Home Education एकदा जिजाऊ सृष्टीला भेट देऊन पाहून या!!

एकदा जिजाऊ सृष्टीला भेट देऊन पाहून या!!

143

मराठा ओबीसी समाजाला देशातील प्रसिद्ध मंदिरे माहिती आहेत. राज्यातील संतांची पवित्र संत भूमि माहिती असून त्यांच्या दर्शनासाठी दोनशे, तीनशे किलोमीटर पायी पदयात्रा काढून जाण्याची मानसिक तयारी दरवर्षी असते. पण उच्चशिक्षणा च्या पदव्या घेऊन आणि आधुनिक तंत्रज्ञान शिकून सुद्धा संतांचा जन्म, मृत्यू, गांव, तालुका, जिल्हा राज्य आणि आई, वडील, मुलेमुली यांची माहिती नसतांना त्यांच्या वर शंभर टक्के श्रद्धा,विश्वास ठेवतात. शेवटी ही त्यांची धार्मिक भावना आहे. ते स्वातंत्र्य भारतीय संविधाना ने दिले आहे. त्या ही अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात सर्व रयतेला धर्माने नाकारलेले न्याय हक्क, अधिकार दिले होते. त्यावेळी त्यांची माता हीच त्यांना शिकवण देणारी खरी शिक्षिका,गुरु होती. तिचा इतिहास आम्ही वाचत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील शिवसंस्कृतीचे आदिपीठ होते. राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा येथे झाला होता.

राजमाता जिजाऊने या देशात ऐतदेशीयांच्या स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपले सुपुत्र छत्रपती शिवरायाना घडविले आणि जगात एका क्रांतिकारी विचारांची प्रेरणा देणाऱ्या इतिहासाची निर्मिती केली. स्वाभाविकच शिवसंस्कृतीच्या या अति प्राचीन उगमस्थानाला म्हणजेच सिंदखेडराजाला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले पाहिजे होते. मानुवादी हिंदुत्व मानणाऱ्यांनी त्यांचे महत्व वाढू दिले नाही. त्याला महत्व खऱ्या अर्थाने आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघ स्थापन केल्या नंतर यायला लागले. आज ते जागतिक पातळीवरचे जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातृतिर्थावर जवळपास 450 एकर जागेवर 11,000 कोटी रूपयांच्या प्रस्तावित खर्चांचे एक भव्य स्वप्न मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, सम्माननीय पुरूषोत्तम खेडेकर ह्यांनी पाहिले आहे, त्या स्वप्नाचे नांव ‘जिजाऊसृष्टी’ प्रकल्प असे आहे. राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्माचे वेळी ४५,००० लोकवस्तीच्या या शहरात त्या काळातील लखुजीराजाचा राजवाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजीराजांची समाधी, पुतळा बारवा, गंगासागर, बाळसमृद्र या नावाच्या विहिरी, चांदणीतलाव, मोतीतलाव या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. त्यांचे जास्त प्रमाणात सांगितल्या जात नाही.त्यापैकी मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर जिजाऊसृष्टीची जागा निवडण्यात आली आहे. या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोडय़ावरून फेरफटका मारायच्या. याच ठिकाणी त्या युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षणघेत होत्या. त्याच तीर्थावर आज साकारणार आहे मातृतीर्थ “जिजाऊसृष्टी”.

हा ‘जिजाऊसृष्टी’ प्रकल्प देशाच्या स्वभिमानाचा राष्टीय प्रकल्प व्हावा व हे जगभरातील पर्यटकांचा आकर्षणाचे केंद्र व्हावे असा सर्वोच्च विचार मराठा सेवा संघाचा माध्यमातून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांचा आहे. त्यानुसार ‘जिजाऊसृष्टी’ हा विविध विषयांना समावून घेणारा एकत्रित स्वरुपाचा प्रकल्प व्हावा तसेच ते अद्यावत तीर्थक्षेत्र व ज्ञानक्षेत्र व्हावे, ही संकल्पना आहे. जिजाऊ संग्रहालय, जिजाऊ ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, महिला मिलीटरी अकॅड्मी, सिंधु संशोधन संस्था, महिला विद्यापीठ अशा संस्थाची निर्मिती व्हावी, अशी योजना आहे. या शिवाय भारत देशाचा सुमारे 10,000 वर्षाचा सत्य सांस्कृतिक इतिहास, जिजाऊ काळातील देशातील सर्व क्षेत्रातील स्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावरील महत्वाचे प्रसंग ते आज पर्यंतची देशाची वाटचाल, बहुजन समाजातील सर्व समाज सुधारक, संतांची शिकवण चित्ररुपाने, शिल्परुपाने, इलेक्ट्रॉनिक मध्यमांच्या साहाय्याने लिखीत स्वरुपात विविध प्रकारे चित्रित केल्या जातील.अशी भव्य संकल्पनेची अंमलबजावणी होत आहे.

