Home अमरावती प्राचार्या मंदाकिनी वसंतराव निमकर एक प्रभावी व्यक्तिमत्व

प्राचार्या मंदाकिनी वसंतराव निमकर एक प्रभावी व्यक्तिमत्व

95

सामाजिक कार्यकर्त्या विद्यार्थीप्रिय प्राचार्या मंदाकिनी वसंतराव निमकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने विशेष लेख…..

  महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यापासून प्रेरणा घेऊन समाज प्रबोधन व समाज परिवर्तनाच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन कार्य करणाऱ्या महिलांमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षिका सामाजिक कार्यकर्त्या प्राचार्या मंदाकिनीताई वसंतराव निमकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. 

         महाराष्ट्रामध्ये संत्री मोसंबी साठी कॅलिफोर्निया म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या शेंदूरजना घाट येथील स्व. श्री महादेवराव व स्व. मुक्ताबाई टाकरखेडे ह्या खानदानी व पिढीजात श्रीमंत सुसंस्कृत कुटुंबात १ एप्रिल १९६३ रोजी मंदाकिनी यांचा जन्म झाला. त्यांचे काका स्व. श्री. पी. टी. टाकरखेडे हे १९५० मध्ये बनारस विद्यापीठातून (म्हैसूर स्टेट मधून) एम. एस. सी. झाले होते. ते जनता एज्यूकेशन सोसायटीच्या फाऊंडर मधील एक होते.आपल्या गावातील मुला-मुलींनी शिक्षण घेऊन साक्षर-सुशिक्षित व्हावे म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलियामधील नोकरी नाकारून गावातच जनता एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शाळा सुरू केली. त्याच शाळेत मंदाकिनी यांचे प्राथमिक व माध्यमिक पर्यंतचे शिक्षण झाले. वरूड येथील महात्मा फुले (सितारामजी चौधरी) महाविद्यालयात बी. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, संभाजी नगर येथून बी.एड्. ची पदवी प्राप्त केली.

         अचलपूर तहसिलमधील काकडा येथील स्व.वासुदेवराव तुकारामजी निमकर व स्व. सुमनबाई वासुदेवराव निमकर ह्या सुशिक्षित कुटुंबातील डॉ. वसंतराव निमकर जे बी.ए.एम.एस. (आयुर्वेद सर्जन) होते. त्यांच्या सोबत मंदाकिनी यांचा १० जुलै १९८९ रोजी विवाह झाला;तेव्हा अमरावती ही मंदाकिनीताईची कर्मभूमी झाली.

       शिवशक्तीनगर,अमरावती येथील श्रीमती मंदाकिनीताई वसंतराव निमकर यांना बालपणापासूनच आई-

वडिलांकडून सत्कर्माचे पाठ मिळाले .

मुक्ताबाई माता । महादेव पिता ॥

सुसंस्कार दाता । माता पिता ॥

       म्हणूनच लहानपणापासूनच सत्कर्म करण्याची त्यांना आवड निर्माण झाली होती.आळस हा त्यांचा शत्रू होता. शिक्षिका झाले तर विद्यार्थी प्रबोधनातून देशाचे आदर्श नागरिक विद्यार्थ्यांना बनविता येईल. समाजप्रबोधन करता येईल. समाज घडविता येईल यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी खटेश्वर कन्या हायस्कूल बोरी अरब, कालिका शिक्षण संस्थाचे आदर्श हायस्कूल, धानोरा गुरव, अहिल्याबाई होळकर कन्या विद्यालय, आसेगाव (पूर्णा), निर्मळ हायस्कूल, वलगांव येथे काही काळ शिक्षिकेची नोकरी पत्करून तेथील विद्यार्थ्यांना घडविले. त्यानंतर महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय, मुधोळकर पेठ अमरावती येथे सप्टेंबर १९९० मध्ये शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. आपली संस्था आपली शाळा, आपले विद्यार्थी या जिव्हाळ्याने व आपुलकीने त्या अध्यापन कार्यात मग्न झाल्या त्यामुळेच त्या विद्यार्थीप्रिय झाल्या.

