अमरावती (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनातील कठीण विषयासंबंधीची न्यूनगंडाची भावना मनातून काढून तेथे आत्मविश्वास निर्माण करावा, आत्मविश्वासामुळेच हजारो गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. कोणत्याही विषयाचा अभ्यास दीर्घकाल लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनवाचन, मौनवाचन,नेत्रवाचन व चित्रवाचन करावे. अभ्यास करताना मनाचे केंद्रिकरण आवश्यक आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनावर विजय मिळवावा. सर्व विषयांचा अभ्यास समान करावा.अभ्यास करताना मोबाईल, टी.व्ही. बंद करावा. सर्व विषयांच्या मागील वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवून त्या उत्तरपत्रिका विषय शिक्षकांकडून तपासून घ्याव्या. पेपर सोडविताना त्यांनी दिलेल्या गुणवृद्धिच्या सूचनांचे आचरण करावे. पेपर सोडवताना वेळेचे भान असणे आवश्यक आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर खूप येत असले तरी गुण बघूनच लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे सोडविल्यास तीन तासाचा पेपर 165 मिनिटात सुटेल व शेवटच्या 15 मिनिटांमध्ये स्वतःची पूर्ण उत्तरपत्रिका बघून त्यात राहिलेल्या त्रुटी पूर्ण करता येईल.असे केल्यास प्रत्येक विद्यार्थी उत्तम गुणांचा धनी होऊ शकतो.”असे प्रतिपादन विद्यार्थीप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी केले.
ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित श्री रामकृष्ण क्रीडा आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती येथे कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती तर्फे दि.11 जानेवारी 2025 रोजी संपन्न झालेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासविषयक कार्यशाळेत “आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला “,” परीक्षेला जाता जाता ” व ” मराठी विषयाची आदर्श अध्ययन माला” या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना विचार व्यक्त करीत होते.
या ” विद्यार्थ्यांची अभ्यास विषयक कार्यशाळे” चे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रा.विजय वि. नरवणे होते. प्रमुख अतिथी प्रा.शिशिर गढिकर, प्रा.बाळूराम दांडेगावकर, प्रा. कु. कांचन सोळंके, प्रा. कु. अश्विनी सोनटक्के, प्रा. कु. एस. आर. सावतकर, प्रा. कु. योगीता कोरडदेव, सौ.उज्ज्वला तायडे मॅडम, सौ.मंगला महात्मे मॅडम,श्री श्रीरंग साधू सर, कु.गायत्री बांते मॅडम, श्री आनंद महाजन सर होते.
विद्यार्थीप्रबोधनकर्ते प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचा सत्कार अध्यक्ष प्रा.विजय नरवणे व प्रमुख अतिथींनी केला. या अभ्यासविषयक कार्यशाळेला प्राचार्य श्री सुरेश भारसाकळे सरांनी ॲनलाईन शुभेच्छा दिल्या.
——–
*प्रा.बुंदेलेंनी केले “भद्याची माय” या विनोदी एकांकिकेचे सादरीकरण*
प्रा.अरुण बुंदेले यांनी अडीच तासापर्यंत सादरीकरण केलेल्या या विद्यार्थ्यांच्या अभ्यासविषयक कार्यशाळेत अभ्यास कसा करावा ?, अभ्यास किती करावा?, नियमित अभ्यासाचे आदर्श वेळापत्रक म्हणजे काय?, वाचन, मनन, चिंतन कसे करावे?,वेळेच्या नियोजनानुसार उत्तरपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा?,आदर्श उत्तरपत्रिका कशी सोडवावी ? तसेच मराठी वर्णमाला,मराठी शुद्धलेखन व वळणदार हस्ताक्षरांचे महत्त्व व नियम अशा गुणवृद्धीच्या 40 मुद्द्यांचे विवेचन वऱ्हाडी – विनोदी भाषशैलीत व ” भदयाची माय ” या एकांकिकेसह सादरीकरण केले या एकांकिकेत भद्याच्या मायची भूमिका प्रा. अरुण बुंदेले तर भदयाची भूमिका चि. समाधान कासदेकर ( वर्ग १० वी ) या विद्यार्थ्याने केली आणि कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांना स्वनिर्मित कॉपीमुक्त अभियानाची शपथ प्रा.बुंदेले यांनी दिली.
—-
*प्रलोभनाच्या युगात प्रा.बुंदेले यांची अभ्यास विषयक कार्यशाळा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक -प्रा. योगीता कोरडदेव*
याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रा.कु.योगीता कोरडदेव यांनी ,” विद्यार्थ्यांच्या अभ्यासविषयक कार्यशाळेत प्रा.बुंदेले सरांनी जे विद्यार्थ्यांना अभ्यासविषयक मार्गदर्शन केले ते अनमोल आहे.विनोदातून प्रबोधनाकडे असा हा कार्यक्रम सरांनी सादर केल्यामुळे तो विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचला असे मला वाटते ;कारण अभ्यासाबाबत झोपलेला विद्यार्थी सरांच्या या अभ्यास विषयक प्रबोधनामुळे खडबडून जागा होऊन तो अभ्यासाला लागतो.अशी ही ” प्रा.बुंदेले सरांची अभ्यास विषयक कार्यशाळा ” प्रलोभनाच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. “असे विचार व्यक्त केले.
——–
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला गती देणारी प्रा.बुंदेलेंची कार्यशाळा-प्र. प्राचार्य श्री विजय नरवणे
प्रभारी प्राचार्य श्री विजय नरवणे सरांनी अध्यक्षीय भाषणामध्ये, ” प्रा.बुंदेले सरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयीच्या अभ्यास कसा करावा ? अशा प्रकारच्या अनेक मुद्यातून बोर्ड परीक्षा जवळ आली असताना जे मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थाच्या अभ्यासाला गती प्राप्त होऊन ते प्रत्येक विषयात भरपूर गुण मिळवतील असे वाटते.” असे विचार व्यक्त केले.
या अभ्यासविषक कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा.
शिशिर गढिकर सर यांनी केले.विद्यार्थीप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांचा परिचय व संचालन श्री आनंद महाजन सरांनी केले तर आभार प्रा.बाळूराम दांडेगावकर यांनी मानले.
कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.




