Home महाराष्ट्र महानायक

महानायक

117

हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक, शेहेनशहा, वगैरे विशेषणांनी गौरवप्राप्त आपण. संपूर्ण देशाला आपल्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, राहील.

शून्यातून विश्व आपण उभे केले. एकेकाळी चंदेरी दुनियेत आपणही नशीब आजमवावे या विचारांनी कोलकता मधील कोळसा कंपनीतील नोकरी सोडून “बंबई” मध्ये आलात. सुरवातीच्या संघर्षाच्या काळात नरिमन पॉईंट वर वडापाव खाऊन अनेक रात्री बेंचवर काढल्या. खऱ्या अर्थाने अतिशय काबाड कष्ट करून चंदेरी दुनियेत पाय रोवलात.

हळू हळू स्थिती सुधारू लागली, त्याकाळातील प्रस्थापित महानायक साधारण उंचीचे होते, त्यामानाने आपली उंची खूपच जास्त असल्याने अनेक सिनेमात प्रवेश करण्यास बाधा उत्पन्न झाली. अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी आपल्या तोंडावर आपल्या उंचीबद्दल व्यंजने वापरून दरवाजे बंद केले. असे अपमान सहन करून आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झगडत राहिलात.

आणि एक दिवस असा उजाडला; त्या काळातील पडद्यावर नायक होण्यासाठी असणारे शारीरिक गुण नसताना, अर्थात सर्व वैगुण जसे की अतिउंच, सडपातळ बांधा, चॉकलेटी चेहेरा व गोरा वर्ण नसतानाही, एक सिनेमा पटकावला, आणि चंदेरी दुनियेत पाहिला “अँग्री यंग मॅन” उदयास आला.

यशाचे एक एक शिखर चढताना अनेकदा ठेच लागतेच, आपल्याही बाबतीत ते घडले. एक सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान आपल्या पोटात टेबलाच्या कोपरा लागून, शरीरात रक्तस्त्राव झाल्याने, अगदी मरणाच्या दारातून आपण परतलात, तेव्हा संपूर्ण देश हळहळला. म्हणतात ना भरीस भर टेकडीवर घर, या उक्ती प्रमाणे त्यावेळेस योग्य रक्ततपासणी न झाल्याने आपणास कावीळ झालेल्या व्यक्तीचे रक्त देण्यात आल्याने, आपण हिपॅटायटीस बी, या आजाराचे वाहक बनलात, ज्यामुळे आपली प्रकृती कायमची नाजूक बनली.

पुढे यशाच्या सर्वोच्य शिखरावर पोहोचल्यावर, अचानक आपल्याला राजकारणात येण्यासाठी आपल्या परम मित्राचे निमंत्रण आले. कोणताही मागचा, पुढचा विचार न करता, मैत्रीच्या प्रेमापोटी लोकसभेची निवडणूक लढलात, विजयी झालात. थोड्याच अवधीत आपणास समजले आपण फार मोठी घोडचूक केली आहे, कारण राजकारण हे राड व चिखलासारखे असते, त्यात दगड मारल्यावर आपल्याही अंगावर शिंतोडे उडतातच, तसे ते आपल्याही अंगावर उडाले. पुढे अथक प्रयत्नांनी आपण निष्कलंक आहात हे आपण सिद्ध करून दाखवले, त्याचीही वाहवा झाली.

जेणो काम तेणो थाय। बीजा करे सो गोता खाय। या गुजराथी म्हणीला आपण सत्यात उतरवले. फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू केलीत, व बंगलोर मध्ये मिस वर्ल्ड प्रतियोगीताचे काम घेतले. यात आपल्याला अनेकांनी फसवले, व आपण आजवर जी अफाट आर्थिक संपन्नता मिळवलीत, ती सर्व संपली. कर्जबाजारी झाल्याने, बँकेने आपला जुहूस्थित बंगल्याला टाळे ठोकले, या वापर रस्त्यावर आलात. या वाईट दिवसातही आपले मनोधैर्य खचले नाही.

आता आपण वयाची पन्नाशी पार केली होती. सिनेमात पुन्हा हिरो म्हणून येण्याचे व दबदबा प्रस्थापित करण्याचे दिवस मावळू लागले होते. कर्जबाजारी झाल्याने पडेल ते काम करण्याची तयारी होतीच, म्हणून पैशासाठी टुकार सिनेमे साइन केलेत. या सर्व कोलाहलात किमान डोंगराएवढ्या कर्जाचे हप्ते भरू शकलात, म्हणून सावकारी बँकेचा ससेमिरा थांबला.

