रेम आणि मैत्रीने माणसाचे जीवन उन्नत होते. प्रेमळ जग तयार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.’

विवेकी जोडीदारामुळे जीवन अधिक समृद्ध होईल. संघटनेच्या माध्यमातून त्या बाबत सातत्याने प्रबोधन आणि कृती केली जात आहे. प्रेमामध्ये हिंसेला स्थान नाही. प्रेमाच्या उदात्त भावना जपल्या पाहिजेत. विवेकी जोडीदारासाठी आग्रही असेल पाहिजे, असे प्रतिपादन माधव बावगे यांनी केले.

डॉ. अनिल डोंगरे हे ‘ प्रेमा तुझा रंग कसा ‘ या विषयाची मांडणी करताना ते म्हणाले,” प्रेम,वासना आणि शारीरिक आकर्षण या मधला फरक समजून घेतला पाहिजे. वासनेमध्ये फक्त शारीरिक विचार केला जातो. आकर्षणामध्ये शारीरिक आणि भावनिक मुद्दे असतात. प्रेम ही दीर्घ प्रक्रिया आहे, पाहिल्या नजरेत कधी प्रेम होत नाही तर ते फक्त आकर्षणच असेल. प्रेमात सुरुवातीला परिचय होतो, आवडी निवडी समजतात, प्रेमाला विवेकाची जोड द्यावी लागते. प्रेम हे मुरंब्यासारखे असते तर आकर्षण हे फास्टफूडसारखे असते. प्रेम सावकाश होते. प्रेमात समानता आणि व्यक्तीचा अधिकार जपावा. लागतो. लग्ना अगोदर शारीरिक संबंध टाळण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही टप्प्यावर जोडीदाराला नाही म्हणण्याचा, निर्णय बदलण्याचा अधिकार असला पाहिजे. नकार पचवता आला पाहिजे, नकार देताना स्पष्ट शब्दात दिला पाहिजे. मात्र त्या व्यक्तीचा अपमान होणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे. अशा वेळी मित्र, मार्गदर्शक यांच्याशी बोलावे. प्रेमासाठी वाट्टेल ते करीन यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे.’ यावेळी डॉ. डोंगरे यांनी ‘प्रेम करा पण प्रेमासाठी प्राण प्रियेचा घेऊ नका’ हे उद्बोधक गीत सादर केले.

आरती नाईक यांनी ‘लव्ह आझाद है ‘ या विषयावर मांडणी केली, त्यावेळी त्या म्हणाल्या,’ प्रेमात सन्मान हवा. प्रेमात सिध्द करण्याची गरज नसावी. प्रेम आत्मविश्वास आणि जगण्याचे बळ देते. लव्ह जिहादचा बाऊ केला जात आहे, प्रेम करणाऱ्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रेमातील निवडीचे स्वातंत्र्य दिल गेले पाहिजे. लिंग समभावाचं मूल्य जोरकसपणे रुजवलं पाहिजे. कुटुंबामधील मोकळेपणाने होणारा संवाद हा प्रेमाला निश्चितपणे पूरक ठरेल. प्रीतीमध्ये भीती असू शकत नाही. प्रेम सिध्द करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याचा, बँकेचे किंवा मोबाईलचे पासवर्ड मागण्याचा आग्रह धरला जातो हे अत्यंत चुकीचे आहे. मानवी मूल्यांचा जागर करायला हवा.’

पुण्यामधील मुलीला जीवघेण्या हल्ल्यातून वाचविणारे लेशपाल जवळगे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. लेशपाल म्हणाले,’ मुलींच्यावर हल्ले करण्याच्या विकृत मनोवृत्तीचा धिक्कार केला पाहिजे. मी कर्तव्य भावनेतून त्या मुलीवर होणारा हल्ला रोखला. मुलींच्यावर टोमणे मारणे, वाईट नजरेने पाहणे ही ही एक प्रकारची हिंसा आहे.’

सुनील रेडेकर म्हणाले की,’ मुलीच्या जन्मापासून घरामध्ये भेदभाव सुरू होतो, पालकांनी मुलामुलींना समानतेने वाढवल्यास निकोप दृष्टिकोन तयार होईल. महिलांवरील अत्याचार, शोषण याचा निषेध केलाच पाहिजे.’

मयूर पटारे, ऍड. परिक्रमा खोत, अरिहंत अनामिका, माधुरी गायकवाड यांनी गाणी सादर केली. सम्यक वि.म. विनोद लातूरकर, स्वप्नील भोसले, संजय बारी यांनी वक्त्यांची परिचय आणि स्वागत केले. मनोज बोरसे, वनिता फाळके, श्वेता सूर्यवंशी, नितीन पाटील, कविता धोत्रे, अनुष्का कावले यांनी ठराव मांडले. तर्कशील सोसायटीचे सुभाषचंद्र सैनी उपस्थित होते. त्यांचे स्वागत रविकिरण काटकर यांनी केले. प्रियांका खेडेकर, उदय कदम, डॉ. ठाकसेन गोराणे, सुधाकर काशीद, श्रीनिवास शिंदे, अक्षय दावडीकर, मृणालिनी पवार, महेश गुरव, जुनेद सैय्यद, प्रतीक कालेकर, किर्तीवर्धन तायडे, एकनाथ पाठक, संदीप कांबळे, सदाशिव फाळके यांच्या सहभागाने परिषद झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here