

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.27डिसेंबर):- शहरातील कोद्री रोड परिसरात सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून.सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात यावी,या मागणीसाठी (दि.२६ डिसेंबर शुक्रवार) रोजी ‘एक स्वाक्षरी सुरक्षित रहदारीसाठी’ या नावाने स्वाक्षरी मोहीम अभियान कॉ.योगेश फड यांनी
राबविले.या मोहिमेमधून गोळा करण्यात आलेल्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचा फलक उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांना फड यांनी सादर केला आहे.
कोद्री रोड हा गंगाखेड शहरातील वर्दळीचा मार्ग असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पादचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अवजड वाहनाची वाहतूक बंद करावी या मागणीसाठी सदर स्वाक्षरी अभियान आय.टी.आय.कॉलेज कॉर्नर, कोद्री रोड येथे राबविण्यात आले.यापूर्वीही पोलीस निरीक्षक गंगाखेड व नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे फड यांनी म्हटले आहे.यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.त्यामुळे लोकसहभागातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आल्याचेही म्हटले.
कोद्री रोड परिसरात विविध शासकीय कार्यालय,शाळा,महाविद्यालये, एमआयडीसी, मंदिर,नागरी वस्ती असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणावर मानवी व वाहनांची वर्दळ असते.अशा ठिकाणी अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहिल्यास दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.सध्या लहान मुले व वयोवृद्धांना या रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे.भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित प्रशासकीय यंत्रणांना जबाबदार धरण्यात येईल,असा इशाराही कॉ.योगेश फड यांनी दिला आहे.स्वाक्षरी मोहिमेला शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.











