महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई हे लवकरच भारताचे नवे मुख्य सर न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून १४ मे पासून ते भारताचे मुख्य सर न्यायाधीश म्हणून सूत्र हाती घेतील. विद्यमान सर न्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे ५२ वे सर न्यायाधीश असतील. याआधी न्या. प्रल्हाद गजेंद्रगडकर, न्या. यशवंत चंद्रचूड, न्या. सॅम भरूचा, न्या. सरोश कपाडिया, न्यान शरद बोबडे, न्या. उदय लळीत, आणि न्या. धनंजय चंद्रचूड या सात मराठी न्यायमूर्तींना हा मान मिळाला आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांना भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या पुढील महिन्यात १४ तारखेला सर न्यायाधीशपदाची शपथ देतील त्यावेळी इतिहास रचला जाईल. भारताचे सर न्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई हे केवळ दुसरेच दलीत न्यायमूर्ती आहेत याआधी के जी बालकृष्णन पहिले दलीत सर न्यायाधीश बनले होते. न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाच्या सर न्यायाधीशपदी नियुक्ती होणे हा महाराष्ट्राचा बहुमान होय कारण ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. रीपाई नेते व माजी राज्यपाल रा सू गवई यांचे सुपुत्र असलेले न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावतीत झाला असून त्यांचे प्राथमिक व कायद्याचे शिक्षण मुंबईत झाले. मुंबईतच त्यांनी वकिली सुरू केली. २००५ मध्ये त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. वकील आणि न्यायाधीश म्हणून त्यांना दांडगा अनुभव आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पणजी येथे त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केले आहे. २४ मे २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून नियुक्ती झाली. अनेक ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण निकाल न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिले आहेत. नोटबंदी वैध ठरवणारा २०२३ चा निर्णय त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाचा निर्णय ठरला. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम हटवण्याचा निर्णय देणाऱ्या घटना पिठाचा ते भाग होते. प्रशांत भूषण अवमान प्रकरणात निकाल देणाऱ्या खंडपीठाचाही ते भाग होते. कायद्याचे सखोल ज्ञान, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य, नेतृत्वगुण, वंचित आणि उपेक्षितांबद्दलचा कळवला या गुणांमुळे ते आधीच लोकप्रिय आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या निवडीचा मराठी माणसांना अभिमान आहे. न्यायालय आणि न्यायालयीन कामकाज याविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अजूनही काही प्रश्न आहेत. न्यायालयात जलद न्याय मिळत नाही, सर्वसामान्य नागरिकांनी न्यायालयाची पायरी चढूच नये अशी भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे. सर्वसामान्य नागरिकांची ही भावना खोटी ठरवून जलद न्याय देण्याबरोबरच न्यायव्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास दृढ करण्याची जबाबदारी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर आहे त्यात ते यशस्वी होतील यात शंका नाही. देशाचे नवे सर न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे मनापासून अभिनंदन!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५




