Home महाराष्ट्र सुंदर दिसण्यासठी…..! To look beautiful…..!

सुंदर दिसण्यासठी…..! To look beautiful…..!

121

लग्नाचा मोसम सुरू झाला तसा वधू – वर शोधणे एव्हाना साखरपुडे व विवाहसोहळेही जोमात होत आहेत. विवाहातले मुख्य आकर्षण म्हणजे नवरी तथा नवरदेव! म्हणजे ते त्या कार्यक्रमाचे हिरो – हिरोईनच! सगळा स्टेज सजलेला असू द्या की, पाहूनेमंडळी येवू द्या नटून थठून, आकर्षण तर हे दोघेच, त्यातही नवरी मुलगी जरा जास्तच. चित्रपटात तर नट – नटी सुंदर असतातच, मग हे कसे राहतील मागे. पण, देवाने प्रत्येकाला सौंदर्य कुठे एकसारखे दिले, आणि जे दिले ते सर्वांना पटेल असेही नाही. मग जे असतील निटास, नीटनेटके त्यांना तर अधिक काळजी व खर्चाची चिंता नाही; पण जे आहेत थोडे सावळे, आणखी काळे, गडद काळे, नकटे – फकटे ते केस नसलेली, कधी टकलेही मग ते सुंदर होण्याचा प्रयत्न करतात. अर्थात सुंदर – कुरूप ज्याच्या त्याच्या दृष्टीचा अंदाज. मग हा अंदाज वर खाली होणारच. कोणी एखाद्याला सुंदर वाटणार तर दुसऱ्याला नाही. आणि सौंदर्याची व्याख्या भौतिक रुपावरून करायला इतका सुंदर कोणी जन्माला आला नाही. आणि उपरोक्त विशेषणे लावण्याने कोणीही कुरूप होत नाही. पण मला जाणीवूर्वक ते शब्द वापरावे लागलेत. कारण तुम्ही त्यात इतके गुरफटून गेले आहात की ज्या गोष्टीला तुम्ही कुरूप म्हणून ओळखता, आपले स्वरूप तेच आहे, हे तुम्ही तितक्याच जाणीवूर्वक विसरत आहात.

मला माझी मुलगी सुंदर वाटते,परी वाटते. मग ती कशीही असो. ती सौंदर्याच्या नकली व्याख्येत बसणारी असली तरी चालेल. पण इतरांची प्रत्यक्षात असलेली परी सुंदर दिसणार नाही. न दिसो, मर्जी ती तुमची. पण दुसऱ्याची एखादी तशीच परी ती तुम्ही थेट ‘ गदळ ‘ म्हणता. कोणी दिला तुम्हाला तो अधिकार? कोण तुम्ही सुंदर – कुरूप ठरवणारे. नेमलेले परीक्षक व नसलेले देव नाहीत तुम्ही. तुमची परी जितकी तितकीच इतरांची ज्यांच्या त्यांच्यासाठी हे जाणीपूर्वक विसरू नका.

मी आहेच मुळी सुंदर! कोणी दिले तुला हे सर्टिफिकेट? आणि ज्यांनी दिले तो कोण? आणि दिले तर दिले दुसऱ्याला हिनवायचे सब सर्टिफकेट मनानेच लावले का? सौंदर्याच्या साच्यात बसवतो म्हटले तर एक ना धड भाराभर चिंध्या निघतील. आणि चिंधीची काही किंमत नसते, जी आहे ती किंमत शाबूत ठेवायची असेल तर दुसऱ्याचे मूल्य हनन का बरं करते? विनाकारण स्वतःचा तोरा मिरवत बसल्यावर तो तोरा नसलेल्या त्या सौंदर्याला तुलाच आरशात पाहून स्वतःशीच बोलावे लागेल. चालेल का मग हे?