        सन २०१४-२०१५ मध्ये सहाय्यक शिक्षिके च्या पदावरून मुख्याध्यापिका म्हणून नियमाने पदोन्नतीसाठी पात्र असताना संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षांनी बढतीच्या आदेशाऐवजी मानसिक छळ केल्याचे मंदाकिनी टाकरखेडे-निमकर यांनी आपबिती कथन केली. एवढेच नव्हे तर निलंबित करून अन्यायाचा कळसच गाठला. त्यानंतर कोर्ट-कचेऱ्या करून न्याय मिळाला, अशा प्रकारचा पदोन्नती संदर्भात अन्याय कोणत्याही शिक्षण संस्थेने शिक्षकांवर करू नये असे मला वाटते. सन २०१९ मध्ये डॉ.वसंतराव निमकर हे महात्मा फुले शिक्षण समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर मंदाकिनी टाकरखेडे (निमकर) ह्या मुख्याध्यापिका/प्राचार्यापदी रुजू झाल्या. सर्वात प्रथम जर त्यांनी कोणते कार्य केले असेल तर शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले व त्यात त्या यशस्वी झाल्या. शाळेची संख्यात्मक व गुणात्मक प्रगती साध्य करता आली. मंदाकिनीताई यांना खेळ, क्रिडा, नाट्य, वक्तृत्व, संभाषण यांची उपजत आवड होती.त्यांनी विद्यार्थीदशेत लंगडी,खो-खो, व्हॉलीबॉल, भालाफेक, चक्रफेक, गोळाफेक, उंच उडी, लंगड झाप उडी, कबड्डी, धावण्याच्या स्पर्धेत जिल्हास्तरावरील शिल्ड व बक्षिसे मिळवून दिली. त्याचाच परिणाम म्हणून जनता हायस्कूल शेंदुरजना (घाट) च्या सन् २०१५ च्या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थिनी मंदाकिनी टाकरखेडे यांचा प्रमुख पाहुणे ह्या नात्याने शाल- श्रीफळ- पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा हा गौरवच म्हणावा लागेल .

आदर्श शिक्षिका । ज्ञानाचा सुगंध ।

मंदिरात गंध । चोहिकडे ॥

सुसंस्कार देई । मंदाकिनी ताई ।

बनून त्या आई । विद्यार्थ्यांच्या ॥

         विद्यार्थ्यांची शिक्षिका बनून अध्यापन करणे आणि विद्यार्थ्यांची आई बनून मार्गदर्शन करणे यात फरक आहे, तो त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांची आई म्हणून अध्यापन व मार्गदर्शन केले त्यामुळे आज हजारो विद्यार्थी त्यांच्यामुळे घडले आणि आज विविध क्षेत्रात फार उच्च पदावर त्यांचे विद्यार्थी पोहोचले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या क्रांतिकार्यापासून प्रेरणा घेऊन आर्थिकदृष्ट्या दारिद्रय रेषेखालील मुला-मुलींनी शिक्षण घ्यावे म्हणून त्यांना गणवेश देणे, त्यांची शालेय फी भरणे यासह इतरही शैक्षणिक मदत करून मंदाकिनी निमकर यांनी सामाजिक दायित्व पार पाडले,त्यातून त्यांचा दातृत्व गुण दिसून येतो. शाळेतील विद्यार्थ्यात भाषण कौशल्य निर्माण करणे, अभ्यासपूरक व अभ्यासेतर कार्यक्रमातून विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना प्रकट करण्याची संधी देणे तसेच महिलांचे हळदीकुंकू, वृक्षारोपणासह सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा सहभाग असे आणि अशा कार्यक्रमाच्या आयोजनात सढळ हस्ते त्या मदत करीत असत.

       प्राचार्या मंदाकिनी निमकर यांच्यातील समाजसेवेची प्रचिती कोरोना काळात अनेकांना आली. त्यांचे चिरंजीव श्री महेश निमकर (एम. कॉम.) ह्यांनी वडील डॉ. वसंतराव निमकर यांचा समाजसेवेचा वारसा जपला. कोरोना काळात अनेकांसमोर खाण्या-पिण्याची समस्या निर्माण झाली होती. तेव्हा स्वतःच्या पैशाने एक गोणी साखर, चार-पाच किलो चहापत्ती, दोन पोते बिस्कीट पुडे विकत आणले.दररोज २० लिटर दूध तापवणे.चारशे-पाचशे कप चहा करणे, कॅनमध्ये भरणे इत्यादी कामे मंदाकिनी ताईंनी केली. सोबतच मसाला दूध, मसालेदार ताक, मसालेदार चहाचे वाटप गरजवंतांना दररोज केले जायचे. अनेकांना जेवणाची पाकिटे देण्याचे कार्य सतत तीन-चार महिने त्यांनी केले.या त्यांच्या सामाजिक निःस्पृह सेवेबद्दल तहसिलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडून श्री महेश निमकर यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला, त्यावेळी श्री महेश निमकर यांनी हा सत्कार माझा नसून माझ्या आईचा सत्कार आहे कारण आईने सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कोरोना काळात हे कार्य केले आहे आईच्या प्रेरणामुळेच मी हे सर्व कार्य करू शकलो.”असे उद्गार काढले होते.

