रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.4फेब्रुवारी):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात महिला आरोग्य तपासणी, दंत तपासणी तथा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे होते. शिबिरात पार्क हास्पिटल तुकूम चे डॉ. किरण पटेल (वानखेडे), इंगळे नर्सिंग होम च्या डॉ . पल्लवी इंगळे, दंत रोग चिकीत्सक डॉ. भावना मोहुर्ले, डॉ. पुजा टोंगे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संकलन विभागाचे डॉ. चौधरी आदींची उपस्थिती होती. तसेच पार्क हास्पिटलच्या वतीने संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची बीपी व शुगर तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासयोचे मुख्य कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी केले. यावेळी डॉ . इंगळे म्हणाल्या , आरोग्य ही आपली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला हे लक्षात घेऊन युवतींनी नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे, जेणेकरून संभाव्य आरोग्य धोके टाळता येतात , असे प्रतिपादन त्यांनी केले.
या शिबिरात १७ प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले तसेच १२७ विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी डॉ . किरण पटेल व डॉ. इंगळे यांनी केली. दंत चिकित्सक डॉ . भावना मोहुर्ले आणि डॉ. पुजा टोंगे यांनी एकूण ९६ विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून त्यापैकी काही विद्यार्थ्यांवर मौखिक उपचार सुचविले.
दुसऱ्या सत्रात जलसंवर्धन आणि पर्यावरण या विषयावर डॉ. प्रा. योगेश दुधपचारे यांनी भविष्यात निर्माण होणारे पाण्याचे दुर्भिक्ष आणि त्यावर कराव्या लागणा-या उपाययोजना या संबंधाने विचार व्यक्त केले. तर आपत्ती व्यवस्थापन या विषयावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी प्रात्यक्षिकांद्वारे हा विषय शिबिरार्थ्यांना समजावून सांगितला. पावसाळ्यात निर्माण होणारी होणारी पूर परिस्थिती, वादळ या आपत्तींना तोंड देण्यासाठी आपण कशी उपाययोजना करावी या संबंधाने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. वाहतूक सुरक्षितता आणि युवकांची जबाबदारी या विषयावर वाहतूक विभागाचे एपीआय श्री. सोनोणे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थांना वाहतुकीचे नियम , गावात घडलेले भयंकर अपघात ,झालेली मनुष्यहानी या संदर्भात विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले.
शिबिराचा दरम्यान रोज सकाळच्या सत्रात संस्था परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर दुपारनंतर मेंटेनन्स अभियान राबविण्यात आले. सर्वच समितींनी उत्साहात दिलेल्या कार्यात सहभाग नोंदविला.




