Home खेलकुद  क्रीडाविश्वाचा चालता बोलता ज्ञानकोष हरपला….

क्रीडाविश्वाचा चालता बोलता ज्ञानकोष हरपला….

84

ज्यांचे क्रीडा विषयक लेख वाचत मी लहानाचा मोठा झालो. ज्यांच्या लेखाने माझे क्रिकेट विश्वातील ज्ञान वृद्धिंगत झाले. ज्यांच्या लेखणीतून प्रेरणा घेऊन मी क्रीडा विषयक लेख लिहू लागलो असे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, लेखक, स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी गुरुवारी ( ६ फेब्रुवारी ) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालता बोलता ज्ञानकोष हरपला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते त्या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट देखील लिहिली होती मात्र ते असे इतक्या लवकर जातील असे वाटले नव्हते. शालेय जीवनात असतानाच द्वारकानाथ संझगिरी हे नाव तोंडपाठ झाले होते. भारतीय संघाचा क्रिकेट सामना असला की त्या दिवशी सकाळी आणि क्रिकेट सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सामन्यावर विश्लेषण करणारे वर्तमानपत्रातील त्यांचे लेख वाचणे हा माझा आवडता उद्योग. त्यांचे क्रिकेट वरील ज्ञान तर अफलातूनच होते. सध्याच्या क्रिकेटवर भाष्य करतानाच ते आपल्याला भूतकाळात घेऊन जात अगदी पन्नास वर्षांपूर्वीच्या सामन्याचा किंवा खेळाडूंचा संदर्भ त्यांच्या लेखात असे. त्यांचा इतके क्रिकेटचे ज्ञान असलेले लेखक विरळच.

केवळ वर्तमानपत्रातच नाही तर दूरचित्रवाणीवर देखील ते क्रिकेटचे समीक्षण करत. जवळपास पाच दशके क्रिकेटवर लेखन करून क्रिकेटप्रेमींना नवी दृष्टी देणाऱ्या द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९५० रोजी मुंबईतील दादर येथे झाला. मुंबईत शालेय शिक्षण घेतल्यावर त्यांनी माटुंग्याच्या व्हिक्टोरिया ज्युबली कॉलेजमधून इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले. इंजिीअरिंग केल्यावर त्यांनी मुंबई महपालिकेत अभियंता म्हणून नोकरीही केली पण क्रिकेट व साहित्यातील रूचीमुळे त्यांच्यातील क्रिकेट समीक्षक घडवला. क्रिकेटवर त्यांनी केलेले लेखन विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होऊ लागले. त्यांच्या लिखाणाला क्रिकेटप्रेमींनी नेहमीच पसंतीची दाद दिली. केवळ मराठीच नाही तर इंग्रजी आणि हिंदी दैनिकातून आणि साप्ताहिकातूनही ते लिहू लागले. त्यांनी अनेक क्रीडापटुंच्या मुलाखती घेतल्या. क्रीडापटुंची मुलाखत घेण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. ते क्रीडापटुंची मुलाखत घेत आहेत असे वाटतच नव्हते त्यांची मुलखात म्हणजे गप्पांचा कार्यक्रमच वाटत असे इतके मनमोकळेपणे क्रीडापटू त्यांच्यापुढे व्यक्त होत. केवळ क्रिकेट किंवा क्रीडाविषयकच नव्हे तर चित्रपट, प्रवास, पर्यटन आणि सामाजिक विषयांवर देखील त्यांनी विपुल लेखन केले . द्वारकानाथ संझगिरी यांनी १९८३ पासून २०११ पर्यंत झालेल्या सर्व क्रिकेटच्या विश्वचषकांचे त्या देशात जाऊन वार्तांकन केले. द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेटर्स आणि चित्रपट तारे तारकांवर अनेक कार्यक्रम केले.

त्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा तेच सांभाळीत. द्वारकानाथ संझगिरी यांनी जवळपास ५० पुस्तके लिहिली. त्यातील शतकात एकच सचिन, चिरंजीव सचिन, दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी, खेलंदाजी, बोलंदाजी, चॅम्पियन्स, चित्तवेधक विश्वचषक २०२३, क्रिकेट कॉकटेल, क्रिकेट वर्ल्डकप हाय लाईट, कथा विश्वचषकाच्या, लंडन ऑलिम्पिक, पॉवर प्ले, स्टंप व्हिजन, संवाद लिजेंडशी, क्रिकेट गाथा, थर्ड अंपायर, इंग्लिश ब्रेकफास्ट ही त्यांची पुस्तके क्रीडाप्रेमींना खूप आवडली. द्वारकानाथ संझगिरी यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात दत्ता हलसगीकर साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य संघाचा उत्कृष्ट लेखक पुरस्कार, विद्याधर गोखले साहित्य पुरस्कार, क्रीडाविषयक लेखनासाठी विश्वनाथ वाबळे पुरस्कार, वृत्तपत्र लेखन संघाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांच्या निधनाने क्रीडाविश्वासह साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे विविधांगी लेखन कायम स्मरणात राहील. स्तंभलेखक, समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here