Home Breaking News भाजप नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरी दारूचा महापूर; पोलिसांची मोठी...

भाजप नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरी दारूचा महापूर; पोलिसांची मोठी कारवाई, ४५ पेट्या दारू जप्त – जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

240

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.12नोव्हेंबर):-आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांच्या घरी तब्बल ४५ पेट्या दारू सापडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे नेते तसेच भाजपा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता मधुकर भांडेकर यांच्या वालसरा (ता. चामोर्शी) येथील निवासस्थानी पोलिसांनी मंगळवारी पहाटे छापा टाकला.

या छाप्यात देशी दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या असून, पोलिसांनी एकूण ४५ पेट्या दारू जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात तसेच समाजमाध्यमांवर मोठी चर्चा रंगली आहे.

चामोर्शी पोलिस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणी भाजप युवा आघाडीचे चामोर्शी तालुका उपाध्यक्ष रामचंद्र केशव भांडेकर, जे मधुकर भांडेकर यांचे लहान बंधू आहेत, यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

आगामी निवडणुका लक्षात घेता, इतक्या मोठ्या प्रमाणात दारूचा साठा भाजप नेत्यांच्या घरी सापडल्याने, ही दारू मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणार होती काय? असा प्रश्न समाजमाध्यमांवरून तसेच स्थानिक राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

“दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात भाजपचेच नेते अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करतात, हे जनतेस दिशाभूल करणारे आहे,” अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here