Home महाराष्ट्र स्त्री सबलीकरण व स्वावलंबन ही काळाची गरज : मा. चंद्रकांत गरुड

स्त्री सबलीकरण व स्वावलंबन ही काळाची गरज : मा. चंद्रकांत गरुड

56

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
 
कराड(दि.28फेब्रुवारी):-“स्त्रियांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवणे व महिला सबलीकरण आणि महिलांचे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबन ही काळाची गरज आहे व त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्नशील असणे अत्यंत आवश्यक आहे” असे प्रतिपादन मा. श्री. चंद्रकांत गरुड, महिला समाज प्रबोधनकार, येनके यांनी व्यक्त केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये वडोली निळेश्वर येथे प्रबोधनपर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

श्री गरुड पुढे म्हणाले की,”स्त्रिया ह्या मुलगी, आई, पत्नी, बहीण,  या वेगवेगळ्या नात्यांमध्ये कुटुंबाची व समाजाची जडणघडण करत असतात. स्त्रियांकडे संस्कार व संस्कृती जपण्याची कला जन्मजात असते. तसेच स्त्रिया या मूळतः सहनशील प्रवृत्तीच्या असतात, त्या आपले काम सक्षम व जबाबदारपणे करतात. स्त्रियांना सन्मान देणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे.

  श्री. चंद्रकांत गरुड यांनी एकपात्री अभिनय, नाट्यछटा, गीते,  या माध्यमातून स्त्रियांच्या समस्या, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रियांचे सक्षमीकरण, आत्मसन्मान याबद्दल उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वडोली निळेश्वर गावच्या स्नुषा आर. टी.ओ. पोलीस निरीक्षक मा. सौ स्वाती अविनाश पवार यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सौ स्वाती पवार यांनी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन होण्यासाठी समाजाबरोबरच स्त्रियांनीही प्रयत्न करणे आवश्यक आहे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बेटी बचाव – बेटी पढाव सारख्या अभियानामध्ये सर्व समाजघटकांनी सक्रिय होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी वडोली निळेश्वर येथील कन्या कु. निकिता पवार हिने ‘स्त्री शक्तीचा जागर’ या विषयावर भाषणाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. पी. पवार तर अध्यक्ष स्वाती पवार यांचे स्वागत कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. एस. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. एन. एस. देसाई यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख कु. निकिता माळी यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आभार कु. अनिशा चव्हाण यांनी मानले तर कु. अल्फिया मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास वडोली निळेश्वर गावच्या उपसरपंच सौ. अर्चना वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य सौ. अंजना पवार सौ. सविता पवार श्री. संभाजी पवार, श्री. अविनाश पवार शिबिरार्थी विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here