प्रतिनिधी – पी डी पाटील
एरंडोल – शहरातील महात्मा फुले स्मारकाजवळ माळीवाडा येथे जगताप कुटुंबीयांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रेरणेने सत्यशोधक समाज संघाचे तालुकाध्यक्ष हिलाल महाजन यांचे पुतणे व दिलीप महाजन यांचा मुलगा सत्यशोधक विक्की व सत्यशोधिका तृप्ती यांचा सत्यशोधक विवाह सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी दि. ३ मे २०२५ शनिवार रोजी मोठ्या थाटामाटात लावला.सर्वप्रथम खंडेरायाची तळी भरून विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. वधू-वर, आई-वडील व मामा-मामी यांच्या शुभहस्ते महात्मा बळीराजा, पंढरपूरचे दैवत विठ्ठल,संत सावता महाराज, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून एरंडोल नगरीचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, एरंडोल नगरीचे भावी आमदार भगवान महाजन, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष हेमंत माळी, अनिल महाजन, दिनेश महाजन, जिल्हा सचिव कविराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन यासह एरंडोल तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व सत्यशोधक कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वधू-वरांना महापुरुषांचे ग्रंथ व विवाह प्रमाणपत्र देण्यात आले.
सत्यशोधक विवाहप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सत्यशोधक समाजाची भूमिका मांडून राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे कार्य विशद करून अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर रहा असा संदेश दिला. सत्यशोधक दशरथ महाजन, भगवान महाजन व आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी महापुरुषांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांवर चालणे ही काळाची गरज आहे व जास्तीत जास्त सत्यशोधक विवाह लावुन भटमुक्त व्हावे असे प्रतिपादन केले. विवाह सोहळ्याचे सूत्रसंचलन शिवदास महाजन यांनी केले.सत्यशोधक विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




