Home पुणे भावना गडद करणारा कथासंग्रह ‘ रंग ‘!

भावना गडद करणारा कथासंग्रह ‘ रंग ‘!

231

श्री.पंढरीनाथ बबन भालेकर सर यांचा ‘ रंग ‘ हा पहीलावहीला कथासंग्रह. नुकताच वाचनात आला. भालेकर सर यांचा पंधरा कथांचा हा संग्रह “समग्र प्रकाशन” संस्थेने काढला आहे. याला प्रस्तावना लिहिली आहे, प्रणव सखदेव या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकाने. ‘रंग’ चे प्रकाशन 20 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. ‘नवांकुर प्रतिष्ठान’ या साहित्य संस्कार मंच चे जनक असलेले श्री. पंढरीनाथ भालेकर सर शिक्षकीपेशातून सेवानिवृत्त झाले आहेत. स्वानंदासाठी स्फुटं, गझला, कविता, कथा, लिहणाऱ्या भालेकर सरांनी मित्र आणि विद्यार्थ्यांच्या प्रेम आग्रहाखातर स्वतःचं लेखन मूर्त स्वरुपात आणायचं ठरवलं आहे. आणि ‘रंग’ हा कथासंग्रह प्रकाशित होत आहे.

 

     रंग मधील पंधरा कथा एकाहुन एक सरस आहेत. वाचकांना खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य भालेकर सर यांच्या लेखन शैलीत आहे. लेखकाच्या पेशाचा प्रभाव त्याच्या लेखनावर पडलेला दिसतो. भालेकर सर हे शिक्षक असल्याने शाळा, विद्यार्थी, शालेयजगत यांना स्पर्श करणारा आशय सरांच्या कथांमध्ये सक्षमपणे समावेशीत झाल्याचे जाणवते. सुविचार सदृश्य वाक्यरचना रंजकता वाढवते. प्रसंगाला, आशयाला, पात्रांना साजेसे संवाद योजताना शिक्षकाच्या अधिकारवाणीने पेरलेली मानवी मूल्ये लक्षवेधी ठरतात. 

              स्थल – प्रसंग वर्णनाने देखावे हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात. देखावा बघण्याचा स्वयंप्रत्यय आपण घेत आहोत असे वाचकास वाटते.

असं म्हणतात की,वाचताना कथेतील नायक आपणच आहोत असे वाचकाला वाटते, तेव्हा कथा लेखक कथा लेखनात कमालीचा यशस्वी झाला आहे याची खात्री पटते . भालेकर सर यांच्या कथा वाचताना याचा पुनः प्रत्यय येतच राहतो. घटना, वातावरण, पात्रे, कथन सगळेच कथा घटक, कथा अंगे साग्रसंगीत खुलवत साकार झालेल्या कथा वाचकाच्या मनाचा ठाव घेतात. अलंकारिक पण सुलभ आनंददायी भाषा शैली आणि प्रसंगानुरुप निवेदन शैलीयुक्त अनुभवांच्या उत्स्फूर्त आविष्काराने सर्वच कथा साजीवंत झाल्या आहेत.

       शब्द, प्रतिमा, संवाद तसेच सुरुवात, मध्य, शेवट यांतून श्रवणीयता, रंजकता आणि प्रबोधनता साधण्याचं कसब भालेकर सर यांच्या कथा लेखनात नक्कीच आहे. सामाजिक आणि नैतिक मूल्य पेरणी करताना वास्तवाला कल्पनेची जोड देत, नव्या – जुन्याचा उत्तम मेळ साधल्याने कथा सर्व वयातील वाचकांना भूरळ घालणारी ठरते.

      मानवी जीवनात अनेक पदरी भूमिकांत अनेकविध कर्तव्येरुपी रंग भरावे लागतात. नातीगोती, कर्तव्ये, व्यवहार, स्वार्थ, अर्थ आणि मानवता यांचा मेळ घालत पुढे जाताना भेटणारी शिवा, संभा शेठ(आत्मभान ), आभ्या, नानी ( आभ्याची नानी) आप्पा, रामदास ( रांजणखळगे ) अशी अनेक पात्रे वेगवेगळ्या कथांतून भेटत राहतात. वाचकास अनुभवसंमृद्ध करत राहतात. ‘पहिला पाऊस’ वाचताना शंकर पाटलांची ‘वळीव ‘आठवते. टिटालिस पर्वत आणि परिसराचं निसर्ग वर्णन वाचताना नासींची शैली आठवते. ग्रामीण आणि नागरी परिवेशातील कथा दोन्हीही संस्कृतींचा संगम वाटतात. अनेक कथांतील नैसर्गिक घटक आणि प्राणी यांची पात्र योजना मानवी भावभावनांचे प्रतिनिधित्व करते, तेव्हा कारुण्याने डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत. कथा वाचनाने अनुभव संमृद्ध व्हायचे असेल तर… पंढरीनाथ बबन भालेकर यांचा ‘रंग’ हा कथासंग्र वाचण्याशिवाय पर्याय नाही.

        कथेच्या शेवटी धक्का तंत्राने वाचकांना अचंबित करणारी ‘स्माईल’, लाडक्या लेकीचा लडीवाळपणा स्वभाव कद्रू पणाने कुरवाळला नाही पण, लाडकी या सदरानं आपली चूक उमगणारा ‘ लाडकी’तला जन्म दाता, कोरोनातील लॉकडाऊनने पिढीपरंपरागत व्यवसायाचं महत्व पटलेलं ‘ सुताराचं पोर ‘ ‘आजी’तील नात्यांचं वैभव, ऍड. गणेश कोळींचा अवलियापणा, ‘सुश्रुषा’तील वाचकास अंतर्मुख करणारे प्रसंग, असह्य परिस्थितीचा फायदा उठवत अनेकांना फसवणं चूकीचं आहे हे स्व संकटानं येणारं ‘आत्मभान’, निर्णयावर ठाम राहणारी ‘आभ्याची नानी’, सहजीवन, भूतदया आणि नाती यांतील खाचखळगे अर्थात ‘रांजणखळगे’, नेत्यातील माणूस ‘ मी तसा मोकळाच आहे’, गुरुजींचं नोबेल ‘गुरुपौर्णिमा’, सहचारिणीसाठी कासावीस करणारा ‘पहिला पाऊस’, लोभस नातवाचे आजोबा ‘माझ्या ड्याडींचे बाबा’, कलाकाराचे जीवन रंग अर्थात कथासंग्रहाची शीर्ष कथा ‘रंग’ आणि ‘गोष्ट… पैसा नव्हता त्या काळाची!’ ही सुखाच्या काळाची दर्शक कथा… या सा-या कथांनी कथासंग्रह वाचण्याची ओढ अनिवार्य झाली आहे. वाचूया!

मनासारखं जगावं.. वागावं.. लिहावं… या भावनेतून मूर्त रुपाने लिहिते झाल्या बद्दल श्री. पंढरीनाथ बबन भालेकर सर यांचे मनापासून अभिनंदन आणि खूप सा-या शुभेच्छा!!

✒️सुधीर शेरे(रुणवाल गार्डनसीटी,डोंबिवली पूर्व,जि.ठाणे)मो:-9167005076

कथासंग्रह – रंग

कथाकार – पंढरीनाथ ब. भालेकर 

प्रकाशन – समग्र प्रकाशन,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here