

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.12नोव्हेंबर):-येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचा (IIITN) 5 वा दीक्षांत सोहळा दक्षिण अंबाझरी मार्गावरील विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या सभागृहात, मोठ्या उत्साहात पार पडला.
केंद्र सरकारच्या अखत्यारितील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (AICTE) अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यासोबतच नागपूर येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष दीपक घैसास हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रा. सीताराम यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, तंत्रज्ञानातील नवोन्मेष, जागतिक सहकार्यपूर्ण भागीदारी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आज जग क्रांतिकारी डिजिटल शतकात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. आज पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांनी समस्यांची सोडवणूक करणारे आणि राष्ट्र निर्माते व्हावे, आणि शाश्वत तसेच आत्मनिर्भर भारतासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. उद्याच्या विकसित भारताचे शिल्पकार म्हणून कायम अद्ययावत राहता यावे यासाठी, निर्भयपणे नवोन्मेषाची कास धरता यावी यासाठी आणि ठोस उद्देशाने नेतृत्व करता यावे यासाठीही त्यांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनही दिले.
या सोहळ्याला पदवी अभ्यासक्रमाच्या 6 व्या तुकडीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राध्यापक, आणि देशभरातील इतर भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समारंभादरम्यान, नागपूर येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या एकूण 431 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या. यात 8 पीएच.डी., माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान अभ्यासक्रमातील 25 तंत्रज्ञान पदव्युत्तर (M.Tech.) पदव्या, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील 69 पदव्युत्तर पदविका आणि 329 तंत्रज्ञान पदवी (B.Tech.) अभ्यासक्रमाच्या पदव्यांचा समावेश होता.
संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना दोन शैक्षणिक पुरस्कारही प्रदान केले. याअंतर्गत संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी (CSE) अभ्यासक्रमाचे योहान मायकेल (CGPA: 9.62) तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकी (ECE) अभ्यासक्रमाती गुरुवेली चैत्रा (CGPA: 9.19) या दोघांना आपापल्या विषयांमध्ये सर्वोच्च गुण मिळवल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्व पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त CGPA 9.62 मिळवल्याबद्दलचा, संस्थेच्या वतीने दिला जाणारा संस्था उत्कृष्टता पुरस्कार हा सर्वोच्च शैक्षणिक सन्मान योहान मायकेल यांना प्रदान करण्यात आला.
पारंपरिक शैक्षणिक मिरवणुक सभागृहात दाखल झाल्यानंतर मुख्य दीक्षांत सोहळ्याचा प्रारंभ झाला. या समारंभात नागपूर इथल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे संचालक, डॉ. प्रेम लाल पटेल यांनी स्वागतपर भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी संस्थेचे आजवरचे यश आणि प्रगतीमय वाटचालीचा पट उलगडणारा संस्थेचा अहवाल सादर केला.
संस्थेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष दीपक घैसास यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी 2025 च्या सर्व पदवीधरांचे अभिनंदन केले. आपल्या भाषणातून त्यांनी या विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, तसेच नवोन्मेष आणि निष्ठेने वाटचाल करत, मजबूत आणि आत्मनिर्भर भारताच्या जडणघडणीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहन दिले. अभियंते केवळ तंत्रज्ञ नसतात, अभियंत्यांनी समावेशक समाज घडवण्यासाठी तांत्रिक उत्कृष्टतेला करुणाभाव, शाश्वतता आणि सामाजिक जबाबदारी यांची जोड दिली पाहिजे, याची जाणिव त्यांनी या पदवीधरांना करून दिली.
संस्थेचे कैलास एन. डाखले (I/c Registrar) यांनी समारंभाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी सांभाळली, तर डॉ. नेहा कस्तुरे आणि डॉ. माधुरी तायडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.











