Home महाराष्ट्र गाढवाने शेत खाल्ले… पाप ना पुण्य!

गाढवाने शेत खाल्ले… पाप ना पुण्य!

222

भेदरलेल्या अवस्थेत सध्याच्या लोकांनी आणि लोकशाहीने पाऊल टाकले आहे. समाज सुधारक आणि विचारवंत यांनी दिलेले योगदान अतुलनीय असले,तरी भ्रमिष्ट झालेली आजची वैचारिकता अराजक माजवण्यात लुप्त झाली आहे, की काय? इतिहासाची पुनरावृत्ती कधीच होऊ शकत नाही. याचे भान नसणं हे नाशाचे कारण ठरते. त्या त्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती आणि भूमिका महत्त्वाची असते. आज तिच धारा, तोच विचार तंतोतंत लागू पडत नसतानाही, तिच आग्रह धरणे, चुकीचे समर्थन आहे. मी प्रथम प्राधान्याने विचार करून माझ्या पूर्वजाने केलेल्या कृतिचा आणि भूमिकेचा अभ्यास केला पाहिजे. देशहितासाठी, समाजासाठी की आणिक कोणत्या कारणासाठी आम्ही काय केले. ओरडून सांगितले म्हणजे खरे काय? याचा शोध घेतला जातो. कोणाची काय भूमिका आहे.ती लगेच लक्षात येत असते.

सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत भूमी, आचार विचार आणि वारसा असणारी माणसे तिचा विचार करून आजची भूमिका मांडताना दिसतात. तर काही लोक मूळ भूमिकेपासून पळपुटेपणाची भूमिका सोयीनुसार घेत असतात. अर्थात मूर्ख लोकांना कुरवाळणारी संवेदना लौकिक अर्थाने दुबळी असते. धर्म आणि जात संकल्पनेतून उदयास आलेली भूमिका सर्वार्थाने आदर्श निर्माण करूच शकत नाही. हे अनेकदा सिद्ध झाले आहे.

लोक शिक्षकांनी मांडलेली भूमिका गौण ठरवली जात आहे. अशिक्षित गाडगेबाबा शिक्षणावर बोलताना दिसतात. छ. शिवाजी महाराज अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येतात. म्हणजे चारित्र्य घडवण्याची भूमिका अनेकदा अनेकांनी घेतली आहे. परंतु सध्या तरी जुनीच परंपरा, मढे उकरण्याच्या मानसिकतेत लोकांना ढकलून दिले जात आहे. या तथ्यहीन प्रश्नांपेक्षा अनेक ज्वलंत प्रश्न आ वासून उभे आहेत. ते कधी लावून धरणार? मंदिर, मशिद, चर्च आणि विहार सामर्थ्यवान करण्यापेक्षा भारतीय भविष्य सामर्थ्यशाली बनले पाहिजे. लोकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासकीय व्यवस्थेने पुढाकार घेतला पाहिजे. एकंदरीत मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे. तसे दिसत नाही.

कारण यांना राजकीय सत्ता महत्त्वाची आहे. पद प्रतिष्ठेच्या नावाखाली लोकांच्या भावनांशी खेळायला आवडते. हे अनेकदा सिद्ध झाले आहे.
शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण, शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेली अनास्था, ग्रामीण भागातील आरोग्यसेवा याबाबत आपण कोणती भूमिका घेतली. राशन फुकटात वाटले, धूर विरहीत चुली दिल्या आणि भाव गगनाला भिडवला म्हणजे आम्ही व्यापारी, व्यावसायिक भूमिका घेतली, हे खरेच ना ! याही पेक्षा पायाभूत सुविधांचा विकास झपाट्याने करणे गरजेचे आहे. नको ते करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आजच्या काळात हाती घेतलेल्या कोणत्याही कामातून आजचे प्रश्न सुटणार नाहीत. मंदिराच्या भव्यतेचा डामडौलाने, कधी पोटातील आग आटोक्यात आणली जाते का? गाडगेबाबा म्हणत,”मंदिरात देव नसतो, तिथे पुजाऱ्यांचे पोट असते.”

हे क्लेशदायक आहे. भारतीय जनता आता लबाडी आणि लाचारीला कंटाळली पाहिजे. न्याय, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान विकून जगण्यापेक्षा मुक्तपणे संवाद सरकारशी केलाच पाहिजे. जो मूलभूत हक्क आहे. तो जपला पाहिजे. अन्यथा ही तुघलकी शक्ती पुन्हा पुन्हा आपले जगणे मुश्किल करील,यात शंका नाही.ही लोक म्हण खूप छान शिकवण देते. सद्या भारत वर्षात सर्वच लोक चढावोढीने प्रत्यय देत आहेत. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्राचा गांभीर्याने विचार न करताच बेताल वक्तव्य करताना दिसून येत आहेत.

इतिहासाची मोडतोड करून फायद्याचा इतिहास मांडला जातो आहे. आर्थिक निकषाचे गणित चुकवले जाते आहे. भलतेच मूर्ख बडबडत आहेत. सत्य कोनाड्यात पडून काकुळतीला येत आहे. खोटे बिन बोभाट गावभर होते आहे.”मूर्खाने कितीही वाईट कर्म केले,* **तरी त्याचे त्याला काहीच वाटत नाही.”* समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुभावाच्या शेतात चरणारी गाढवं उभं पीक नासवल्याशिवाय राहणार नाहीत. त्या मळ्याची राखन करणं, भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.हे विसरून चालणार नाही. अनेक सुधारक, क्रांतिकारक यांच्या रक्तामांसाच्या खतातून हा उभारलेला देश, राजनीतीच्या फसवेगिरीने उध्वस्त झाल्यावाचून राहील काय? याचा सदैव नागरिक म्हणून विचार करावा.

✒️चंद्रकांत गायकवाड(मुखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here