संघर्ष सुरू असतानाच एक सोनेरी पहाट आली, आणि आपल्या वयाला शोभेल, साजेल अशी एक अभिनव भूमिका आपल्याला मिळाली. नाटकी अभिनय टाकून आपण नव्या भूमिकेत उतरलात. आपले हिंदी भाषेवरील प्रभुत्व, प्रासंगिक हाव भाव, मध्येच लोकांना गुजगोष्टी सांगून त्यांना मीही तुमच्यासारखाच आहे हे समजावणे, असे नानाविध प्रयोग करून, खेळाचा प्रत्येक भाग अधिकाधिक आकर्षक केल्याने, आपल्यावर केलेल्या विश्वासाचे आपण सोने केलेत. अनेक सामान्य भारतीय नागरिकांना करोडपती बनवताना, आपण आपल्यावरचे डोंगराएवढं कर्ज हसत हसत लीलया फेडले, वरती अब्जाधीश बनलात, हे पाहून देशासमोर आपण एक आदर्श म्हणून प्रस्थापित झालात.

आजही वयाची ऐशी आलेली असतानाही प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपण चंदेरी दुनियेवर हुकूमत गाजवत आहात, तसेच छोट्या पडद्यावरही आपल्या विशिष्ठ वाणीने, व सव्वाद फेकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत आहात.

म्हणतात ना कोणत्याही चांगल्या गोष्टीला गालबोट लागतेच. आपण तरी का त्याला अपवाद असणार? कोणती अवदसा आपल्याला आठवली आणि इतर टुकार, भिकार नटांच्या सारखे आपण दोन रुपयाची *”पान मसाला”* ची जाहिरात करून स्वतःचे नाव खराब करायला सुरुवात केलीत. आज 14 नोव्हेंबरला सकाळी कामलापसंदची पान मसाल्याची जाहिरात पाहून आपला आदर कमी झाला आहे. काही लोक म्हणाले अमिताभने लोकांचा विरोध पाहून जाहिरातीचे पैसे परत केले, ही खोटी बातमी आहे, हे सिद्ध झाले.

आज टिव्हीवर दिसणारी प्रत्येक तिसरी जाहिरात आपली असते, ज्यातून आपण अब्जावधी रुपये कमवत आहात, असे असताना, आज आपल्या या कृतीने, काही करोड रुपये आपण जरूर खिशात घातलेत, पण त्यामुळे लाखो लोकांचे नुसतेच खिसे फाटणार नाहीत, तर संसार देशोधडीला लागणार आहेत. उद्या याच न्यायाने आपण दारू, सिगारेटची जाहिरात केल्यास आम्हाला नवल वाटणार नाही.

आजवर आपली सदविवेक बुद्धी जागृत असल्याने आपण आदर्शवादाचे प्रतीक ठरले आहात. *आपले नाव गौतम बुद्धाचे एक नाव आहे, हे या लेखाद्वारे अनेकांना पहिल्यांदाच माहीत होणार आहे. आपली एक चूक आपल्याबद्दल असलेल्या सर्व आदर्शना तिलांजली मिळण्यास कारणीभूत ठरू शकते, म्हणून आपण कदाचित *खलनायक* न व्हावें, यासाठी लहान तोंडी मोठा घास घेत, माझे आपण संयम बाळगण्यासाठीचे चार आदराचे शब्द.

*आज 23 जानेवारी 2023 रोजी आपली कमला पसंद पान मसाला विक्रीची जाहिरात आज तक या न्यूज चॅनल वर पाहून, आपण पैसे मिळविण्यासाठी कोणत्याही खालच्या थराला जाऊ शकता हे समजले.*

आपले प्रशंसक आपण पानमसाल्याची जाहिरात करणे बंद केले आहे अशी खोटी माहिती देवून जनतेची दिशाभूल करत आहेत हे पण सिद्ध झाले. तसेच आपण जाहिरात कंपनीला पैसे परत करून आदर्श दाखवला आहे ही मिथ्या बातमी आहे हे पण आजच्या जाहिरातीने सिद्ध झाले.

विजय माझे खरे नाव आहे, हा लेख लिहिण्यासाठी धारण केलेले नाव नाही. आपले सिनेमातील नाव हेच असते हा निव्वळ योगायोग आहे असे समजावा.

*आज आपण महानायक नसून खलनायक आहात हे लक्षात आले.*

✒️विजय लिमये(मो:-9326040204)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here