गंगाखेड :-
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या हजारोच्या पुढे गेली असून नगरीकानी त्यांची चांगलीच दहशत घेतली आहे. मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अद्याप कोणत्याच ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.त्यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गंगाखेड नगरपालिकेने कुठल्याच ठोस उपाययोजना केलेल्या दिसत नाही. गंगाखेड नगर परिषदेवर प्रशासक असल्याने आपण बोले तोच कायदा असे दिसत आहे.अशी खंत नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.
परिणामी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असून नागरिकांना, विद्यार्थ्यांना दररोज त्यांच्या दहशतीला तोंड द्यावे लागत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांसह लहान-मोठ्या वसाहती, चौक, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांचा मोकाट कुत्र्यांनी ताबा घेतला आहे. नवा, जुना मोंढा, रेल्वे स्टेशन, बस स्थानक,जुना शनिवार बाजार, दत्त मंदिर परिसर, महेबुब नगर, नवीन बळीराजा कॉलनी, रामेश्वर नगरी, बरकत नगर या भागात तर कुत्र्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दहशतीला सामोरे जावे लागत आहे. सध्या जून महिना सुरू झाला असून आपल्या पाल्यांना शाळेत व खाजगी शिकवणीसाठी पाठवावे कसे अशी धडकी पालकांना भरली आहे.कामगार रात्री उशिरा घरी येतात.त्यांनाही या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो.दहा-बारा कुत्र्यांचे टोळके रस्त्याच्या मधोमध बसलेले असते. रात्री-अपरात्री दंगामस्ती करून हे कुत्रे नागरिकांची झोपमोड करतात चावा घेतात त्यामुळे नागरिक कुत्र्यांच्या जाचाला वैतागले आहेत.
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिकेच्या वतीने कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.परिणामी या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. म्हणून हे मोकाट कुत्रे शहरात धुमाकूळ घालत आहेत. या मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.




