

▪️धर्म ग्रंथाच्यावर संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे- ॲड एस के भंडारे
✒️उल्हासनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
उल्हासनगर(दि.30नोव्हेंबर):- शब्द पाळणे मला जास्त महत्वाचे आहे. समोर किती लोक आहेत यावर यश अपयश ठरत नसते, असलेली लोकं विचाराने किती पक्की संविधानाशी बांधलेली आहे हे महत्वाचे आहे. आपला मोठा संघर्ष चातुर्वर्ण्याचा माणसामध्ये उच्च निच्च सांगण्याचा विचार प्रणाली सांगणारा राजकीय पक्ष आणि संघटना यांच्या विरोधातील संघर्ष कायम चालू राहणार असे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात सुनबाई राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई बाळासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा 76 वा वर्धापन दिन आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा उल्हासनगर तालुक्याचा 36 वा वर्धापन दिन कार्यक्रम दि.26 नोव्हेंबर 2025 रोजी उल्हासनगर येथील सिंधू भवन, उल्हासनगर नंबर 3 येथे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून केले .प्रा. अंजलीताई आंबेडकर पुढे असे म्हणाल्या की,तथागत बुद्धांनी सम्यक जीवनाचा मार्ग दाखविला , प्रज्ञा शील करुणा या तीन मूल्यावर मानवी आयुष्य केंद्रित व्हावा संदेश दिला हा बौद्ध धम्म सार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आणला.
यावेळी प्रमुख प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय कार्यालय प्रमुखॲड एस के भंडारे यांनी भारतीय संविधानाचे महत्व सांगतांना कलम 25 नुसार कोणत्याही भारतीय नागरिकास कोणताही धर्म आचरणाचा अधिकार असून चातुर्वर्ण्य च्या बाहेर असलेल्या अस्पृश्याना व सर्व नागरिकास कलम 14,15 नुसार समता प्रस्थापित करून धर्म, जात, लिंग, जन्मस्थान यावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही अशी तरतूद केली असून कलम 14 ते 30 च्या मूलभूत अधिकाराविरुद्ध कोणताही कायदा, रूढी, नियम, सांगितले तर ते कलम 13 नुसार शून्यवत केले आहेत असे सांगून कोणत्याही धर्म ग्रंथाच्यावर संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे. त्याचे पालन प्रत्येक भारतीयाने केले पाहिजे. जसे बाबासाहेब म्हणाले की, मी प्रथम भारतीय आणि अंतिमत: भारतीय आहे तसे प्रत्येकाने भारतीय असले पाहिजे असे प्रतिपादन केले.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ ॲड जगदीश गवई व सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड व शिलाताई तायडे यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष रोशन पगारे होते व स्वागत अध्यक्ष महिला तालुका अध्यक्ष कल्पनाताई बनसोडे होत्या व सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस संदीप उबाळे यांनी केले.
उल्हासनगर तालुक्याचा वर्धापन दिन प्रथमच साजरा करण्यात आला त्यानिमित्त तालुक्याचे आतापर्यंतचे 13 अध्यक्ष यांचे व विद्यमान 10 शाखांचे स्वागत करण्यात आले व काहीना मरणोत्तर सन्मान करण्यात आला. तालुक्याचे पहिले अध्यक्ष वयवृद्ध हिरामण जाधव उपस्थित होते.यावेळी विविध पुरस्कार ही देण्यात आले.जिल्हा शाखेचे व तालुका शाखेचे व त्याअंतर्गत सर्व शाखांचे आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी ॲड भंडारे यांच्या हस्ते सर्व उपस्थितांनी संविधान प्रस्ताविकेची शपथ घेतली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार अशोक शिरसाट व वंचित बहुजन आघाडीचे उज्वल महाले आणि तालुका शाखेचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी परिश्रम घेतले.