15 हजार स्क्वे. फुटाच्या सभागृहासह जवळपास 10 हजार स्क्वे. फुट (RCC) 3 मजली बांधकाम पूर्ण झाले आहे. 25 हजार स्क्वे. फुटाचा सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. भव्य महाद्वाराची निर्मिती राजस्थानच्या कारागिरा कडुन केलेली आहे. सर्व प्रकारच्या सत्ता स्थानात मराठा समाजाचे वर्चस्व असतांना ही मात्र निधी अभावी कामाची गती पाहिजे तशी जलद नाही. यांची खंत आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली आहे. संत गजानन महाराज संस्थान शेगांव, संत साईबाबा संस्थान शिर्डी, अनेक बाबा, महाराज यांच्या संस्थानाला मराठा ओबीसी समाजाकडून उद्योगपती उच्च पदस्थ अधिकारी ज्या प्रमाणे सढळ हस्ते दान देतात तेच हात मातृतीर्थ “जिजाऊसृष्टी” कडे मोकळे होतांना दिसत नाही. त्यासाठी मराठा ओबीसी बहुजन समाजात क्रांतिकारी विचारांच्या महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड सह बामसेफ आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या विचारवंत, साहित्यिक, स्तंभ लेखक, पत्रकार आपली सामाजिक जबाबदारी म्हणून बहुजन समाजात वैचारिक बदल घडविण्यासाठी सतत लिहत आणि बोलत असतात.

मराठा सेवा संघ आणि समविचारी परिवर्तनवादी बहुजन संघटनांनी बहुजनाच्या भावी पिढ्यांसाठी अक्षय उर्जास्त्रोत असणा-या जिजाऊसृष्टीच्या उभारणीसाठी दमदार पाऊल टाकले असले तरी आपल्या स्वप्नातील मातृतिर्थाला समस्त बहुजन समाजातील उद्योगपती उच्च पदस्थ अधिकारी, शासकीय कंत्राटदार,सदन शेतकरी, कर्मचारी दानशूर समाज बांधवांनी सढळ हस्ते मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. इन्कमटॅक्स भरणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पादक, उत्पन्न घेणारांनी जिजाऊ सृष्टीला देणगी देऊन (देणगी करिता 80 जी नुसार इन्कमटॅक्स मध्ये सूट आहे.) विशेष सूट मिळवावी. आईवडिलांचे कष्ट,त्याग जिद्द आपल्या साठी प्रेरणादायी असेल तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आठवण म्हणून सढळ हस्ते दान करा आणि कुशल पुण्य मिळवा. त्यामुळे ही इतरांना प्रेरणा मिळू शकते.

मी कुटुंबासह जिजाऊ सृष्टी ला भेट देऊन आलो म्हणून आपणास आवाहन करतो की, आपापल्या जिल्ह्यातील दानशूर समाज बांधवाची भेट घेऊन त्यांना या प्रकल्पाची माहिती द्या, त्यांनी या मातृतीर्थ “जिजाऊ सृष्टी”ला प्रथम भेट देऊन पाहणी करावी. नंतर यथाशक्ति आर्थिकदृष्ट्या मदत करावी. देवाच्या मंदिरात न दिसणाऱ्या देवाला दिलेलं दान पुजाऱ्याला जाते.त्यांचा त्यावर मालकी हक्क असतो. पण इथे मातृतीर्थ “जिजाऊसृष्टी” प्रकल्पास मदत करणा-या व्यक्तींची नावे प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ मोक्याच्या ठिकाणी नोंदविण्यात येतील. आणि वेबसाइट वर सुद्धा सुवर्ण अक्षराने नमुद केले जातील.त्यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा ऑनलाइन डोनेशन्स वापर करू शकता. मातृतीर्थ “जिजाऊसृष्टी” वेबसाइट वर जाऊन “डोनेट नाउ” ची बटन दाबा आणि डेबिट / क्रेडिट कार्ड ने पैसे भरून दान करा. म्हणूनच मी जाहीरपणे आवाहन करतो मराठा ओबीसी बहुजन समाजातील बांधवानी एकदा जिजाऊ सृष्टीला भेट देऊन पाहून या. इतिहास वाचा म्हणजे इतिहास घडविता येईल.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here