

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
परभणी(दि.28नोव्हेंबर):- येथे 27 नोव्हें. 2024 रोजी झालेल्या राष्ट्रीय शुभारंभाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त “ बालविवाह मुक्त भारत ” अभियान अंतर्गत इन्स्टिटयूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म /इसार संस्थेने परभणी जिल्ह्यात व्यापक जनजागृती उपक्रम राबवले.अभियानाच्या प्रतीकात्मक दिवशी जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालये,विविध संस्था/गावपातळीवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत ISAR संस्थेने विद्यार्थ्यांपासून ग्रामस्थांपर्यंत सर्वांना बालविवाहाचे दुष्परिणाम,बालविवाह प्रतिबंधक कायदा (PCMA) 2006 याची माहिती दिली. समुदायांमध्ये कायद्याबाबत जागृती करताना संस्थेने हे स्पष्ट केले की,बालविवाहात सहभागी होणारे केटरर्स, पाहुणे, टेंट सेवा पुरवठादार,विवाह पार पाडणारे धार्मिक नेते देखील कायदेशीर शिक्षेस पात्र ठरू शकतात.अभियानाचा प्रभाव वाढवण्यासाठी जिल्हाभर ” प्रतिज्ञा कार्यक्रमांचे आयोजन ” करण्यात आले, ज्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवक, पालक व ग्रामस्थ सहभागी झाले. “१८ वर्षांपूर्वी मुलींचा आणि २१ वर्षांपूर्वी मुलांचा विवाह होऊ देणार नाही” अशी प्रतिज्ञा देत सर्वांनी बालविवाह निर्मूलनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली.
ISAR संस्थेच्या या व्यापक जनजागृती उपक्रमामुळे बालविवाहाबाबत समाजातील दृष्टिकोन बदलण्यास मदत होत असून,बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. संस्था येत्या काळात अधिक तीव्रतेने मोहीम राबवून जिल्हा ‘बालविवाह मुक्त’ करण्याचा संकल्प दृढ करीत आहे.











