

🔺७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक!
✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ)
दिग्रस(वसमत हिंगोली)(दि 30नोव्हेंबर):- माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना वसमत तालुक्यातील दिग्रस (खु) येथे घडली आहे. केवळ जमिनीच्या वादातून एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण करून त्यांचा पाय मोडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दिग्रस (खु) येथील शिवारात ही घटना घडली. शेतजमिनीचा जुना वाद उफाळून आल्यानंतर, वृद्ध महिलेवर निर्घृण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आजींना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा पाय मोडला आहे. एवढेच नाही तर जखमी पिडीतेच्या वैद्यकीय उपचारासाठी दीड लाख रुपये खर्च करुन पिडीतेच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर पडला आहे. वयाच्या सत्तरीत अशा वेदनादायक प्रसंगाला सामोरे जावे लागल्याने पीडित महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
घटनेनंतर तब्बल १० दिवसांनी, म्हणजेच १४ ऑक्टोबर २०२५ रोजी कुरुंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजिस्टर नंबर ४२७/२५, भान्यासं कलम ११८(१), १८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार आरोपी १). कुंडलीक राजाराम मोकळे, २). माधव डिगाजी मोकळे, ३). भारत कुंडलीक मोकळे, आणि ४). संजय कुंडलीक मोकळे सर्व या. दिग्रस (खु) ता वसमत जि. हिंगोली यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींवर कडक कारवाई करण्यात पोलिस दीरंगाई करुन आरोपींना अभय दिल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. त्यामुळे न्याय व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पीडित महिला ७० वर्षांच्या आहेत. वयोमानानुसार त्यांची प्रकृती नाजूक असतानाच, अशा गंभीर मारहाणीमुळे त्या अंथरुणाला खिळल्या आहेत. “आमच्या देशातील न्यायदाची प्रक्रिया इतकी संथ आहे की, खटले वर्षानुवर्षे चालतात. अशा परिस्थितीत, या वृद्ध मातेला त्यांच्या जिवंतपणी न्याय मिळणार की नाही?” असा उद्विग्न सवाल पीडित महिलेच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने शीघ्र गतीने तपास करून आरोपींना न्यायालयात खटला दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पिडीत महीला व तीच्या कुटूंबीयांनी केली आहे.