मी इतरांपेक्षा वेगळा – वेगळी, यासाठीच हा खटाटोप म्हणूनच ते मेकअप – टचअप चालू आहे. कपडे धुतल्यावर मळ निघून अस्सल रूप समोर येते तसेच हा मेकअप कोणी दिवसरात्र नाही मिरवू शकत. कधी न कधी निख्खळ रूप घेवून पुढे यावेच लागेल की, कारण मेकअप केला त्याचवेळी तुम्ही स्वतःचे स्वरूप विसरले होते. मेकअप करायचे म्हटले की मग आल्या मेकअप ऊमन, मेन. थोडे पावडर, बकीटभर क्रीम, बेंदाडाइतके पांढरे पिवळे लोशन्स; आणि अमाप खर्च, बाप्पाला न झेपावणारा! चार – दोन दिवस हे चालू राहून आधी स्वतः बाप थकतो, नंतर हे नवरा – बायको. चोरलेले व नसलेले सौंदर्य कुठपर्यंत पाहणार व टिकणार तरी कुठपर्यंत. मर्जी त्यावेळेस असली तरी राहतच नाही. इतका कंटाळा येवून देखावा संपलेला असतो. भेसळ करण्याच्या नादात निख्खळ काय ते आपण विसरलेले आहोत. जे निख्खळ दिसताहेत त्यांनाच भेसळ म्हणून विनाकारण आपलेच उखळ पांढरे करत आहोत.

मेकअप केवळ काहीतरी घासल्याने थोडा होतो, थोडे फिल्टर मोबाइलच्या कॅमेऱ्याला लावल्यानेपण होतोच की. इंस्टा रील आणि डीपी रंगवलेली पाहिले खरे तेव्हा कळतेच की! मग तू हाच का? म्हणण्याची वेळ ओढून आपणच आणलेली असते. लग्नात तू दिसायची तशी आता दिसत नाही. हे आयुष्यभर ऐकावे लागते; आणि शेवटी हे पण म्हणू शकत नाही की तेव्हा पहायला काय झाले होते? कारण मूळ स्वरूप तेव्हा किलोभर मेकअपमागे आपणच लपवलेले असते.

कधी कधी या मेकअपचे परिणाम परिणामकारक न होता, दुष्परिणाम होतात; आणि तेव्हा आहे ते छटाकभर सौंदर्य गमावण्याची वेळ येते.

आता लोकांनी सौंदर्य कसे ठरवले, हेही सांगतो एकदा. मी गोरी म्हणजे सुंदर, नाक जागेवर असो की अभाळकड त्याचे काही देणेघेणे नाही. ‘ कसे आहे माझे नाक! ‘ म्हणून मी निटास, आणि गोरे हिच्या नजरेत खराब. तिची तर हाईटच नाही, आणि हिने वाढवून उंची हाईटच केली म्हणावं लागेल. मग तिथे गोरेपणा, नाक दुय्यम होतात. असे बरेच निकष ज्याच्या त्याच्या हिशोबाने ज्याने त्याने ठरवलेले सापडतील. त्यात जाड, हडकुळा, डोळेच खोल भिंतीला भोक जसे, विरळ केस, टक्कल, निस्तेज,सतेज, ढेरपोट्या वैगरे बरेच.

मी काय म्हणतो, माणसात हजार गोष्टी चांगल्या असताना एक वाईट असलेली बाब तीपण वाईट तुमच्याच हिशोबाने, ती एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य कसे काय ठरवू शकते. गोरेपणा इतकाच महत्वाचा तर मग वेस्ट इंडिज, श्रीलंकेत सौंदर्य स्पर्धा भरवण्याची गरजच नसावी. तुम्ही लाख सुंदर असा की नसा, पण दुसऱ्याला नाव ठेवण्याचा तुम्हाला अधिकार नाहीच. सुंदर दिसण्यासाठी जी खटाटोप करायची ती करा; त्याचा शेवट चांगला नसतो हे कृपया विसरू नका.

तू इतका सुंदर कधीपासून झालास रे,

शेंबडा होतास लहानपणी

जनी तुझ्याहून होती गोरी

दाखव बर तुझी चुण्याची पांढरी क्रीम

रंगवावं म्हणतो आमचीही भिंत..

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड(मो:-8806721206)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here