Home महाराष्ट्र वणी शास.औ. प्र. संस्थेतील रासेयो श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

वणी शास.औ. प्र. संस्थेतील रासेयो श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

72

▪️ रासेयोचे श्रमसंस्कार शिबिर म्हणजे ग्राम जीवनाशी नाते जोडणारे प्रभावी माध्यम – बंडोपंत बोढेकर 

✒️वणी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वनी(दि.13फेब्रुवारी):-वणी येथील कवीवर्य रामजी शेवाळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संस्थेच्या परिसरात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी. यु. राजुरकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्राचार्य संजय तेलतुमडे, चंद्रपूर औ. प्र. संस्थेचे रासेयो कार्यक्रम अधिकारी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, गटनिदेशक नामदेव गेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून युवा वर्गावर श्रमाचे संस्कार होतात. त्यांच्यामध्ये लोकसेवेचा विचार रुजतो. आपल्यात असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेण्याची वृत्ती त्यांच्यात निर्माण होते. आपल्या व्यवसाय कौशल्याचा उपयोग ग्राम सुधारण्यासाठी होऊ शकतो, हा आत्मविश्वास निर्माण होतो. ग्रामाशी नाते जोडणारे रासेयोचे श्रमसंस्कार शिबिर हे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले. प्राचार्य संजय तेलतुमडे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे आणि त्यांनी स्वेच्छेने केलेल्या विविध कार्याचे मन:पूर्वक कौतुक केले. गटनिदेशक नामदेव गेडकर यांनी आयटीआय नंतर काय?, रोजगारांच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षेची माहिती, या संबंधाने अभ्यासपूर्ण विवेचन केले. जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी श्री. राजुरकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या व्यवसायात अधिक कौशल्य प्राप्त करावे. व्यसनापासून दूर राहावे ,असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

  शिबिराचा संपुर्ण आढावा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शशिकांत लेनगुळे यांनी घेतला आणि शिबिराच्या माध्यमातून झालेल्या कार्याची माहिती दिली.

      स्वयंसेवक कु. जयश्री देवाळकर व गौरव शिवरकर यांनी शिबिरात मिळालेले स्वानुभव व्यक्त केले. सूत्रसंचालन स्वयंसेवक कु. दामिनी परचाके यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी तथा गटनिदेशक पी. एम. बलकी यांनी केले. ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या समूहगीत गायनाने तसेच सहभोजनाने शिबिराचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

     या शिबिरात संस्थेत स्वच्छतेची कामे, इलेक्ट्रिक वेल्डिंग, प्लंबिंग, सुतारकाम पेंटिंग संबंधित कामे, वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण ,सुशोभीकरण आदी कामे शिबिर स्वयंसेवकांनी उस्फुर्तरित्या पूर्ण केले. प्रातिनिधिक स्वरूपात पाच 

प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर संस्थेच्या वतीने बंडोपंत बोढेकर यांना प्राचार्य संजय तेलतुमडे यांनी मानवस्त्र व श्रीफळ देऊन सन्मानित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here