Home गडचिरोली जगातील महान हॉकीपटूंच्या यादीत अव्वलस्थानी!

जगातील महान हॉकीपटूंच्या यादीत अव्वलस्थानी!

188

(राष्ट्रीय क्रीडा दिन: मेजर ध्यानचंद जयंती विशेष)

व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. खेळाडू जीवनभर आरोग्यदायी राहतात. भारतामध्ये विविध क्रीडा प्रकार प्रसिद्ध आहेत. अनेक खेळाडू जागतिक स्तरावर चमकलेले आहेत. खेळ हा अनेक लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. प्रत्येकजण कोणता ना कोणतातरी खेळ प्रकार पसंत करतो. काहीजण खेळाची आवड करिअरच्या दिशेने पुढे नेतात. तर काही लोक आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना फॉलो करत खेळाचा आनंद घेतात. देशाला क्रीडाक्षेत्राचा मोठा वारसा लाभलाय. यात हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांना स्मरून राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व पटावे, यास्तव श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा सदर लेखप्रपंच… 

लाखो देशवासियांसाठी प्रेरणादायी असलेले व्यक्तीमत्व दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्यासह पी.टी.उषा यांना उडनपरी या नावाने संबोधले जाते, तर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव तथा मास्टर ब्लास्टर म्हटले जाते. राष्ट्रीय क्रीडा दिवस २९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो, का? तर महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिन आहे, म्हणूनच तो दिवस क्रीडादिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय क्रीडा दिनी व्यक्तीच्या जीवनात खेळांच्या महत्त्वाबाबत जनजागृती केली जाते. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सर्वांनी खेळ खेळले पाहिजेत, असा संदेश दिला जातो. या दिवशी राष्ट्रपती देशातील क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार देऊन गौरव करतात.

मेजर ध्यानचंद हे हॉकीमध्ये जगभरात गाजलेले नाव आहे. त्यांना हॉकीचे जादुगार म्हणून ओळखले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन १९२२मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते भारतीय लष्करात रूजू झाले. त्यांच्यामध्ये एका खेळाडूचे सर्व गुण होते. लष्करातील सुभेदार मेजर मनोज तिवारी यांनी हॉकी खेळण्यासाठी ध्यानचंद यांना प्रवृत्त केले, त्यांना प्रोत्साहन दिले. स्वत: तिवारींना सुद्धा खेळांमध्ये आवड होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानचंद यांनी हॉकी खेळण्यास सुरुवात केली. देशातीलच नव्हे तर जगातील महान हॉकीपटूंच्या यादीत अव्वलस्थानी त्यांचे नाव आले. त्यांना पहिल्यापासूनच खेळाची आवड होती. ते एक उत्तम खेळाडू होते. पण त्यांना हॉकीची प्रेरणा मिळाली ती सुभेदार मेजर तिवारी यांच्याकडून, जे स्वत: क्रीडाप्रेमी होते. खेळांमध्ये उत्कृष्ट असल्यामुळे ध्यानचंद यांची १९२७ साली बढती लान्स नायक पदावर झाली. त्यानंतर १९३२ साली नायक पदावर तर १९३६ साली हॉकी टीमचे कॅप्टन असताना त्यांची सुभेदार पदावर बढती झाली. नंतर लेफ्टनंट पदावरून त्यांची बढती मेजर म्हणून झाली. ते हॉकी खेळण्यात अतिशय निपूण होते. त्यांना देशातील सर्वकालीन उत्कृष्ट हॉकी खेळाडू समजले जाते. हॉकी खेळताना चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात, फटका मारण्यात, विरोधी खेळाडूकडून अलगद चेंडू काढून घेण्यात, एखादा नवीनच सर्जनशील फटका मारण्यात ते माहीर होते.

