Home महाराष्ट्र जननायक वा.मो.उपाख्य स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या दि .29 जुलै 2023 ला असलेल्या...

जननायक वा.मो.उपाख्य स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या दि .29 जुलै 2023 ला असलेल्या 26 व्या स्मृतिदिनानिमित्त …

220

विदर्भ भूषण,काव्यातून समाजप्रबोधन व समाजपरिवर्तन करणारे कविवर्य,शून्यातून विश्व निर्माण करणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व,हजारो कुटुंबाचे आधारस्तंभ असलेले समाजसेवी,संत सदृश्य निरागस भाव व नि:स्पृहता असलेले व्यक्तिमत्त्व, चालते बोलते समज कल्याणाचे विद्यापीठ, कीर्तन-भजन-प्रवचनातून जनसामान्यांना जागृत करणारे सुटा बुटातील संत,ए.टी.के.टी. व एन.एस.एस.चे निर्माते,उपेक्षितांचे आधारवड,स्वकार्यातून समतेची चळवळ चालविणारे समतादूत,समाज परिवर्तनाचे विद्यापीठाला अधिष्ठान देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष जननायक वा.मो उपाख्य दादासाहेब काळमेघ यांच्या दि २९ जुलै २०२३ ला असलेल्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रभावी जीवन कार्यावरील
“सुटाबुटातील संत स्व.दादासाहेब काळमेघ ” ही
अभंगरचना प्रकाशित करीत
आहोत.
———————————–
अभंग
” सुटा बुटातील संत
स्व.दादासाहेब काळमेघ “

दादासाहेबांचा। आज स्मृतिदिन ।
करांनी वंदन । कोटी कोटी ॥ १ ॥

आठ नोव्हेंबर । दादा जन्मदिन ।
आनंदाचा क्षण । कुटुंबात ॥ २ ॥

मोतीराम पिता । मंजुळाई माता ॥
सुसंस्कार दाता । दादांचेच ॥ ३ ॥

दादांनी निर्मिले । विश्व शून्यातून ॥
शुद्ध मनातून । सेवा कार्य ॥ ४ ॥

महाराष्ट्री एक । चोसाळा हे गाव ॥
एक वासुदेव । सर्व दूर ॥ ५ ॥

विनम्र नम्रता । मार्ग यशस्विता ॥
सूर्य तेजस्विता । चर्येवर ॥ ६ ॥

येथे खूप जाती । सर्व एक माती ॥
जुळविली नाती । दादांनीच ॥ ७ ॥

दयावंत एक । दादा ग्रामगुरू ॥
दादा कुलगुरू । कार्य थोर ॥ ८ ॥

भ्रष्ट आचराचा । धरिला ना मार्ग ॥
निर्मियला स्वर्ग । प्रामाणिक ॥ ९ ॥

सोन्याचे दागिने । स्वतःचा पगार ॥
केला जनोद्धार । दादांनीच ॥ १० ॥

मानियला नाही । वर्ण – जाती भेद ॥
वंश – पंथ भेद । जीवनात ॥ ११ ॥

समता तत्त्वांचे । केले आचरण ॥ .
वंचित जीवन । सुखमय ॥ १२ ॥

भजन कीर्तन । जन प्रबोधन ।
प्रसन्न ते मन । सर्वांचेच ॥ १३॥

सुटाबुटातील । चौसाळ्याचे संत ॥
जन कीर्तनात । ध्यान मग्न ॥ १४ ॥

आम्ही बी घडलो । तुम्ही बी घडाना ॥
उपदेश जना । कीर्तनात ॥ १५॥

कणखर बाणा । निर्मिड वक्तृत्व ॥
तेजस्वी व्यक्तित्व । दादांचेच ॥ १६॥

दादासाहेबांनी l व्यक्ती घडविले ॥
प्रेरणा ते झाले । हजारोंचे ॥ १७॥

दादासाहेब हे । गुरू प्रज्ञावंत ॥
गुरू विद्यावंत । कुलगुरू ॥ १८ ॥

अंधश्रद्धेतून । मुक्त केले जन ॥
भजन कीर्तन । उपदेश ॥ १९॥

कीर्तनाने केली । सामाजिक क्रांती ॥
वैचारिक क्रांती । दादांनीच ॥ २० ॥

दादांचे हे कार्य । सेवा गरिबांची ॥
दिनदुबळ्यांची । करितसे ॥ २१ ॥

भेदभाव दूर । करूनिया सारे ॥
आनंदाचे वारे । चोहिकडे ॥ २२ ॥

दादांचे कीर्तन । प्रबोधन सत्र ॥
जीवनाचे सूत्र । सांगतसे ॥ २३ ॥

मधुर आणि गोड । दादांचीच वाणी ॥
जनांचीच गाणी । कीर्तनात ॥ २४॥

स्मृतिदिनी आज I करितो नमन ॥
करांनी वंदन । कोटी कोटी ॥ २५ ॥
अभंगकार

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,रुक्मिणी नगर,अमरावती.भ्र.ध्व. : ८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here