Home लेख प्रशासकीय विद्यापीठ,डॉ पुरूषोत्तम भापकर!

प्रशासकीय विद्यापीठ,डॉ पुरूषोत्तम भापकर!

99

 

सांप्रत राजकीय,शासकीय, प्रशासकीय परिस्थितीवर मी रोज लेखन करतो. जे मला दिसते, जे मला कळते, जे मला आवडते, जे मला खटकते. आमदार, खासदार मंत्री ची मुलाहिजा न ठेवता, त्यांच्या अब्रूची तमा न बाळगता. माझी खात्री झाली आहे हे अब्रू नसलेले चोर आहेत.जर चोराला चोर म्हटले तर बिघडले कुठे?जर नाही म्हटले तर बिघडते.ते बेशरमपणे चोरी करतात. त्यांना वाटते, आमच्यावर कोणाचेही लक्ष नाही. आमच्या विरोधात पोलीस आणि कोर्ट सुद्धा तक्रार घेत नाही.सद्या तरी त्यांची रायली चाललेली आहे. बेलगाम, बेमुर्वत, बेशरम.
माझे लेख जळगाव मधील संपादक सुभाष वाघ व्यतिरिक्त कोणीही संपादक छापत नसले तरीही औरंगाबाद, अकोला,पुणे,ठाणे ,नगर चे संपादक छापतात. कदाचित त्यांना या चोरांकडून चोरीतील हिस्सा मिळत नसेल. नक्कीच. मला खात्री आहे, चांगले लोक आहेत, चांगले संपादक आहेत. माझ्या जळगावला नसले म्हणून काय झाले? जळगाव म्हणजे हिंदुस्थान नाही. येथे भ्रष्टाचाराचा शाप आहे.
औरंगाबाद मधील बुद्धिमान , उच्चशिक्षित प्रामाणिक, संवेदनशील लोक लेख वाचतात. दखल घेतात. अभिप्राय देतात.माझा उत्साह वाढवतात. मला विश्वास वाटतो, चार लोक सहज मिळतील शेवटचा खांदा द्यायला.
औरंगाबाद मधील बुद्धिमान, उच्चशिक्षित, प्रामाणिक, संवेदनशील व्यक्ती माजी न्यायाधीश श्री विलासराव काबरा यांचे पर्यंत माझे विचार पोहचले. रूजले. त्यांनी बुद्धिमान, उच्चशिक्षित, प्रामाणिक, संवेदनशील असे ९१ वर्षाचे तरूण तुर्क श्री शेषराव चव्हाण यांची भेट घडवली. आमची चर्चा झाली.खंत व्यक्त केली.समाजातील बुद्धिमान उच्चशिक्षित प्रामाणिक संवेदनशील लोक राजकारणापासून दूर का?चोर, डाकू, लुच्चे, लफंगे आमदार खासदार कसे निवडून येतात? सरकार मधे मंत्री, मुख्यमंत्री कसे बनतात?
त्यांचा माझा विषय एकच. ठरल्याप्रमाणे सहा एप्रिल ला औरंगाबाद येथे बैठक घेतली.सर्व क्षेत्रातील, सर्व धर्मातील असे ठराविक वीस बुद्धिमान उच्चशिक्षित प्रामाणिक संवेदनशील सदस्य बोलवले.मला आमंत्रित केले.मी जळगावचा.आणि एड शिवाजीराव ढमाले साहेब,नगरचे.
तेथे काबरा साहेबांनी विशेष आमंत्रित माजी सीईओ,माजी कलेक्टर,माजी आयुक्त डॉ पुरूषोत्तम भापकर (पीएचडी)यांना उच्चपदस्थ अधिकारी म्हणून बोलवले होते. डॉक्टर, वकिल, प्रोफेसर, प्राचार्य, शिक्षणाधिकारी,राजकीय पदाधिकारी हजर होते. एमजीएम औरंगाबाद चे चेअरमन श्री बाबुराव कदम साहेब जबाबदारीने अध्यक्ष होते.
डॉ पुरूषोत्तम भापकर साहेब आयईएस अधिकारी यांनी निवृत्ती नंतर अशा बैठकीत हजर होणे म्हणजे माझे स्वप्न साकार होणे.हेच तर मला अपेक्षित होते. प्रामाणिक प्रशासकिय अधिकाऱ्यांनी आता राजकारणाची सुत्रे हाती घेतली पाहिजे.
डॉ पुरूषोत्तम भापकर हे नगर जिल्ह्यातलं सालवडगावचे रहिवासी. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले,आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी बनलेले.हा फक्त योगायोग नाही तर ती काळाची गरज आहे.ती गरज साहेबांनी पुरी केली. एम ए. एल एल बी, पीएचडी, आयईएस उत्तिर्ण अधिकारी खरोखरच प्रशासकीय सेवेत उत्तिर्ण झाले आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले जमीनीवरचे काम आजही जळगाव , पारोळा, नंदुरबार, धडगाव, धुळे, गडचिरोली, भामरागड, परभणी, पुणे, राहुरी औरंगाबाद येथे लोकांच्या, शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या लक्षात आहे. त्यांनी तर थेट माझ्या पारोळा येथे तहसीलदार म्हणून प्रोबेशन पिरीयड मधे ठसा उमटवला आहे. माझे गांवाचे नांव इंदवे सांगताच संपूर्ण इतिहास मला कथन केला. मी आश्चर्यचकित झालो. असा एक अधिकारी महाराष्ट्राच्या पश्चिम टोकापासून तर पुर्व टोकापर्यंत सेवा दिली. निवृत्त झाले. आजही तितक्याच उत्साहाने आमच्या समोर आमचे आमचे मार्गदर्शक म्हणून आमच्या समोर आम्ही पाहिले. आणि मला विश्वास वाटला तो खरा ठरला.अशी माणसे एकत्र आली तर आम्ही राजकारण बदलवू शकतो. प्रशासन बदलवू शकतो. साठी उलटली म्हणून काय झाले! उलट याच वयात बुद्धी, ज्ञानासोबच अनुभवाचा तजुर्बा असतो. जेष्ठ माणूस म्हणजे म्हातारा किंवा एजबार नसतोच मुळी. फक्त तो प्रामाणिक असला पाहिजे. आपल्या बुद्धीचे, ज्ञानाचे, अनुभवाचे भांडवल घेऊन तरूणांना मागे टाकेल असे काम करू शकतो. ९१ वर्षाचे श्री शेषराव चव्हाण, ८५ वर्षाचे श्री बाबुराव कदम यांचा कामाचा उत्साह पाहाता मी तर त्यांचे समोर विद्यार्थी आहे. आणि डॉ पुरूषोत्तम भापकर हे तर दस्तुरखुद्द प्रशासनाचे विद्यापीठ आहे.
डॉक्टर पुरूषोत्तम भापकर नामक विद्यापीठाचा मी तर विद्यार्थी बनलोच पण या चालते फिरते विद्यापीठाचा लाभ माझ्या जळगावला होईल, असा मी प्रयत्न करीत आहे.
यमाने युद्धिष्ठीरला प्रश्न केला कि, धर्म म्हणजे काय? युधिष्ठिर उत्तरले, ज्या वाटेने सत्पुरुष जातात ती पायवाट म्हणजे धर्म. मी म्हणतो, ज्या वाटेने प्रामाणिक अधिकारी जातो ते खरे प्रशासन. ती पायवाट डॉ पुरूषोत्तम भापकर यांनी बनवलेली आहे.
मी धन्य झालो. सज्जनांचे वाटे, सज्जन भेटे.

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
मो.९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here