Home गडचिरोली ईद च्या आनंदात संविधानाचा सन्मान – धर्म आणि राष्ट्र भावनेचे सुंदर संमिलन

ईद च्या आनंदात संविधानाचा सन्मान – धर्म आणि राष्ट्र भावनेचे सुंदर संमिलन

189

 

प्रतिनिधी:

गडचिरोली – धार्मिक सणाच्या आनंदात सामाजिक जागृतीचा संदेश देणारा एक आगळावेगळा उपक्रम गडचिरोलीत राबविण्यात आला. ईद-उल-अजहा या पवित्र सणाच्या दिवशी गरीब नवाज मस्जिद, भात गिरणी परिसर, गडचिरोली येथे समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘हर घर संविधान’ या अभियानांतर्गत मुस्लिम बांधवांना भारतीय संविधान ग्रंथ भेट देण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून फक्त शुभेच्छाच नव्हे, तर भारतीय संविधानातील समतेचे, बंधुत्वाचे आणि धर्मनिरपेक्षतेचे मूल्यही प्रत्यक्ष कृतीतून दाखविण्यात आले. संविधान हा सर्व भारतीयांचा मार्गदर्शक असून, तो प्रत्येकाच्या घरात आणि हृदयात असावा, असा संदेश या प्रसंगी देण्यात आला.

कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहूर्ले, संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय देवतळे, सहसचिव संदीप येनगंटीवार यांची उपस्थिती होती. तसेच गरीब नवाज मस्जिदचे अध्यक्ष मा. सरफराज शेख, सचिव फारुख शेख, उपाध्यक्ष वसीम शेख, शकील सैय्यद, कयामुद्दिन खान, आफताब खान आणि अनेक मान्यवर तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सण साजरे करताना सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत दिलेल्या या संविधान भेटीमुळे सौहार्द, समजूत आणि एकतेचा नवा अध्याय लिहिला गेला. ‘हर घर संविधान’ कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्म, जात, पंथ यांच्या पलिकडे जाऊन संविधानाचे मूल्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. समाजात बंधुभाव, समता आणि जागरुकतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसादात साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here