Home Education गोटा

गोटा

169

मुठीत साधारण एक वस्तुमानाचे काही गोटे घ्या आणि संपूर्ण जोर लावून जोरात फेका! तुम्हाला अपेक्षित असेल? जर मी एकाच वेळेला, सर्व गोटे फेकले आहेत, तर मग ते सर्व एकाच ठिकाणी पडले पाहिजेत. पण असे होते का? नाही! सर्व गोटे वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले दिसतील. आपण जरी सर्व गोटे एकसमान बल लावून फेकले असतील, तरीही ते विविध ठिकाणी पडतात. पुढे अजुन नीट पारखून पहाल तर एकही गोटा दुसऱ्या गोट्याला बिलगून राहिलेला दिसणार नाही.

आपल्या जीवनातही काहीसं तसंच असतं! एकाच आई-वडिलांची मुलं त्यांचे संगोपन एकसमान केलेले असतानाही दोघांच्या जीवनशैलीत, राहणीमानात, शैक्षणिक गुणवत्तेत, शरीर संपदा यात भरपूर फरक दिसतो. वर्गात शिक्षक सर्वांना एकसमान विषय शिकवतात, परंतु तो सर्वांना समान समजला असे होत नाही, तसे असेल तर परीक्षेत सर्वांना समान गुण मिळाले असते, याचे कारण वरील सांगितलेल्या दगडांच्या उदाहरणात लपलेले आहे.

मंगेशकर कुटुंबातील एक पिढीतील पाचही भावंडे गायनात श्रेष्ठ ठरली इतकी की सिनेमा क्षेत्रात त्याचा बोलबाला कित्येक दशके राहिला. आश्चर्य पहा, त्याच घराण्यातील पुढच्या पिढीतील एकही व्यक्ती गायन, संगीत क्षेत्रात नावारूपाला आली नाही. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांची मुले सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळूनही वडिलांच्या आसपासही पोहोचू शकली नाहीत.

आफ्रिकेतील खेळाडू ऍथलेटिक्स मध्ये सरस ठरतात, तर काही विशिष्ठ देशातील लोक जिमनॅस्टिक मध्ये बाजी मारतात. चांगले बॉलर फार क्वचित उत्तम बॅटिंग करू शकतात. भाषा विषयात अग्रणी असणारे गणितात कच्चे असतात, तर गणितात अग्रेसर असणारे, भाषा विषयाशी फटकून वागतात.

गुजराथी, सिंधी, मारवाडी आणि पारसी यांच्या रक्तातच व्यापार भिनलेला असतो. ते आपण विचारही करू शकणार नाही अश्या गोष्टींचा धंदा, व्यापार करून पैसा कमावतील. तामिळ लोक गणितात हुशार दिसतील, पंजाबी सैन्यात दिसतील.

भारतात जसे गुजराथी – मारवाडी तसे युरोप, अमेरिकेत ज्यू लोक आहेत, जे इतरांच्यापेक्षा ज्यास्त व्यापारी वृत्तीचे असतात. आजपर्यंत नोबल पारितोषिकं मिळालेल्या वैज्ञानिकांची जातकुळी मोजली तर सर्वात जास्त पदके ज्यू वैज्ञानिकांनी पटकावली आहेत. आज मी आपल्याशी संवाद साधतो तेही झुकरबर्ग नावाच्या ज्यू माणसाने बनवलेल्या फेसबुकच्या माध्यमातूनच.

याचा सरळ अर्थ आहे, कोणी जास्त, कोणी कमी हा तर निसर्गानेच बनवलेला नियम ठरतो. सर्वांना पहिला नंबर देणे हे निसर्गालाच मान्य नाही, तसेच सर्वांना समसमान देणे हे पण निसर्गाला मान्य नाही. क्षमतेनुसार प्रत्येकाला एका विशिष्ठ कालावधीसाठी, विशिष्ठ कलाविधिनंतर, आणि विशिष्ट कार्यासाठी निसर्गानं योजलेले असते आणि ते तसेच घडत असते, फक्त आपल्याला ती वेळ साधता आली पाहिजे.

त्या गोट्याप्रमाने कुठे पडणार हे तुमच्या हातात नसते, पण जिथे पडू त्या जागेवर नंदनवन बनवू ही महत्त्वाकांक्षा जवळ असली पाहिजे.

✒️विजय लिमये(मो:-9326040204)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here