न्यायाने जगणारी, वागणारी ब्राम्हणशाही, या जुलमी ब्राम्हणशाहीतून भारतीय व्यवस्थेला लागण झालेली जाती व्यवस्था, याच जाती व्यवस्थेतून राबविण्यात आलेली उच्च-नीचतेची अमानुष व्यवस्था या अमानुष व्यवस्थेला बळी पडलेला भारतीय अस्पृश्य-शुद्र बहुजन समाज. या अस्पृश्य- शुद्र समाजाला तत्कालीन परंपरागत समाज व्यवस्थेने लाचार असहाय्य व दुबळे करुन त्यावर अनेक सामाजिक बंधने व बहिष्कार लादून त्यांचा अनन्वित छळ केला. त्यांचाशी पशुवर्तन केले. कानात शिसे ओतणे व जीभ छाटून काढणे अशा अघोरी प्रथांचे व्यवस्थापन करण्यात आले. पुढे रस्त्यावर चालतांना सावली पडू नये व थुकल्यास ती रस्त्यावर म्हणजेचं जमिनीवर पडू नये म्हणून गळयात मडकी अडकविण्याची सक्ती, अशी ती परंपरागत व्यवस्था, शिवाय पाण्यालाही स्पर्श करु नये, अशी अमानुष नियम पध्दती आचरणात असतांना अस्पृश्य व शुद्रांचा (बहुजण समाज) यांच्या जीवनाला अवकळा लागलेली. त्यांच्या जीवनात सामाजिक व स्वविकासाचे मार्ग बंद करण्यात आले होते. शिक्षणवाटा अंधारल्या होत्या. त्या अंधारयुगात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले, म्हणजेच फुले दाम्पत्याचा उदय झाला.
ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळाव लागायच, स्त्री शिकली की धर्म बाटला, स्त्री शिकली की पाप वाटायचे अशा काळात अनेक संघर्ष करीत सावित्रीमाईंच्या अंगावर शेण, चिखल, गोटे, खरकटे पाणी लोक फेकत असत. तरीही न डगमगता न घाबरता ज्या साऊने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, तिच्यामुळेच आज भारतातल्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली आहे, ती सावित्रीआई म्हणजे खरी ‘स्त्री ‘उद्धारकर्ता आहे.
सावित्रीआईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हातील नायगाव या गावी जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे (पाटील), आई सत्यवती नेवसे (पाटील). सावित्रीआई अवघ्या नऊ वर्षाच्या असतांना त्यांचा विवाह जोतीराव फुले यांच्याशी झाला, त्यावेळी जोतीरावांचे वय फक्त तेरा वर्ष होते. पुर्वीच्या काळी बालविवाह पध्दत होती.
फुले असूनी काटे वेचले, घेतला शिक्षणाचा ध्यास, तुझ्यामुळेच शिकल्या नारी, आणि सुरु झाला शिक्षण प्रवास.
जोतीराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवारपेठेतील पुणे येथे भिडयांच्या वाडयात मुलींची शाळा सावित्रीआईच्या सहाय्याने सुरु केली. तीच भारतातील पहीली मुलींची शाळा होय. अशा १ नाही, २ नाही, तब्बल २० शाळा सुरु केल्या. क्रांती ज्योती सावित्रीआई च्या अंगावर शेण, खरकटे पाणी फेकत तरी सर्व त्रास सहन करीत त्या आपल्या निश्चयाच्या मार्गावरुन तस्भरही डगमगल्या नाहीत. कारण जोतिबांची खंबीर साथ होती. फक्त शाळाच काढून थांबल्या नाहीत तर काही ब्राम्हण विधवा ‘स्त्रिया गरोदर होत्या, त्या विहिरीत जीव देण्यासाठी जाऊ लागल्या. अश्या स्त्रियांना अभय देऊन त्यांची बाळंतपणे सुध्दा केली.
पूर्वीच्या काळी फार विचित्र प्रथा होत्या. पती मरण पावल्यावर त्यांच्या पत्नीचे केशवपन करुन त्या स्त्रियांना आयुष्यभर कुठलेही धार्मिक कार्य करण्यास बंदी असायची. क्रांती ज्योती सावित्रीआईनी या वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला. एवढेच नाही तर १८९६ च्या दुष्काळात हजारो लोकांना मोफत अन्नछत्र चालविले. क्रांती ज्योती सावित्रीआई स्वतः भाकरी करुन लोकांना जेवू घालत. जोतीबांनी बालहत्या प्रतिबंधक सुरु केले आणि सावित्रीआईनी ते चालवले, बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या सर्व अनाथ बालकांना क्रांती ज्योती सावित्रीआई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राम्हण विधवेचे मुल त्यांनी दत्तक घेतले. त्यांचे नाव यशवंत ठेवले व त्याला डॉक्टर बनविले. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान होऊन पुणे शहरांत दररोज शेकडो माणस मरु लागली. सरकारने रॅड या अधिका-याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतल.
क्रांतीज्योती सावित्रीआईनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वतः आजारी माणसाला उचलून दवाखान्यात आणीत आजारी माणसांचा उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवा करीत होत्या, मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाडयात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच क्रांती ज्योती सावित्रीआई तिकडे धावल्या.
मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोहोचल्या, त्यातच क्रांती ज्योती सावित्रीआईंना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांच प्लेगमुळे निधन झाल.
भारतातील महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजाशी फुले दाम्पत्याने जो लढा दिला त्याला इतिहासात तोड नाही. त्यांनी शिक्षणाचे दालन उघडे करुन दिल्यामुळेच आमच्या महिलांनी गगनभरारी घेवून सर्वच क्षेत्रात ठसा उमटविला आहे. म्हणूनच क्रांतीज्योती सावित्रीआई फुले हया स्त्रीयुग निर्माण कर्त्या ठरल्या आहेत.
जय ज्योती, जय क्रांती.
✒️योगेश अंजणा चिंतामण शेन्डे (एम.ए. समाजशास्त्र / विधी शाखा अभ्यासक) युथ फॉर शोसल जस्टिस मुख्य समन्वयक माळी युवा बिग्रेड भंडारा तालुका अध्यक्ष मो. नं. ८८५७८३३८६७