Home लेख ऑगस्ट क्रांती दिन.

ऑगस्ट क्रांती दिन.

147

 

आज ९ ऑगस्ट, संपूर्ण देशात आजचा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांचा स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिन ! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रज राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य करण्याचा दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाची सुरुवात झाली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी भारताला स्वातंत्र्य देणार असल्याची घोषणा इंग्रज सरकारने केली होती मात्र ऐनवेळी भारताला स्वातंत्र्य देणार नसल्याचे इंग्रजांनी सांगितले. त्यामुळे महात्मा गांधींनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला चले जाओ आंदोलन असेही नाव देण्यात आले. करो या मरो अशी घोषणा या आंदोलनात करण्यात आली. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. ९ ऑगस्ट रोजी महात्मा गांधींसह अनेक ज्येष्ठ नेत्यांना इंग्रजांनी अटक केली होती त्यामुळे संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध संतापाची लाट पसरली होती. महात्मा गांधींच्या झालेल्या अटकेला विरोध करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला होता. इंग्रजांनी नेत्यांची धरपकड केल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागोजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली पण लोक सरकारचे आदेश मानायला तयार नव्हते. आंदोलक पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.
जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध संपूर्ण देश एकवटला होता. देशवसियांच्या एकजुटीने इंग्रजांना गुडघे टेकायला लावले होते. दुसऱ्या महायुद्धाने खिळखिळ्या झालेल्या ब्रिटिश सरकारची या आंदोलनामुळे उरली सुरली ताकदही लोप पावत चालली होती. त्यानंतर देशवासीयांनी इंग्रजांना भारतातून हाकलून लावे पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या आंदोलनात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील ज्या मैदानावर तिरंगा फडकावून या आंदोलनाची सुरुवत करण्यात आली त्या मैदानाला क्रांती मैदान असे नाव देण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १८५७ नंतरचा हा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा होता म्हणूनच या लढ्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात खूप महत्वाचे स्थान आहे.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here