Home लेख हनी ट्रॅपमध्ये अडकून देशाशी गद्दारी करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या

हनी ट्रॅपमध्ये अडकून देशाशी गद्दारी करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या

86

तरुण मुलांसोबत अश्लील चॅटिंग करून त्यांना जाळ्यात ओढणे आणि नंतर त्यांच्याकडून अश्लील कृत्ये करून घेणे ते करताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे. ते व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्या कडून लाखो रुपयांची खंडणी वसूल करणे असा हातखंडा सायबर माफियांनी काही दिवसांपासून अवलंबला आहे. हाच हातखंडा आता पाकिस्ताननेही वापरला असून भारतातील संरक्षक विषयक महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींना सुंदर ललनांच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या मार्फत भारतातील संरक्षक विषयक महत्वाची माहिती गोळा केली जात आहे. अशीच संरक्षक विषयक महत्वाची माहिती पाकिस्तानला पुरवणारा रवीकुमार वर्मा या तरुणाला पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. रविकुमार वर्मा हा एक नव्हे तर दोन पाकिस्तानी महिलांच्या संपर्कात होता. त्याने या दोन्ही महिलांना सोशल मिडियाच्या माध्यमातून वेळोवेळी भारतीय नौदल आणि डॉकयार्ड मधील पाणबुड्या व जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवली होती असे एटीएसच्या चौकशीतून समोर आले आहे. रविकुमार वर्मा हा नेव्हल डॉक मध्ये ज्युनियर मेकॅनिकल फिटर इंजिनियर होता. पाकिस्तानी महिलांची रविकुमार वर्माशी सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर या महिलांनी त्याच्यासोबत अश्लील चॅटिंग करून आम्ही तुला प्रत्यक्ष भेटणार आहोत अशी भुरळ घालून त्यास या महिलांनी सतत गुंतवून ठेवले होते. त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या महिलांनी त्याला आर्थिक मदतही केली. पाकिस्तानमधून त्याच्या बँक अकाऊंटवर पैसे जमा झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. रविकुमार वर्माच्या या कारनाम्याने देशभर खळबळ उडाली आहे अर्थात हनी ट्रॅपमध्ये अडकून देशाशी गद्दारी करणारा रविकुमार वर्मा हा पहिला व्यक्ती नाही. मागील वर्षीच डीआरडीओ या देशाचे संरक्षण साहित्य तयार करणाऱ्या संस्थेत शास्त्रज्ञ असलेल्या डॉ प्रदीप कुरुलकर या व्यक्तीला पोलिसांनी पाकिस्तानला देशाच्या संरक्षणासंदर्भात गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. विशेष म्हणजे डॉ कुरुलकर हे डीआरडीओ संस्थेत मागील ३८ वर्षांपासून कार्यरत होते. त्यांनी डीआरडीओच्या प्रमुख क्षेपणास्त्रांच्या प्रेक्षपक आणि ग्राउंड सिस्टीमच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली होती. मिशनशक्ती या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या प्रेक्षपकाची निर्मिती त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. त्यांना निवृत्त होण्यासाठी अवघी सहा महिने उरली असताना हे प्रकरण घडकीस आले. गेल्या काही वर्षांपासून ते पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाच्या महिलेच्या संपर्कात होते. या महिलेने नाव बदलून त्यांच्याशी संपर्क केला. मैत्रीचे ( की प्रेमाचे ) नाटक करून त्यांच्याशी संपर्क वाढवला आणि त्यांच्याकडून देशाच्या संरक्षणासंदर्भात महत्वाची माहिती हस्तगत केली. डॉ कुरुलकर हे पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने देशाच्या संरक्षणा संदर्भातील अनेक महत्वाची आणि गुप्त माहिती पाकिस्तानपर्यंत पोहचली. केंद्र सरकारने याची गांभीर्याने नोंद घेऊन त्यांना त्वरित अटक केली. हनी ट्रॅप मध्ये अडकून देशाशी गद्दारी करणारे हे दोघेच नाहीत या आधीही बीएसएफचा एक जवान, अरुण मारवाह नामक वायुदलातील एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. शत्रूराष्ट्राच्या गोटात शिरून त्यांच्याकडून गुप्त माहिती काढून घेणे यासाठी ललनांचा वापर करणे हे पूर्वीपासूनच चालत आले आहे. सर्वच देश हे करतात मात्र आता माहिती तंत्रज्ञान युगात हे करणे अधिक सोपे झाले आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा महत्वाच्या पदावरील व्यक्तींना संपर्क साधने आता सहज शक्य आहे. पाकिस्तानच्या गुप्तहेर महिलांनीही हेच केले आणि रविकुमार वर्मा, डॉ कुरुलकर यांना या महिलांनी आपल्या जाळ्यात अडकवले. आता रविकुमार वर्मा यांची पूर्ण चौकशी केली जाईल त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येईल पण देशाची संरक्षण विषयक गुप्त माहिती पाकिस्तानला मिळाली आहे त्यामुळे देशाच्या संरक्षणालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच हनी ट्रॅप मध्ये अडकून देशाशी गद्दारी करणाऱ्या रविकुमार वर्मा सारख्या गद्दारांना कठोर शिक्षा द्यायला हवी.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here