अमरावती प्रतिनिधी :- प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना 2022-23 अंतर्गत अंबिया बहारामध्ये मोर्शी वरूड तालुक्यासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिक विमा काढला होता. यात संत्रा, मोसंबी, केळी या फळांचा विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता. मात्र ४ महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा आजपर्यंत हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पिक विम्याची मदत शासनाच्या व विमा कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी विमा मदतीपासून वंचित असून आस्मानी संकटामूळे झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना मंजूर विम्याची मदत ८ दिवसात संपूर्ण व्याजासह संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रुपेश वाळके, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी युवक काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल गोहाड, अमोल सोलव यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त अमरावती विभाग, जिल्हाधिकारी अमरावती, जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन देऊन केली आहे.
पारंपारिक शेती पध्दतीपेक्षा फळबागांचे महत्व अधिक वाढत आहे. मोर्शी वरूड तालुक्यासह अमरावती जिल्ह्यामध्ये हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार संत्रा मोसंबी फळांची लागवड केली जाते. जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे. तेवढ्याच प्रमाणात तोटाही आहे. त्यामुळेच पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करीता जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी १२ हजार रुपये भरून आंबिया बहार संत्रा फळ पिक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला आहे. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजनेमध्ये मोठ्या अपेक्षेने विमा काढून सुद्धा त्यांना विमा मदत वेळेवर दिल्या जात नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
अमरावती जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, सचिव (कृषि) महाराष्ट्र राज्य मुंबई यांना विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ विम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने संबंधित विमा कंपनीकडून अमरावती जिल्ह्यातील हजारो पात्र विमाधारक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये मंजूर झाले असून ती सर्व रक्कम व्याजासह तत्काळ पात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी अन्यथा जिल्ह्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रुपेश वाळके यांनी शासनाला दिला आहे.
बॉक्स :-
काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा व शासनाचे दुर्लक्ष यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी डबघाईला आला आहे. यावर काही उपाययोजना करण्या ऐवजी किंवा संत्र्याला राजाश्रय देण्या ऐवजी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संपविण्याचा घाटच शासनाकडून होतांना दिसत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. ४ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचे फळ पीक विम्याचे कोट्यावधी रुपये वाटप करण्यास दिरंगाई केल्या जात असल्यामुळे संत्रा फळ पीक विमा हा शेतकर्यांच्या हिताकरीता आहे की कंपनीच्या फायद्यासाठी असा प्रश्न आम्हाला पडला आहे. — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मोर्शी तालुका