         प्राचार्या मंदाकिनी निमकर या Heart fullness ची म्हणजेच पूर्वीचा ‘सहजमार्ग, नैसर्गिक मार्ग’च्या अभ्यासक आहेत. सत्संगातून माणूस घडतो म्हणून (S.R.C.M.)चेन्नईच्या सदस्य आहेत. त्या ‘कान्हा शांती वनम्’ (हैद्राबाद) येथे जातात.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी “माणूस द्या मज माणूस द्या” असे म्हटले.मानवी जीवन हे इतरांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी आहे.चांगले विचार हे दगडावर पेरले तरी, कधी ना कधी ते उगवल्याशिवाय राहत नाहीत. तसेच मानवाच्या सत्कार्याची दखल घेणारे असतातच. त्यानुसार प्राचार्या मंदाकिनी निमकर यांच्या विविधांगी विधायक कार्याची दखल घेऊन शिवसेना (उबाठा) चे वतीने १० ऑगस्ट २०२४ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे स्व. मिनाताई ठाकरे स्मृती प्रित्यर्थ ‘स्त्री-शक्ती सन्मान पुरस्कार’ मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सत्कार करण्यात आला.हा त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग म्हणावा लागेल.

       प्राचार्या मंदाकिनी निमकर यांचा विविध संस्था व संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यात उपेक्षित समाज महासंघ,वऱ्हाड विकास ,२१ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन (मोर्शी),श्री शंकरराव सोनार एज्युकेशन सोसायटी,

करजगाव,श्री माळी वैभव, नागपूर, महात्मा फुले विद्यालय मुधोळकर पेठ, अमरावती, जनाबाई नाथे विद्यालय, काकडा, क्रांतिज्योती ब्रिगेड संघटना, सामाजिक परिवर्तन परिषद अशा अनेक संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

         डॉ.वसंतराव निमकर हे चॅरिटी कोर्टाच्या निर्णयानुसार सन् २०१३ पासून महात्मा फुले शिक्षण समिती, मुधोळकरचे अध्यक्ष होते;पण ते सन २०१९ मध्ये जाहीर झाले. त्यांनी १९ मार्च २०२९ पर्यंत अध्यक्षपद भूषविले. त्यांचा २० मार्च २०२१ रोजी दुःखद निधन झाले.

        श्रीमती मंदाकिनी निमकर या महात्मा फुले विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय येथील मुख्याध्यापिका / प्राचार्या पदावरून ३१ मार्च २०२१ ला सेवानिवृत्त झाल्या. महात्मा फुले शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत.

      प्राचार्या मंदाकिनी निमकर यांच्या अध्यात्माच्या संकल्पना व्यापक स्वरूपाच्या आणि पुरोगामी विचाराच्या आहेत. पोथीनिष्ठ व भगवे वस्त्र परिधान करून सोवळं मानणारे अध्यात्म त्यांना मान्य नाही. उलट वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांनी घालून दिलेली दशसुत्री त्यांना मान्य आहे .” भुकेलेल्यांना अन्न, बेघरांना निवारा, तहानलेल्यांना गरजवंतांना मदतीचा हात देणे.” हाच खरा धर्म आहे. “मानवता हाच खर्म” असे त्या मानतात.

         प्राचार्या मंदाकिनी निमकर यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदं भूषविली. त्यात त्यांनी मनस्वी कार्य केले. मान-सन्मानाची अपेक्षा केली नाही. त्यांच्या मनाला पटलं, त्या सद्‌सदविवेक बुद्धिनुसार त्यांनी सत्कार्याला वाहून घेतले. तन-मन-धन अर्पण करीत सेवा देत राहिल्या. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत रचनात्मक कार्य करण्याची त्यांची जिद्द, चिकाटी व सतत परिश्रम हे इतरांना प्रेरणा देणारे आहे. 

       सावित्रीच्या या लेकीपासून अनेक महिलांना सत्कार्य करायची प्रेरणा मिळेल यात शंका नाही, असे त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व आहे.

       प्राचार्य मंदाकिनीताई निमकर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतो. पुढील सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो, ही मनस्वी सदिच्छा.

 ✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(रुक्मिणी नगर,अमरावती) भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here