बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.5ऑगस्ट):- तालुक्यातील युवा नेते तथा गुलमेश्वर गुळ कारखान्याचे अध्यक्ष बापुराव बबनराव चव्हाण (वय वर्ष 42) यांचा आज (दि. 5) सकाळी 9 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने सहकार क्षेत्राला धक्का बसला असून जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी नऊ वाजता त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने गेवराई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बीडला हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.
बापू चव्हाण यांनी अल्पावधीत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून लोकप्रियता मिळवली होती. सहकारी बँक, दोन गूळ कारखान्याची उभारणी करून गेवराई (जि.बीड) परिसरात विश्वासार्हता निर्माण केली होती. गोदा पट्यात त्यांना मानणारा वर्ग निर्माण झाला होता. स्वभावाने शांत, संयमी असलेले बापूसाहेब चव्हाण, आबा नावाने ओळखले जात होते. आज सहा वाजता त्यांच्या गुळज (ता. गेवराई, जि. बीड) या राहत्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.