

समाजाच्या प्रत्येक थरात आरोग्याची आणि सेवाभावाची गरज वाढत चालली आहे. परंतु, या यंत्रणेमध्ये काही व्यक्ती अशा असतात ज्या केवळ ‘डॉक्टर’ नसतात. त्या उपचारकारीच नसतात, तर उपचारांचा स्रोत असतात. अशा व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे डॉ. अभिता कवाडे, ज्या सेवेच्या आणि करुणेच्या संगमावर उभ्या आहेत. एक समर्पित वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या आणि निसर्गप्रेमी, ज्यांचं आयुष्य ‘सेवा हीच साधना’ या तत्त्वावर उभं आहे. सध्या त्या रचना ऑर्गेनिक फार्म, कान्होलीबारा (हिंगणा), नागपूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राजन अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, वर्धा येथे वास्तव्यास असून, मागील १५ वर्षांपासून ग्रामीण आणि उपनगरी भागात आरोग्यसेवेचा दीप पेटवत आहेत. त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथील आयुर्वेद कॉलेजमधून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत पूर्ण केलं. डॉ. अभिता यांनी शहराकडे झेप न घेता गावाकडे वळण्याचा निर्णय घेतला. रुग्णांना केवळ औषध नव्हे, तर मानवी संवेदनांचं औषध देणं हेच त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे. दररोज अनेक रुग्ण त्यांच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी येतात, परंतु परत जाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित हेच त्यांच्या यशाचं खऱ्या अर्थाने मोजमाप आहे. त्यांच्या करिता वैद्यक हा एक व्यवसाय नव्हे, तर व्रत आहे.
डॉ. अभिता यांनी वैद्यकीय क्षेत्रापुरतं स्वतःचं कार्य मर्यादित ठेवलं नाही.
त्या अनेक स्वंयसेवी संस्थेशी संलग्न राहून महिला व बाल आरोग्य, पोषण, स्वच्छता, आणि आरोग्य जनजागृतीसाठी कार्य करतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत ओबीसी महासंघ, वर्धा यांनी त्यांचा सत्कार केला असून, त्यांचं ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी’ त्यांचं नामांकन झालं आहे, जे त्यांच्या समाजासाठीच्या अथक परिश्रमाचं द्योतक आहे. हा त्यांच्या सामाजिक कार्यातील संवेदनशील सहभाग आहे. डॉ. अभिता यांचं व्यक्तिमत्त्व फक्त समाजसेविकेपुरतं नाही; त्या वन्यजीवप्रेमी आणि निसर्गसंवेदनशील प्रवासी आहेत. त्यांना वाघांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहणं आवडतं. त्यांच्या मते, “वन ही केवळ सौंदर्याची नाही, तर संयम आणि समतोलाची शाळा आहे.” हा समतोल त्यांच्या जीवनातही स्पष्टपणे दिसतो. वैद्यकीय जबाबदारी आणि मानवी नात्यांचा ताळमेळ जपणारा.
ज्ञानाची आणि विचारांची ओढ, वाचन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कादंबऱ्या, वृत्तपत्रं आणि कॉमिक्स या सर्वांमधून त्या मनाला ताजेतवाने ठेवतात. वाचनातून मिळालेलं चिंतन त्यांच्या विचारांमध्ये आणि रुग्णांशी संवादात सहज दिसून येतं. डॉ. अभिता या डॉक्टर असल्या तरी त्या औषधांपेक्षा आशा देतात,उपचारांपेक्षा आधार देतात आणि व्यवसायापेक्षा नातं जपतात. त्यांचं अस्तित्व समाजात करुणा, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलतेचा सुगंध पसरवतं. त्यांचं जीवन सांगतं, “डॉक्टर असणं म्हणजे आजार बरा करणं नव्हे, तर माणूस पुन्हा जगण्यावर विश्वास ठेवेल अशी आशा देणं.”
✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९











