चंद्रपूर (प्रतिनिधी)-
ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे गेल्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सिपेट सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे व्हिडिओ द्वारे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते झाले . यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री ना. मंगल प्रभात लोढा, विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांचा संदेश उपस्थितांना ऐकविण्यात आला.
यावेळी पंच परिवर्तन व्याख्यानमालेअंतर्गत संस्थेत नागरिक कर्तव्य व शिष्टाचार या विषयावर एड.अजित पांडे यांचे तर एड. आशिष मुंदडा यांचे कुटुंब प्रबोधन व पर्यावरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन झाले. यावेळी आय. एम. सी. सदस्य एड. नरेश मडावी, मयूर चहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक बंडोपंत बोढेकर यांनी केले. कार्यक्रम स्थळी उपस्थित मंडळींच्या माहितीसाठी इनोव्हेटिव्ह व बिझनेस स्टाल असे एकूण नऊ स्टाल लावण्यात आले होते. सूत्रसंचालन निर्देशक सौ. अनिता ढेंगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक एन.एन. गेडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व समिती सदस्यांनी तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला प्रशिक्षणार्थी, पालक वर्ग व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