त्यांनी भारतीय हॉकीला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले. ऑलम्पिकमध्ये भारताला हॉकीत त्यांनी ३ सुवर्ण पदके मिळवून दिली. सन १९२८, १९३२ आणि १९३६ साली भारताने हॉकीतील सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली. २२ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चारशेपेक्षा जास्त गोल केले, तर कारकीर्दीत एक हजारांपेक्षा जास्त गोल केले. सन १९२६ ते १९४८ या काळात त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राला एक नवी उंची गाठून दिली. त्यांच्यापासून अनेक खेळाडूंनी प्रेरणा घेतली. राष्ट्रीय क्रीडा दिन २९ ऑगस्टला देशपातळीवर साजरा केला जातो. राष्ट्रपती भवनात या दिवशी समारोह आयोजित केला जातो. क्रीडा क्षेत्रातील मानाचे पुरस्कार विविध खेळाडूंना दिले जातात. खेळाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्याबरोबरच या दिनी मेजर ध्यानचंद यांचे खेळातील योगदान अधोरेखित केले जाते. भारताची समृद्ध क्रीडा संस्कृती आणि वारशात ध्यानचंद यांनी दिलेल्या योगदानाला उजाळा दिला जातो. ध्यानचंद एकमेव खेळा़डू आहेत, त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, अलाहाबाद येथील एका राजपूत परिवारात दि.२९ ऑगस्ट १९०५ रोजी मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सामेश्वर सिंह हे भारतीय सेनेत होते. ध्यानचंद देखील आपल्या वडिलांप्रमाणेच भारतीय सेनेत दाखल झाले आणि येथूनच त्यांचा हॉकी प्रवास सुरू झाला. त्यांचे खरे नाव ध्यानसिंह असे होते. मात्र ते नेहमी चंद्राच्या प्रकाशात हॉकीचा सराव करीत असत. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना चंद म्हणण्यास सुरुवात केली. नंतर ते ध्यानचंद या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी सन १९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धात हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यांत विजय मिळवून दिला. बर्लिन ऑलिम्पिक १९३६मध्ये भारतीय संघाने जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरच्या उपस्थितीत जर्मन संघाला अंतिम फेरीत ८-१ अशी धूळ चारली होती. या विजयासह सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धात सुवर्णपदक जिंकून अनोखी किमया साधली. मेजर ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीतील त्यांच्या २२ वर्षाच्या कारकीर्दीत चारशेपेक्षा जास्त गोल करत आपण गोल मशीन असल्याचे सिद्ध केले होते.

सन १९५६मध्ये भारत सरकारने त्यांना त्यांच्या हॉकी खेळातील योगदानासाठी पद्मभूषण या सन्मानाने भुषविले, तर भारतीय टपाल सेवेने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. ध्यानचंद हे भारतीय सेनेतून मेजर या पदावर असताना निवृत्त झाले. आपल्या निवृत्तीनंतर देखील ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान कायम राहिले. पटियालामधील राष्ट्रीय क्रीडा संस्थानमध्ये ते हॉकीचे मुख्य प्रशिक्षक होते. शिवाय त्यांनी राजस्थानमधील बऱ्याच प्रशिक्षण कॅम्पमध्ये देखील प्रशिक्षण दिले. सन २००२ साली दिल्लीतील नॅशनल हॉकी स्टेडिअमचे नामकरण मेजर ध्यानचंद नॅशनल हॉकी स्टेडिअम असे करण्यात आले.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली. त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्डन कामगिरी नोंदविली. दशकानंतही त्यांची जादू कायम आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे. सरकारतर्फे सन १९५६मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च नागरिपुरस्कार असलेला पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले. त्यांच्यातील कौशल्याबाबत बोलताना स्टिकला चेंडू जणू चिटकलेला असायचा, असे वर्णनही ऐकायला मिळते. एकदा तर चक्क त्यांची हॉकी स्टिक तोडून त्यांत चुंबकिय किंवा अन्य काही गोष्टीचा वापर करण्यात आलाय का? हे पाहण्यात आले होते. ध्यानचंद यांनी सन १९२६ ते १९४८ दरम्यान चारशेहून अधिक सामने खेळले. यात त्यांनी जवळपास हजार गोल डागण्याचा पराक्रम केला. हॉकीच्या मैदानात अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यासाठी सन २०१२पासून भारत सरकारने त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला. ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी संघाने ऐतिहासिक ब्राँझ पदक पटकावल्यानंतर क्रीडा क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे दि.३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले होते.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या हॉकी कौशल्याबद्दल विनम्र अभिवादन तथा सर्व क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय क्रीडादिन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा !!

✒️अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.गडचिरोली, फक्त व्हॉटसॲप- ९४२३७१४८८३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here