धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील
धरणगांव – सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी सत्यशोधक नगरी,जय शंकर लॉन्स,औरंगाबाद रोड,जेजुरकर मळा, नाशिक येथे संपन्न झाले. या ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन सत्यशोधक राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते सत्यशोधक समाज संघाच्या झेंड्याचे ध्वजारोहण व मशाल पेटवून उद्घाटन झाले आणि या ऐतिहासिक अधिवेशनाचा समारोप महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला.
या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार धरणगावकर झाले. याप्रसंगी धरणगाव येथील लहान माळीवाडा माळी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट घेतली व धरणगाव येथील माळी समाज पंचभवनचे काम सुरू आहे या संदर्भात विस्तृत चर्चा केली. समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख यांनी समाजभवनाचे चार मजली इमारतीचे फोटो दाखवले, अभियंत्याचा प्लॅन दाखवला आणि यानंतर भुजबळ साहेबांनी मदतीचे आश्वासन दिले.
याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, सहसचिव दीपक महाजन, एस.डब्ल्यु.पाटील, व्ही.पी.महाले, दयाराम महाजन, एच.डी.माळी, धीरज महाजन, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील, दिनेश पाटील, विक्रम पाटील, पी.डी.पाटील उपस्थित होते.
