सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
पुसेगाव(दि.26डिसेंबर):- जिल्हा सातारा येथील श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात पालखी व झेंड्याच्या भव्य सवाद्य मिरवणुकीने भक्तीमय व उत्साही वातावरणात श्री सेवागिरी यात्रेचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला. झेंड्याच्या प्रतिष्ठापनेपासून सलग अकरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत शेती, लोककला, क्रीडा, युवाचैतन्य, तसेच ग्रामीण संस्कृतीचे समग्र दर्शन घडणार आहे.
श्री क्षेत्र पुसेगाव येथे साजऱ्या होणाऱ्या यात्रेचे स्वरुप दरवर्षीप्रमाणे व्यापक व शानदार करण्यात आले आहे. गावातील शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात व सातारा पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरवण्यात आली आहे. यात्रेस राज्यातून व परराज्यातून लाखो भाविक येत असतात. रथोत्सव यात्रेचा मुख्य दिवस दि. २९ डिसेंबर रोजी असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथशिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवर निमंत्रित आहेत.
श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव व मान्यवरांच्या हस्ते मानाचा झेंडा व श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. ग्रामस्थ वउपस्थित होते. पूजनानंतर झेंडा व पालखीच्या मिरवणुकीला मंदिरापासून सुरुवात झाली. भाविक व ग्रामस्थांनी जागोजागी मानाचा झेंडा व पालखीचे दर्शन घेत श्री सेवागिरी महाराजांचा एकच जयघोष केला.
मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या मानाचा झेंडा व पालखीच्या मिरवणुकीसमोर बँड पथके, पुसेगावातील शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी परंपरागत पोशाखात झांज पथक व लेझीम पथकात सहभागी झाले होते. मिरवणुकीतील सामाजिक देखावे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीनंतर मानाच्या झेंड्याची यात्रा स्थळावर प्रतिष्ठापना करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे योग्य नियोजन केले.




