Home महाराष्ट्र माता रमाई ची 125 व्या जयंती निमित्त सांगलीत भव्य महिला मेळावा संपन्न

माता रमाई ची 125 व्या जयंती निमित्त सांगलीत भव्य महिला मेळावा संपन्न

102

✒️सांगली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सांगली(दि.7फेब्रुवारी):- भारतीय बौध्द सभेच्या सांगली जिल्हा शाखेच्या वतीने मालगाव येथे बौद्ध समाजाच्या पटांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी व तमाम आंबेडकरी जनतेच्या मातोश्री माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त भव्य महिला मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर ,समता सैनिक दल ) ,सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय महिला विभाग प्रमुख ),अँड.एस .एस . वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ) ,भिकाजी कांबळे (अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य ) यांनी प्रमुख मार्गदर्शन केले .

एस के भंडारे यांनी भारतीय संविधानाने स्त्रियांना दिलेले हक्क व अधिकार यावर बोलताना स्रियांच्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री व पुरुष असा कोणताही भेदाभेद न करता सर्व समानता आणली असल्याचे प्रतिपादन करून सत्तेत आलेले चातुर्वर्ण्य चे समर्थक मनुस्मृती वर आधारित देशाची घटना आणायची भाषा करीत आहेत त्यामुळे संविधानाने दिलेले अधिकार व हक्क संपुष्टात येऊ नयेत म्हणून आपल्याला संघर्ष करावा लागेल त्यामध्ये स्त्रियांचाही सहभाग हवा असे आवाहन केले. सुषमाताई पवार यांनी त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर बोलताना माता रमाई यांनी कसा त्याग करून बाबासाहेब ,रामजी बाबा ,मुले व समाज यांना स्वतःची दुःखे बाजूला सारून कशी ऊर्जा दिली याची उदाहरणे सांगून आता महिलांनी धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.

अँड.एस एस वानखडे यांनी धम्म चळवळी मध्ये स्त्रियांचे योगदान या विषयावर बोलताना मिगारमाता विशाखा पासून ते महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या काळातील आजपर्यंत च्या सर्व महिलांच्या नावासह योगदानाचा तपशील सांगून महिलांचा सहभाग वाढउन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती अधिक गतिमान करावी लागेल असे आवाहन केले. भिकाजी कांबळे यांनी बौद्ध धम्माची खास वैशिष्ठ्ये या विषयावर बोलताना धम्म हा माणसाने माणसाशी कसे वागावे हे सांगतो ,धम्मात स्त्री पुरुष समानता आह़े असे सांगून जगाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन केले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत बुद्ध,डॉ बाबासाहेब व माता रमाई यांच्या प्रतिमान पुष्पहार अर्पण केले. सुरवातीला समता सैनिक दलाच्यावतीने दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे आणि इतर मान्यवरांना जनरल सलामी दिली.

मेळाव्यात जिल्हा अध्यक्ष रुपेश तामगावकर यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे प्रास्ताविक सर्वांनी वाचून शपथ घेतली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महिला उपाध्यक्ष कमलताई खांडेकर होत्या.प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मालगावच्या महिलांनी केले. मेळाव्यासाठी जिल्हा सरचिटणीस रतन तोडकर , जिल्हा कोषाध्यक्ष शरद कांबळे,मालगाव ग्राम पंचायतचे उपसरपंच खांडेकर आणि समस्त बौद्ध समाज मालगाव , मिरज तालुका व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here