Home बीड छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ स्मारक उभारण्यासाठी बैठक संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ स्मारक उभारण्यासाठी बैठक संपन्न

74

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.29मार्च):-शहरातील कोल्हेर रोड वरील साई सिद्धी हॉल येथे दि‌. २६ मार्च रोजी जाणता राजा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने शहरात भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारक उभारण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत सर्वपक्षीय व सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारक उभारण्यासाठी सर्वजण सतत प्रयत्नशील राहू ,असा एकमुखाने निर्धार करण्यात आला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारक उभारण्यात यावे यासाठी शहरासह तालुक्यातील प्रत्येक नागरिक प्रयत्नशील आहेत. सर्व जाती धर्मातील लोकांची एकच इच्छा आहे की लवकरात लवकर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक उभारण्यात यावे. यासाठी फक्त मनात इच्छा असून चालणार नाही तर यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागेल याची जाणीव ठेवून जाणता राजा गौरव प्रतिष्ठानची नोंदणीकृत स्थापना करण्यात आली व याच पार्श्वभूमीवर जाणता राजा गौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेवराई तालुक्यातील शिवप्रेमी जनतेच्या भावनांना मूर्तरूप देऊन गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारक उभारण्यासाठी प्राथमिक अवस्थेत रीतसर काम सर्वांच्या सहकार्यामुळे सुरू झाले आहे.

या निमित्ताने आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जाणता राजा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक नारायणराव मोटे, युवा नेते शिवराज पवार, जि. प.चे माजी सभापती बाळासाहेब मस्के, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, बाळराजे कंट्रक्शनचे घाटूळ नाना मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रास्ताविक ज्येष्ठ विधीतज्ञ तथा जाणता राजा गौरव प्रतिष्ठानचे सचिव अॅड. सुभाष निकम यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यासाठी आपल्याला कार्यालयीन तथा कायदेशीर लढा लढावा लागणार आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे रीतसर काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू आहे. यावेळी सर्व शिवप्रेमींची गरज ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्या वेळेला त्या त्या शिवप्रेमींनी त्या त्या माध्यमातून सहकार्य करत राहिल्याने लवकरच सर्वांच्या स्वप्नातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक शहरात उभा राहील.

यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ,असे आवाहन बोलताना त्यांनी केले. यानंतर आपले विचार मांडताना बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य अश्वारूढ स्मारक उभारण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येत आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित घेऊन स्वराज्य निर्माण केले त्याचप्रमाणे हे स्मारक उभारण्यासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून एकदिलाने एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक उभारण्यासाठी एकत्रित यावे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना त्यांनी केले. यानंतर युवा नेते शिवराज पवार यांनी शिवप्रेमींच्या मनातील छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या माध्यमातून मंत्रालयीन कामकाज किंवा नगर परिषदेच्या वतीने लागणारे सर्व सहकार्य कुठलाही विलंब न करता होत राहील.

ज्या ज्या वेळेस आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या माध्यमातून कामाची गरज पडेल त्या त्या वेळेस आमदार लक्ष्मण अण्णा पवार व मी सदैव उपस्थित राहील व नगर परिषदेच्या वैभवात भर घालणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारल्याने शहराच्या वैभवात आणखी भर पडेल ,असे आपल्या भाषणातून मत व्यक्त केले. यानंतर अध्यक्षीय भाषण करताना सतीश देशमुख यांनी जाणता राजा गौरव प्रतिष्ठानचा कामकाजाचा आढावा व प्रतिष्ठानच्या कामाची पद्धत सर्वांसमोर मांडली. कशाप्रकारे जाणता राजा गौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून कामकाज चालेल याची माहिती उपस्थितांना दिली. व ज्या ज्या वेळी जाणता राजा गौरव प्रतिष्ठान आपल्याला हाक देईल त्यावेळेस आपण सर्वांनी सर्व मतभेद विसरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी एकत्र येत राहावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक, डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, शेतकरी यांच्यासह जाणता राजा गौरव प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी बैठकीस रामनाथ गंगाधर ,प्रताप खरात, बाळासाहेब बर्गे, सुरेंद्र रुकर, उद्योजक प्रा. राजेंद्र बरकसे , शिवसेनेचे तालुका अध्यक्ष शिनुभाऊ बेदरे, सुभाष गुंजाळ, रामजिजा चाळक, माधव चाटे, एस. वाय. अन्सारी ,दिलीप गिरे, अरुण मस्के, सखाराम कानगुडे ,केशव पंडित, बाळासाहेब मिसाळ, आतार ,सयाजी काळे, महेश बेद्रे ,श्रीनिवास बेद्रे, प्रशांत रुईकर , प्रशांत गोलेच्छा, शफी आत्तार, बंडू येवले,राजेंद्र आर्दड ,डॉ. प्रशांत मुंदकोंडवार, सय्यद अल्ताफ आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशिल टकले यांनी केले तर उपस्थितांचे आभार दादासाहेब चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here