नागरी सुविधांच्या कामांकरिता १ कोटी ३८ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान !
वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.25फेब्रुवारी):- विधानसभा मतदार संघातील वरुड तालुक्यातील सन १९९१ मध्ये आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या हातूर्णा, पळसवाडा, भापकी, या गावांचे विशेष बाब म्हणून सुरक्षीत ठिकाणी पुनर्वसन नागरी सोई सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे रेटून धरली होती त्यामुळे वरुड तालुक्यातील 1991 मधील पुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये पुनर्वसन करतांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा देण्याबाबतच्या कामांबाबत सुधारित परिपूर्ण प्रस्ताव दोन महिन्यांचा कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनाने सादर करावेत, २८ गावांकरिता विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत पूरग्रस्त
गावाचे परिक्षण करण्याकरीता एक तथ्य शोध घेण्याकरिता सत्य शोध समिती गठित करावी असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते .
वरुड तालुक्यातील पूरग्रस्त गावातील समस्या सोडवण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव नायक, उपायुक्त बावणे यांच्या उपस्थितीत पुनर्वसित गावातील नागरी सुविधा कामांची सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भापकी, पाळसोना, हातुर्णा या गावांचा पाहणी दौरा करून गाव अंतर्गत रस्ते, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, पान्याच्या टाक्या, वीज कनेक्शन, पेव्हर ब्लॉक, तार कुंपण, पाण्याच्या पूरक पाईप लाईन, हँडपम्प इ कामांची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी विकास कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या.
सन १९९१ चे पावसाळ्यात प्रचंड महापुर आलेल्या महापुरामुळे ३ गावे पुर्णत: व २८ गावे अंशत: बाधित झालेली होती. त्यावेळी सदर गावातील काही कामे करण्यात आलेली होती. परंतू सदर कामापैकी अंशता बाधित असलेल्या २१ गावांमधील सार्वजनीक शौचालय, मौजे आमनेर येथील एक अंगणवाडी व २८ गावांमधील काँक्रीट नालीचे बांधकाम करण्यात आलेले नसल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी २८ गावातील नागरी सुविधेची कामे पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्त यांचे मार्फत प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करून पूरग्रस्त २८ गावातील बांधकाम प्रस्तावास तात्काळ प्रशासकीय मान्यता प्रदान करुन कामे पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन सन १९९१ मध्ये महापुराने बाधित झालेल्या वरूड तालुक्यातील मौजे-हातुर्णा, पळसवाडा व भापकी, या गावाचे पुनर्वसन करण्याबाबत एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यामध्ये वरूड तालुक्यातील अमडापुर, आमनेर, चांदस, चींचरगव्हाण, देऊतवाडा, गाडेगाव, काटी, खानापूर, कुरळी, मोरचुंद, मोर्शी खुर्द, पोरगव्हाण, शहापूर, उदापूर, वेढापुर, वाडेगाव, वंडली, मालखेड, पुसला, लिंगा, सावंगी येथील सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याकरिता प्रत्येकी ६ लक्ष प्रमाणे १ कोटी २६ लक्ष रुपये व आमनेर येथे अंगणवाडी बांधकाम करणे १२ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून सार्वजनिक शौचालय बांधकाम व मौजे आमनेर येथील अंगणवाडी बांधकाम या नागरी सुविधेच्या कामाकरीता १ कोटी ३८ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून वरुड तालुक्यातील २६ गावांचा पुनर्वसन वसाहतीमध्ये कॉक्रीट रस्ते व कॉक्रीट नालीचे बांधकाम करणेबाबत प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याकरीता शासनास सादर केला असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.




