Home महाराष्ट्र मराठी शाळाच दर्जेदार

मराठी शाळाच दर्जेदार

82

 

 

मार्च, एप्रिल महिन्यांमध्ये परीक्षा संपल्या की, विद्यार्थी निर्धास्त होतात कारण पुढील दीड दोन महिने त्यांच्यासाठी सुट्टीचे असतात. पण याच दोन महिन्यात पालकांना वेध लागतात ते आपल्या पाल्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेशाचे. दाखलपात्र विद्यार्थ्यांचे पालक म्हणजे ज्यांचे पाल्य पहिलीत दाखल होणार आहेत. अशा पालकांमध्ये तर मोठा संभ्रम असतो. आपल्या पाल्यांना मराठी शाळेत दाखल करायचे की इंग्रजी शाळेत दाखल करायचे याबाबत त्या पालकांमध्ये मोठा संभ्रम असतो. मुलांचे शिकण्याचे माध्यम मराठी असावे की इंग्रजी यावर मग कुटुंबात मोठा खल होतो. नातेवाईक, शेजार पाजारी, मित्रमंडळी अशा पालकांना वेगवेगळा सल्ला देत असतात अशा वेळी कोणता निर्णय घ्यावा असा मोठा पेच या पालकांना पडतो. इंग्रजी भाषा ज्ञान भाषा असल्याने इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो आणि खरी फसगत इथेच होते. इंग्रजी येण्यासाठी इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घ्यावे असे काही नाही मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनही मुल चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकू शिकू शकते. आज जे उच्चपदावर बसलेले नामवंत व्यक्ती आहेत ते सर्व मराठी माध्यमातूनच आणि सरकारी शाळेतूनच शिकले आहेत. खरे तर आज जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेच्या सरकारी शाळेतून दर्जेदार शिक्षण दिले जाते. आज मराठी माध्यमांच्या शाळा देखील कात टाकत आहेत. मराठी माध्यमांच्या सरकारी शाळेत गुणवान, प्रयोगशील, तंत्रस्नेही शिक्षक आहेत. सर्व शिक्षक डी एड, बी एड, एम एड असे उच्च गुणवत्ता प्राप्त आहेत. हे शिक्षक वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतात.
मराठी माध्यमांच्या शाळेत ई लर्निग, ॲक्टिव्हिटी बेस लार्निंग च्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. राज्यातील हजारो शाळा आय एस ओ नामांकन प्राप्त झाल्या आहेत. डिजिटल स्कूल, टॅब स्कूल या संकल्पना या शाळेतही रुजत आहेत. जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेच्या शाळेतही आता सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. गुणवत्तेच्या बाबतीतही या मराठी शाळा कोठे कमी नाहीत. ५ वी आणि ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सर्वाधिक विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीच असतात. नुकताच जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल घोषित झाला. यात जिल्हा परिषद शाळेतीलच सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. याशिवाय मंथन, प्रज्ञाशोध या स्पर्धा परीक्षेतही मराठी शाळांचाच डंका वाजतो.
जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेच्या सरकारी शाळेत मोफत शिक्षण दिले जाते. मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, मोफत शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहार, विविध शिष्यवृत्त्या मिळतात.
गुणवत्तेसह सह शालेय उपक्रमातही मराठी शाळा आघाडीवर असतात. मराठी शाळेत पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा मेळावा, सहल, वनभोजन, क्षेत्रभेट, मातृ – पितृ पूजन, आनंदी बाजार, स्नेहसंमेलन, क्रीडास्पर्धा, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, विविध स्पर्धा सर्व महापुरुषांच्या जयंत्या असे विविध उपक्रम राबवले जातात.
आता मराठी माध्यमांच्या सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थी दाखल होत आहेत. आता तर सर्वच मराठी शाळेत सीबीएएससी चा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे म्हणजे जे शिक्षण इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेत मिळते तेच शिक्षण आता मराठी माध्यमांच्या शाळेतही मिळणार आहे तरीही शहरातील पालकांना अजूनही इंग्रजी शाळेचा मोह सुटत नाही.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या झगमगाटाला भुलून पालक त्या शाळांच्या नादी लागत आहेत. या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शिक्षणाचा बाजार केला आहे . अगदी के जी च्या प्रवेशासाठीही लाखोंची देणगी घेतली जाते शिवाय इमारत निधी, ट्रस्ट निधी तसेच वर्षभर चालणारे वेगवेगळे कार्यक्रम या माध्यमातून पैसे उकळले जातात. पालकांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी या शाळा वेगवेगळे फंडे शोधत असतात. जर एखाद्या पालकांनी फी भरण्यास उशीर केला तर विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद करण्यापर्यंत मजल या शाळांची जाते. कोरोना काळात फी भरता न आलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप काही इंग्रजी शाळांनी केले आहे.
अनेक इंग्रजी शाळा शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. २००३ मध्ये उच्च न्यायलयाने दिलेल्या निकालात शैक्षणिक साहित्य शाळेकडूनच किंवा ठराविक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही असे म्हंटले आहे. सरकारनेही वेळोवेळी तसे आदेश काढले आहेत पण या शाळांना सरकारी आदेशाचा आणि न्यायालयाच्या निकालाचा विसर पडला आहे न्यायालये व सरकारला न जुमानता आपली शैक्षणिक दुकानदारी चालवणाऱ्या या शाळांना चाप लावायचा असेल तर पालकांनी आपल्या पाल्यांना या शाळेत दाखल करण्याऐवजी मराठी माध्यमांच्या शाळेत दखल करावे.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here