Home नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकनिष्ठ शिलेदार : कर्मवीर दादासाहेब गायकवाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकनिष्ठ शिलेदार : कर्मवीर दादासाहेब गायकवाड

101

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत दादासाहेब गायकवाड यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतर दलित समाज दिशाहीन होऊ नये, त्यांच्या विचारांची ज्योत विझू नये, यासाठी जी जबाबदारी काही मोजक्या नेत्यांवर आली, त्यात दादासाहेब गायकवाड अग्रस्थानी होते. बाबासाहेबांचा त्यांच्यावर असलेला विश्वास हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर वैचारिक प्रामाणिकतेचा पुरावा होता. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की ज्यांनी सत्तेच्या प्रकाश झोतात राहण्यापेक्षा संघर्षाच्या अंधारात उभे राहणे पसंत केले. अन्याय, शोषण आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. दादासाहेब गायकवाड हे असेच एक निर्भीड, निःस्वार्थ आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्व होते. ते केवळ आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष नव्हते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक-राजकीय विचारांचे प्रामाणिक वाहक होते. तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुध्दा होते. 

 भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1902 रोजी नाशिक येथे झाला. ते भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे विश्वासू सहकारी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या चळवळीत प्रगल्भ, विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतं, “माझ्या आत्मचरित्रात अर्धा भाग भाऊराव गायकवाड असणार आहे. तो नसला, तर माझे चरित्र पूर्ण होणार नाही”. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या म्हणण्यातच दादासाहेब गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीत व बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षातील महत्त्वाचे स्थान दिसून येते. बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता, अनेक आंदोलनांत आंबेडकरांना साथ त्यांनी दिली होती. समाजाविषयींचा त्यांचा कळवळा हा आंतरिक उमाळ्यातून आलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील दलित जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जो व्यापक संघर्ष सुरू केला त्या संघर्षात बाबासाहेबांना साथ देण्यासाठी सुरुवातीच्या काळात पुढे आलेल्या दलित युवकांपैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे एक होत.

 20 मार्च 1927 चा महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि 2 मार्च 1930 रोजी केला गेलेला नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, या सत्याग्रहांमध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या बरोबरीने भाग घेतला होता. या सत्याग्रहाच्या वेळी डॉ. आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे नाशिक मधील प्रसिद्ध मंदिर आहे. डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या इतर चळवळींमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात दादासाहेबांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचे एक प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जात होते. 

 बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे केवळ राजकीय पक्ष नव्हते, तर दलित, वंचित, शोषित समाजाच्या आकांक्षांचे व्यासपीठ होते. बाबासाहेबांच्या निधनानंतर या पक्षाची धुरा दादासाहेब गायकवाड यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांनी पक्षाला केवळ निवडणुकांचे साधन न बनवता, सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने संसदेत, रस्त्यावर आणि समाजमनात अन्यायाविरोधात आवाज बुलंद केला. सत्तेसाठी तडजोड करण्यापेक्षा स्वाभिमान, समता आणि सामाजिक न्याय यांना प्राधान्य देणे, हीच दादासाहेबांची राजकीय भूमिका होती. आजच्या राजकारणात जिथे सत्तेसाठी पक्ष, विचार आणि निष्ठा बदलल्या जातात, तिथे दादासाहेब गायकवाड यांचे जीवन हे तत्त्वनिष्ठतेचा जिवंत आदर्श ठरते. त्यांनी कधीही बाबासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली नाही. राजकीय फायद्यांसाठी दलित समाजाच्या प्रश्नांवर सौदेबाजी केली नाही. त्यांचे राजकारण हे घोषणा-प्रधान नव्हते, तर संघर्षप्रधान होते. शिक्षण, रोजगार, जमीन, सन्मान आणि राजकीय प्रतिनिधित्व या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला.

 दुर्दैवाने, भारतीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहाने दादासाहेब गायकवाड यांचे योगदान अपेक्षित प्रमाणात मान्य केले नाही. इतिहासाच्या पानांत त्यांचे नाव अनेकदा झाकोळले गेले. मात्र, ज्यांनी चळवळ जवळून अनुभवली, त्यांच्यासाठी दादासाहेब हे केवळ नेते नव्हते, तर विश्वासाचे प्रतीक होते. आज जेव्हा बाबासाहेबांच्या नावाचा वापर केवळ राजकीय सोयीसाठी केला जातो, तेव्हा दादासाहेब गायकवाडांचे जीवन आणि कार्य नव्या पिढीला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. दादासाहेब गायकवाड हे नाव म्हणजे संघर्ष, निष्ठा आणि सामाजिक न्यायासाठीचे अखंड समर्पण. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पहिले अध्यक्ष म्हणून इतिहासात अजरामर राहतीलच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारतासाठी झटणारे खरे रिपब्लिकन होते. 

 ‘कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार’ हा महाराष्ट्र शासनाद्वारे 2002 पासून दिला जाणारा पुरस्कार आहे. दादासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारची ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ या नावाची एक योजना 2004 पासून आहे. 2012 साली तिचा लाभ 38 भूमिहीनांना झाला होता. मात्र त्यापूर्वी केवळ 250 लोकांना जमिनी मिळाल्या होत्या. भारत सरकारने गायकवाडांना 1968 मध्ये ‘पद्मश्री’ हा हा किताब देऊन त्यांच्या सार्वजनिक कार्याचा व समाजसेवेचा गौरव केला होता. नाशिकमध्ये एका सभागृहाला ‘दादासाहेब गायकवाड सभागृह’ नाव दिले आहे मुंबईत अंधेरी (पश्चिम) भागात ‘दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र’ नावाची संस्था आहे. तसेच दादासाहब गायकवाड यांचा परिचय करून देणारी एक 13 मिनिटांची ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ सुध्दा आहे. भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर त्या पक्षाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. पुढे या पक्षाची फाटाफूट झाल्यावर त्याच्या एका प्रभावी गटाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. रिपब्लिकन पक्षात ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले; पण दुर्दैवाने त्यामध्ये त्यांना यश आले नाही. तथापि, दलित समाजातील सर्वांत मोठ्या गटाने गायकवाडांच्या नेतृत्वालाच मान्यता दिली होती. 

 1937 ते 1946 या काळात गायकवाड मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), तर 1957 ते 1962 या काळात लोकसभेचे सदस्य व राज्यसभा सदस्य, 1957-58 मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते होते. 1962 ते 68 दरम्यान ते राज्यसभेवर सदस्य (खासदार) म्हणून कार्यरत होते. लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना दुसरे सदस्य प्रकाशवीर शास्त्री यांनी धर्मांतराविरुद्ध विधेयक आणण्याच्या केलेल्या प्रयत्नाच्या निषेधार्थ त्यांनी लोकसभेत मनुस्मृती फाडून 1927 मध्ये डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून केलेल्या प्रतीकात्मक निषेधाची आठवण करून दिली. त्यांचा 29 डिसेंबर 1971 मृत्यू झाला, 2001-02 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करून त्यांच्या कार्याची स्मृती जागवली. आज गरज आहे ती त्यांच्या विचारांचा, त्यांच्या निर्भीड भूमिकेचा आणि त्यांच्या निःस्वार्थ राजकारणाचा वारसा पुढे नेण्याची. बाबासाहेबांचे विचार केवळ जयंती-पुण्यतिथीपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना आचरणात आणणे हीच खरी आदरांजली आहे, हा संदेश दादासाहेबांच्या संपूर्ण जीवनातून मिळतो. दादासाहेबांच्या 54 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाला विनम्र अभिवादन!

✒️प्रविण बागडे(नागपूर)मो:-9923620919

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here