अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी) :-
शहरात पायाभूत सुविधा निर्माण करून नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून वेळोवेळी कोट्यवधी रूपयांचा निधी आणला आहे. त्यातून शहरातील विविध विकासकामे मार्गी लागत आहेत, याचे मला समाधान आहे. आज सुध्दा गंगाखेडकरांसाठी गोड बातमी आहे. ती म्हणजे शहरातील अंतर्गत सर्वच रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेतून ७१ रस्त्यांसाठी तब्बल १३५ कोटी ३५ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून दळणवळणाच्या सुविधा गतिमान करण्यासाठी राज्य शासनाकडे मी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत हा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांना आनंद झाला आहे, हि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे येत्या २० नोव्हेंबर रोजी शहरातील जायकवाडी परिसरात सर्व रस्त्यांचे एकत्रित भूमिपूजन करण्यात येणार आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी सांगितले.
केवळ गंगाखेड शहरातील नव्हे तर मतदारसंघातील सर्व नागरिकांना चांगल्या सोई सुविधा उपलब्ध करून देणे. त्यांचे प्रश्न मार्गी लावणे, हे माझे कर्तव्य आहे. याच जाणीवेतून मी गेली चार वर्षे काम करीत आहे. त्यात मला माय बाप जनतेने मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे इथंपर्यंत पोहोचलो आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी स्पष्ट केले.
अतिशय खेळीमेळीत संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेत शहरातील रस्ते कामांची व इतरही प्रकल्पाची माहिती तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना माहितीपूर्ण उत्तरे आ.डॉ.गुट्टे यांनी दिली. यावेळी मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, प्रभारी हनुमंत मुंढे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, ॲड.अकबर सय्यद, राधाकिशन शिंदे, कासले साहेब, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, इंतेसार सिद्दीकी, सतिश घोबाळे, छोटू कामत, संतोष पेकम, प्रताप मुंढे, उध्दव शिंदे, वैजनाथ टोले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारवर सामान्य जनतेचा विश्वास
राज्य सरकार लोकहिताला प्राधान्य देवून विकासकामांना तत्काळ मंजुरी देत आहे. त्यामुळे राज्यभर विकासाची घौडदौड सुरू आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ त्यास अपवाद नाही. गेल्या दोन महिन्यात आपणास कोट्यवधी रूपये निधी मिळाला आहे. त्यातून बहुपयोगी विकासकामे मार्गी लागत आहेत. तसेच मतदारसंघाचा गेल्या ४० वर्षांचा ब्याकलॉग भरून निघतोय, हि खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून विकासाला चालना देणारे हे शासन असल्यामुळे सरकारवर सामान्य जनतेचा विश्वास आहे, असेही गौरवोद्गार आ. डॉ. गुट्टे यांनी काढले.
——
…..तर गंगाखेड एक्स्प्रेस आहे!
केवळ गंगाखेड शहर नव्हे तर संपूर्ण मतदारसंघात होत असलेला विकास, मार्गी लागत असलेली कामे आणि मिळणारा कोट्यावधींचा निधी, याचे सर्व श्रेय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या सक्षम नेतृत्वाचे आहे. त्यांच्या कामांची पध्दत फारच निराळी आहे. म्हणून आम्ही त्यांचे जबरी फॅन आहोत. हे केवळ रस्त्यांचे काम नसून शहरवासीयांसाठी हि तर गंगाखेड एक्स्प्रेस आहे, अशा शब्दात मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे यांनी आ.डॉ.गुट्टे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
