९० मीटर भाला फेकण्याचे भारताचा गोल्डन बॉय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राचे स्वप्न साकार झाले आहे. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. दोहा डायमंड लीगमध्ये तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटर भाला फेकत नीरजने स्वप्न साकार केले आहे. ९० मीटर भाला फेकून त्याने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रमही मोडला आहे. त्याची ही कामगिरी ऐतिहासिक अशीच आहे कारण ९० मीटर भाला फेकणारा तो भारताचा पहिलाच भालाफेक पटू ठरला असून अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ दुसरा भालाफेकपटू आहे. ९० मीटर भालाफेकणे हे कोणत्याही भालाफेकपटूचे स्वप्न असते तसे ते निरजचेही होते. आपल्या कारकीर्दीत ९० मीटर फेकण्याचे स्वप्न नीरज ने पाहिले आणि त्याने ते साकार केले आणि ते सत्यात उतरवले याबद्दल नीरजचे मनापासून अभिनंदन! याआधी त्याने अनेकदा प्रयत्न केला पण त्याला ९० मीटर भाला फेकत आला नव्हता मागील वर्षीच त्याने लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं होतं.
त्यात त्याने ८७.६६ मीटर अंतरावर भालाफेकला होता. त्याचा या ऐतिहासिक कामगिरीने देशातील १४४ कोटी जनतेची मान उंचावली आहे अर्थात अशी ऐतिहासिक कामगिरी करण्याची त्याची ही पहिली वेळ नाही याआधी तीन वर्षांपूर्वी नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये विक्रमी भालाफेक करून सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता. विशेष म्हणजे ऍथलॅटीक्समध्ये भारताला मिळालेले हे पहिलेच पदक होते. याआधी मिल्खा सिंग, पी टी उषा हे पदकाच्या जवळ पोहचूनही पदकाला गवसणी घालू शकले नव्हते ती किमया नीरजने करून दाखवली होती. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि दोनदा डायमंड लीग स्पर्धा जिंकणाऱ्या नीरज चोप्राचा जन्म २७ डिसेंबर १९९७ ला हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे शिक्षण चंदीगड येथे झाले. लहानपणापासून त्याला खेळाची आवड होती. त्याचे वजन ८० किलो होते त्यामुळे गावातील लोक त्याला सरपंच म्हणत.
कुस्ती, कबड्डी असे खेळ त्या गावातील मुले खेळत पण नीरजने मात्र भालाफेक या खेळाची निवड केली. विशेष म्हणजे त्याच्या गावात कोणीही भालाफेक हा खेळ खेळत नव्हते. भाला फेक हा खेळ जागतिक स्तरावर खेळला जातो हे देखील त्या गावातील काही लोकांना माहीत नव्हते त्यामुळे अनेकांनी त्याला भालाफेक सोडून कुस्ती हा खेळ खेळण्यास सांगितले. नीरजने मात्र त्याकडे दुर्लक्ष करून भालाफेकीतच करियर करायचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करायचे असा निश्चय केला. त्यासाठी त्याने तंदुरुस्तीवर भर दिला. खूप प्रयत्न करून स्वतःचे वजन कमी केले. भालाफेकीचा दररोज सराव केला. खेळात सातत्य ठेवले आणि दिवसेंदिवस चांगली कामगिरी केली. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चांगली कामगीरी केल्याने २०१६ साली दिल्लीत झालेल्या आशिआई स्पर्धेत भारतीय पथकात त्याची निवड झाली. आपल्या या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर २०१६ मध्येच पोलंडमध्ये झालेल्या २० वर्षाखालील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ८४. ४८ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले.
अंजु बॉबी जॉर्ज नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एथलॅटीक्समध्ये भारताला पदक मिळवून देणारा नीरज हा दुसराच भारतीय खेळाडू ठरला होता. एकाच वर्षात दोन महत्वाच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने त्याचे जगभर नाव झाले. या कामगिरीनंतर नीरजची भारतीय सेनेत ज्युनियर कंडिशन ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली. २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये त्याने ८८.०७ मीटर भाला फेकून राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. सतत चांगली कामगिरी करणाऱ्या नीरजला २०१९ मध्ये मात्र दुखापतीने घेरले. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली त्यामुळे त्याला काही महिने खेळापासून दूर राहावे लागले. २०२० साली जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यामुळे त्याच्या ऑलिम्पिक तयारीवरही मोठा परिणाम झाला असे असतानाही या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून द्यायचेच या निश्चयाने तो मैदानात उतरला.
पहिल्या प्रयत्नातच त्याने ८७.०३ मीटरवर भाला फेकून आघाडी मिळवली. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने ८७.५८ मीटर भाला फेकत पहिल्या प्रयत्नाच्या तुलनेत सुधारणा केली तिसऱ्या प्रयत्नात नीरजचा भाला ७६.७९ मीटरवर गेला. त्याचा चौथा आणि पाचवा प्रयत्न मात्र अवैध ठरला. मात्र बाकी स्पर्धकांची कामगिरी सर्वसाधारण राहिली त्यामुळे नीरजची आघाडी कायम राहिली. सहाव्या प्रयत्नात नीरजने ८४.२४ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याचे सुवर्णपदक निश्चित झाले की देशवासीयांनी दिवाळीच साजरी केली होती आजही तोच उत्साह देशवासीयांमध्ये आहे. ९० मीटर भाला फेकणारा भारतातील पहिला व जगातील दुसरा भालाफेकपटू ठरलेल्या निरजच्या यशाने देशातील १४४ कोटी देशवासियांची छाती अभिमानाने फुगली आहे. ९० मीटर भाला फेकण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या नीरज चोप्राचे मनापासून अभिनंदन!
श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५




